#BBCNewsPopUp @ बंगळुरू : देशाचं IT हब वाहतूक कोंडीने हैराण!

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : बंगळुरूकरांचे वर्षांतले 250 तास निव्वळ ट्रॅफिकमध्ये वाया

जर एखाद्या कंपनीने तुमच्या आताच्या कामासाठी त्याच शहरात दुप्पट पगाराची नोकरी दिली तर? नक्कीच तुम्ही दुसरा कोणताही विचार न करता ही संधी घ्याल ना? पण जर ती नोकरी बंगळुरू शहरात असेल तर मात्र अशा ऑफरकडे लोक सावधपणे पाहतात. कारण या शहरात पैशांपेक्षा कंपनी कुठं आहे, हे महत्त्वाचं आहे.

माहिती तंत्रज्ञान अर्थात IT क्षेत्रात काम करणाऱ्या सरोज गौडा म्हणतात, "माझे असे अनेक मित्र आहेत, ज्यांनी दररोजच्या वाहतूक कोंडीला कंटाळून नोकरीला रामराम केला आहे. कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तासन तास लागत असल्याने अनेकांनी नोकरीच सोडली आहे."

1,500पेक्षा जास्त मल्टीनॅशनल सॉफ्टवेअर कंपन्या असलेल्या बंगळुरूला भारताची 'सिलिकॉन व्हॅली' म्हटलं जातं. पण वाहतूक कोंडीमुळे शहराचा प्रतिमेला फटका बसला आहे. वाहनांची वाढती संख्या आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे दिवसेंदिवस इथली परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे.

घरातून ऑफिसला जाणं आणि ऑफिसवरून घरी येणं, यासाठी सरोज यांना दररोज चार तास प्रवास करावा लागतो. आणि असं करणाऱ्या त्या एकट्या नाहीत.

त्या आणि त्यांच्यासारखे अनेक IT प्रोफेशनल्स दररोज सिल्क बोर्ड जंक्शन इथं होणाऱ्या वाहतूक कोंडीत अडकतात. बंगळुरूच्या IT हबमध्ये पोहोचण्यासाठी हे सिल्क रोड जंक्शन ओलांडावं लागतं.

प्रतिमा मथळा वाहतूक कोंडीमुळे सरोज यांच्या सारख्या अनेकांना कॅबमध्येच काम करावं लागतं.

सिल्क रोड ट्रॅफिक सिग्नल पार करण्यासाठी 25 मिनिटं ते 1 तास असा कितीही वेळ लागत असतो. या ठिकाणी वाहतुकीचा वेग तासाला 4.5 किलोमीटर इतका कमी झालेला असतो. काही जण यावेळेत मोबाईल आणि लॅपटॉपवर ऑफिसचं काम पूर्ण करतात.

सरोज यांच्यासाठी कॅबमध्ये बसताच ऑफिसचं काम सुरू होतं. "किमान माझा बहुमूल्य वेळ वाया तरी जात नाही. ऑफिसला पोहोचण्याच्या आधीच बरंच काम मार्गी लावायचं असतं. गोंगाट, प्रदूषण आणि तणावामुळं माझी शिफ्ट सुरू होण्यापूर्वीच माझी पूर्ण एनर्जी संपून गेलेली असते."

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
बीबीसी न्यूज पॉप अप @ कर्नाटक

IT कंपन्यांनाही या समस्येची जाणीव आहे. ते कंपनीनजीक गेस्ट हाऊस किंवा घरातून काम करण्याची मुभा देण्यासारखे पर्याय देत असतात. पण काही जणांना वाहतूक कोंडीचा ताण सहन होण्यापलीकडे असतो.

बंगळुरू मेट्रोने ही या समस्येचं पूर्ण समाधान होऊ शकलेलं नाही. बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार इलेक्ट्रॉनिक सिटीला सेवा पुरवण्यासाठी अजून तीन-चार वर्षं लागतील.

प्रतिमा मथळा बंगळुरूत हेलि-टॅक्सी सेवा सुरू झाली आहे.

दरम्यान, हवाई वाहतूक क्षेत्रातील काही कंपन्याना ही वाहतूक कोंडी चांगली व्यावसायिक संधी ठरत आहे.

थंबी अॅव्हिएशन या कंपनीने इलेक्ट्रॉनिक सिटी ते विमानतळ अशी चक्क हेलि-टॅक्सीची सुविधा सुरू केली आहे. एका हेलि-टॅक्सीमध्ये एकाच वेळी सहा जण प्रवास करू शकतात. आणि याचं भाडं (करांशिवाय) 3,500 रुपये इतकं होतं.

थंबी अॅव्हिएशनचे बिझनेस डेव्हलपमेंटचे प्रमुख गोविंद नायर म्हणतात त्यांचे मुख्य ग्राहक IT क्षेत्रात काम करणारे लोक आहेत. "बंगळुरू शहराने नेहमीच नव्या कल्पना आणि उपाययोजनांचं स्वागत केलं आहे. सर्वसाधारणपणे एका IT प्रोफेशनलला विमानतळावर पोहोचायला दोन-तीन तास आणि 1,000 ते 1,500 रुपये लागतात. पण आमच्या सेवेमुळे ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत दोन तास जास्त घालवू शकतात, किंवा महत्त्वाची मीटिंग पूर्ण करू शकतात. वाचणारा वेळ त्यांच्यासाठी मौल्यवान असतो."

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा बंगळुरूच्या वाहतूक कोंडीवर असे विनोद होत असतात.

अनेक बंगळुरूकर विनोद आणि विडंबनाचा मार्ग स्वीकारून वाहतूक कोंडीतील वेळ घालवतात.

'एकदा एका बंगळुरूकराने सोशल मीडियावर 'गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी उत्तम जागा कोणती?' असा प्रश्न विचारला होता. यावर त्याला एकाने उत्तर दिलं की "सिल्क जंक्शन. कारण इथं तुम्हाला लग्न करण्यासाठीही वेळ मिळू शकेल."

प्रतिमा मथळा सरासरी प्रत्येक माणूस दरवर्षी जवळपास अडीचशे तास फक्त ट्रॅफिक जाममध्ये घालवतो.

सिल्क जंक्शनवरील अनेक विनोदांपैकी एक होय.

@silk_board या ट्विटर अकाऊंटवर बंगळुरूतील वाहतूक कोंडीवर जोक्सचा पूर आलेला असतो.

पण वाहतूक हा आता विनोदाचा विषय राहिलेला नाही. यावेळी मतदान करताना पायाभूत सुविधांचा विषय नक्कीच बंगळुरूकरांच्या मनात असेल.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)