#5मोठ्याबातम्या : सैन्याला विशेषाधिकार देणारा AFSPA मेघालयातून हटवला

AFSPA कायद्यानुसार सुरक्षा दलांना लोकांची चौकशी आणि कारवाई करण्याचे विशेष अधिकार मिळाले होते. Image copyright AFP / Getty Images
प्रतिमा मथळा AFSPA कायद्यानुसार सुरक्षा दलांना लोकांची चौकशी आणि कारवाई करण्याचे विशेष अधिकार मिळाले होते.

पाहूयात विविध वृत्तपत्र आणि बेवसाइटवर प्रसिद्ध झालेल्या आजच्या ठळक बातम्या.

1. मेघालयातून अफस्पा हटवला

सुरक्षा दलाना विशेष अधिकार देणारा Armed Forces Special Powers Act (AFSPA / आफस्पा) कायदा मेघालयमधून पूर्णपणे आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागांमधून हटवण्यात आला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हा कायदा मेघालयातून पूर्णपणे हटवण्यात आला असला तरी अरुणाचल प्रदेशमधील 16 पैकी 8 पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या भागांतून हटवण्यात आला आहे. म्हणजेच जवळपास निम्म्या अरुणाचल प्रदेशमध्ये अद्यापही आफस्पा लागू असेल.

मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्या 27 वर्षांपासून हा कायदा लागू होता. या कायद्यानुसार सुरक्षा दलांना लोकांची चौकशी आणि कारवाई करण्याचे विशेष अधिकार मिळाले होते. पण या अधिकारांचा अतिरेक होत असून मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याचे आरोपही अनेकदा झाले आहेत, असंही या बातमीत म्हटलं आहे.

2. गडचिरोलीत आणखी 6 नक्षलवादी ठार

गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील खांदला राजाराम जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं.

Image copyright BHAMRAGAD POLICE
प्रतिमा मथळा दोन दिवसांपूर्वीच्या चकमकीनंतर भामरागड पोलिसांनी जप्त केलेला शस्त्रसाठा

लोकसत्ताच्या वृत्तानुसार, गडचिरोलीतील भामरागड तालुक्यात रविवारी पोलिसांनी 16 नक्षलवादी ठार केले होते. त्यानंतर सोमवारी आणखी सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं.

कालच्या कारवाईमध्ये अहेरी दलम कमांडर नंदू आणि सहकाऱ्यांचा समावेश आहे. इतर मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

3. मनु शर्माला सोडण्यास हरकत नाही

जेसिका लाल हत्यांकाड आठवतं? या हत्यांकाडातील सध्या जेलमध्ये असलेला आरोपी मनू शर्मा याला जामीन देण्याविषयी आमची काहीच हरकत नसल्याचं जेसिकाच्या कुटुंबानं म्हटलं आहे.

हिंदुस्थान च्या बातमीनुसार, जेसिकाची बहीण जिने हा खटला नेटानं लढविला, म्हणाली, "मला आणि कुटुंबाला आता नॉर्मल जीवन जगायचं आहे. हे दडपण आता तिथंच सोडून द्यायचं असून आम्हाला आता मनू शर्माला सोडलं किंवा त्याविषयी काहीही निर्णय घेतल्यास कुठलीच हरकत राहणार नाही."

15 वर्षं जेलमध्ये काढल्यानंतर मनू शर्माला आता खुल्या जेलमध्ये टाकण्यात आलं आहे. 30 एप्रील 1999ला मनूने जेसिकाचा एका बारमध्ये खून केला होता.

4. येड्डीयुरप्पांच्या मुलाला तिकीट नाही!

म्हैसूरमधील वरुणा मतदारसंघाकडे सध्या अवघ्या कर्नाटकाचं लक्ष लागलं आहे, कारण इथूनच आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांची मुलं निवडणूक लढवतील, असं अपेक्षित होतं. मात्र आता चित्र बदललं आहे.

विद्यमान मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या हे वरुणा या ग्रामीण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. पण यंदा त्यांनी इथलं तिकीट आपल्या मुलाला, डॉ. यतींद्र सिद्धरामया यांना दिलं आहे.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा येडीयुरप्पा

आता त्यांच्या विरोधात इथून माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचा मुलगा विजयेंद्र हा निवडणूक लढवेल, अशी अपेक्षा लोकांना होती. इतकंच काय तर मुख्यमंत्री सिद्धरामया यांनी निवडणुकीची तयारीही त्याच अनुषंगाने केली होती.

पण काल भाजपने विजयेंद्र येडीयुरप्पा निवडणूक लढवणार नाही, असं जाहीर केलं आणि कर्नाटक भाजप कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

NDTVच्या बातमीनुसार, आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे विजयेंद्रला उमेदवार घोषित करा नाहीतर राजीनामे देऊ.

5. मोदी दलितविरोधीच - राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दलितविरोधी असून ते संसद आणि सर्वोच्च न्यायालय नष्ट करण्याचा कट रचत आहेत, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

Image copyright FACEBOOK/RAHUL GANDHI
प्रतिमा मथळा राहुल गांधी

एबीपी माझाच्या वृत्तानुसार, दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडीअममध्ये काँग्रेसच्या 'संविधान बचाओ' अभियानाची सुरुवात झाली. पुढील वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत हे आंदोलन सुरू राहील.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी दलित व्होट बँक आपल्या बाजूनं वळवण्यासाठी काँग्रेसचं हे अभियान महत्त्वाचं समजलं जात आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे.

मोदींनी देशाची प्रतिमा धुळीस मिळवली आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)