'बिग बॉस'च्या घरातल्या 7 गोष्टी ज्या कुणीच तुम्हाला सांगणार नाही

अभिनेत्री आरती सोळंकी Image copyright Arti Solanki

इंग्रजी, हिंदी, तेलुगू आणि कन्नड अशा विविध भाषांमध्ये एकाच वेळी लोकप्रिय आणि वादग्रस्त ठरलेल्या 'बिग बॉस' या बहुचर्चित रिअॅलिटी शोची मराठी आवृत्ती नुकतीच सुरू झाली आहे. पहिल्याच आठवड्यापासून स्पर्धकांमध्ये गटबाजी आणि हेवेदावे सुरू झाले आहेत.

कार्यक्रमाच्या नियमांनुसार कोणता स्पर्धक सर्वांत आधी घराबाहेर पडणार, याची सर्वांना उत्सुकता होती. पहिल्या आठवड्यात अनिल थत्ते, भूषण कडू आणि आरती सोळंकी डेंजर झोनमध्ये होते. त्यापैकी आरती सोळंकी यांना नॉमिनेशन प्रक्रियेत सर्वांत कमी मतं मिळाली आणि त्यांना आपला गाशा गुंडाळून 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडावं लागलं.

या 'बिग बॉस'च्या घरात एक आठवडा कसा होता? आरती सोळंकी यांनी आपले अनुभव आणि काही पडद्यामागच्या गोष्टी 'बीबीसी मराठी'सोबत शेअर केल्या आहेत.

1. दोन कोटींचा दंड

बिग बॉसच्या प्रत्येक गोष्टीबाबत कमालीची गुप्तता पाळली जाते. त्यामुळे जोपर्यंत एखादी व्यक्ती या घरात प्रवेश करत नाही तोपर्यंत घरातील सर्व सदस्यांची कुणालाच माहिती नसते.

मी 13 तारखेला जाणार होते पण 12 तारखेच्या दुपारपर्यंत माझ्या आईलासुध्दा 'बिग बॉस'मध्ये जाणार असल्याचं सांगितलं नव्हतं. इतकं गुपित ठेवावं लागतं.

शोमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांकडूनही एका बॉन्डवर सही करून घेतली जाते. त्याचं उल्लंघन करणाऱ्याला तब्बल दोन कोटींचा दंड आहे. जोपर्यंत कार्यक्रम संपत नाही तोवर यातील सर्व नियम आणि अटी लागू असतात. त्यामुळे मी बाहेर पडले असले तरी अनेक गोष्टींबाबत बाहेर वाच्यता करू शकत नाही.

2. सुंदर दिसण्याला महत्त्व?

मराठी 'बिग बॉस'बद्दल मला कळलं तेव्हापासून माझी त्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा होती. माझं स्वप्न पूर्ण होईल की नाही मला माहित नव्हतं. पण चॅनलनेच मला समोरून फोन करून विचारलं आणि माझी इच्छा पूर्ण झाली. तरी पहिल्याच आठवड्यात घराबाहेर पडावं लागल्यानं माझा हिरमोड झाला.

स्मिता गोंदकर माझ्याबाबत खोटं बोलली. घरात इतरही कामं असतात, हे विसरून ती दोन दिवस मेकअप करण्यातच मश्गूल होती. अनेकांनी तिला नॉमिनेट केलं होतं. पण ज्याला मी भाऊ मानते त्या भूषण कडूनेही तिचीच बाजू घेतली.

भूषण कडूला मी भावड्या म्हणते. विनोदी कलाकार म्हणून आम्ही दोघांनी एकत्र प्रवेश केला होता. पण मला तो विनोद करण्यापासून परावृत्त करत होता. एवढंच नव्हे तर त्यानं मला कॅप्टन्सीसाठीही नॉमिनेट केलं नाही.

Image copyright Colors Marathi
प्रतिमा मथळा अभिनेत्री आरती सोळंकी बिग बॉसच्या घरात आठवडाभर होत्या.

'सुंदर आणि हॉट दिसणं एवढाच क्रायटेरीया आहे का?' असा प्रश्न मला त्यानंतर पडला आहे. माणूस कितीही चांगला असला तरी परिस्थिती त्याला वाईट बनवते, हेच यावरून सिध्द होतं. फक्त उषा नाडकर्णी माझ्याबद्दल खरं बोलल्या.

3. दिव्यांच्या प्रकाशातूनच वेळ कळते

'बिग बॉस'चं घर मराठमोळं आणि प्रशस्त आहे. पण अत्याधुनिक अशा या घरात काही बेसिक गोष्टीच नाहीत. म्हणजे किचनमध्ये मिक्सरऐवजी पाटा आणि खलबत्ता दिला आहे. त्यामुळे जेवण बनवताना अनेक अडचणी येतात.

शिवाय मोबाइल, पेन, पेन्सिल आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे इथे घड्याळ नाही. त्यामुळे वेळेचा अंदाजच येत नाही. सतत घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या कलाकारांना तीन महिने घड्याळाशिवाय जगायचं आहे.

इथे सकाळी साधारण आठच्या सुमारास अलार्म वाजतो. तेव्हा दिवस उजाडल्याचं कळतं. दुपार केव्हा होते, याचा पत्ताच लागत नाही. काही तासांनंतर जेव्हा दिवे मंद होतात तेव्हा समजायचं की संध्याकाळ झाली आहे. दिवे बंद झाले की समजायचं आता रात्री झालेली आहे.

सकाळी उठून चहा-नाष्टा तयार करणं, मग जेवण बनवणं, त्यानंतर आंघोळ, दुपारचं जेवण, गप्पा किंवा एखादा टास्क, पुन्हा संध्याकाळी जेवणाची तयारी, चर्चा, रात्रीचं जेवण, घरातील कामं आणि मग लाईट्स-ऑफ, असा इथला दिनक्रम असतो.

4. घर नव्हे पिंजरा

लोकांना वाटतं की या घरात राहणं खूप सोपं आहे. पण तुमच्या कुटुंबापासून, नेहमीच्या कामकाजातील सर्व गोष्टींपासून लांब राहणं खूप कठीण आहे.

वेगवेगळ्या विचारांची माणसं जेव्हा एकत्र राहतात तेव्हा जगणं खूप कठीण होऊन जातं. आपल्याला त्या माणसांसोबत राहण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे 'बिग बॉस'च्या घरात राहणं म्हणजे एका पिंजऱ्यात राहण्यासारखं आहे.

Image copyright Colors Marathi

संपूर्ण घरात AC आहे. एवढंच काय वॉशरूममध्येही AC आहे. सगळीकडे कॅमेरे आणि माईक आहेत. बाथरून सोडलं तर घरातील कुठल्याच कोपऱ्यात तुम्ही कॅमेऱ्यापासून लपून राहू शकत नाही.

इथे 'बिग बॉस' रेशन पाठवतात. मग आम्हीच ठरवतो नाष्ट्याला आणि जेवणाला काय बनवायचं. कधीकधी आम्हाला हव्या त्या गोष्टी आम्ही मागवतो पण सगळ्याच गोष्टी येतात असं नाही.

5. टॉयलेट साफ करण्यात कोणालाच रस नाही

प्रेक्षकांसाठी हा मनोरंजनात्मक कार्यक्रम असला तरी इथे प्रत्येक जण जिंकण्यासाठीच आला आहे. पहिल्याच आठवड्यापासून या घरात गट तयार झाले आहेत. दिसताना सर्वजण एका कुटुंबातले सदस्य भासत असले तरी प्रत्येकानं आपापले पत्ते उघडायला सुरुवात केली आहे.

हिंदी 'बिग बॉस'ची विजेती ठरलेली शिल्पा शिंदे जास्तीत जास्त वेळ स्वयंपाकघरात असायची. त्यामुळे इथे प्रत्येकाला सर्वाधिक वेळ स्वयंपाकघरातच घालवायचा आहे. टॉयलेट साफ करण्यामध्ये, घर झाडण्यामध्ये कुणालाच इंटरेस्ट नाही.

'बिग बॉस'च्या घरात येताना प्रत्येक जण स्वत:चे कपडे आणतो. तो काहीही घालू शकतो आणि आपला लूकही डिझाईन करू शकतो. जिंकण्यासाठी लहान-सहान गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे मी देखिल लूकच्या बाबतील वेगळा प्रयोग केला होता. नाकातली नथ मी कानात घातली होती. केस छोटे करून बाजूने डिझाईन केलं होतं. खुद्द महेश मांजरेकरांनी त्याचं कौतुक केलं होतं.

6. प्रत्येकाला इगो प्रॉब्लेम

कलाकार म्हणून अनेक जण इथे एकमेकांच्या परिचयाचे असले तरी प्रत्येकाला इगो आहे. आस्ताद काळे सगळ्यांत जास्त चिडचिड करतो. तो स्वत:ला 'बिग बॉस'च समजतो. सुशांत शेलार एक पॉलिटिकल माणूस आहे. भूषण कडूने पहिल्या दिवसापासूनच गेम खेळायला सुरूवात केली आहे.

राजेश श्रृंगारपुरे यांच्याबद्दल सर्वांना आदर आहे. पण तोही लवकरच संपुष्टात येईल. पुष्कर जोग गोड मुलगा आहे. त्याला मुलींचा पाठिंबा मिळू शकतो, म्हणून त्याला सतत बाजूला केलं जातं. विनित भोंडेला आपल्या मर्यादा माहित आहेत. आणि अनिल थत्ते हा माणूसच विचित्र आहे.

Image copyright Arti Solanki

महिला वर्गात जुई गडकरी ठरवून आली आहे की मला शंभर दिवस डेलीसोप करायची आहे. रेशम टिपणीस या मास्टरमाईंड आहेत. मेघा धाडेचं सर्व लक्ष स्वयंपाक घरावर आहे. स्मिता गोंदकर खूप साधेपणाने वागत असते, पण ती खूप चलाख आहे.

सई लोकूर ही मुलगी गोंडस आणि स्पष्ट विचारांची आहे. उषा नाडकर्णी जशा आहेत तशाच वागतात. ऋतुजाला सर्वजण डॉमिनेट करतात आणि सतत तिची नक्कल करत असतात.

7. पुरुषांना चपात्या येत नाहीत

तिथून बाहेर पडताना मी दोनच गोष्टी सर्वांना सांगितल्या. पहिली गोष्ट, उषा नाडकर्णींचा स्वभाव तापट आहे, त्यांना सांभाळून घ्या.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरुषांनी चपात्या बनवायला शिका. इथे दररोज प्रत्येकाला जेवण बनवण्याची जबाबदारी दिली जाते. पण या घरातील पुरूषांना चपात्या बनवता येत नाहीत. उद्या जर या घरात एकही मुलगी शिल्लक राहिली नाही किंवा एकच मुलगी राहिली आणि तिने चपात्या बनवायला नकार दिला तर पुरुषांच्या जेवणाची खूप आबाळ होईल.

(बीबीसी मराठीसाठी आरती सोळंकी यांनी प्रशांत ननावरे यांच्याशी केलेल्या बातचीतवर आधारित.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)