Sanju : संजय दत्तच्या नाट्यमय आयुष्यातली 5 वादळं

संजू
फोटो कॅप्शन,

संजू सिनेमात रणबीर कपूर संजय दत्तच्या जीवनातील वेगवेगळ्या रूपात दिसणार आहे.

तुम्ही आज रिलीज झालेला 'संजू'चा टीझर पाहिला का? त्यात संजय दत्तच्या रोलमध्ये रणबीर कपूर आहे, पण विशेष म्हणजे संजयच्या आयुष्यातले 5 टप्पे दाखवण्यासाठी रणबीरचे 5 वेगळे लुक्स दाखवण्यात आलेत. कोणते आहेत हे 5 टप्पे, ते पाहूया...

1. श्रीमंत घरातला बिघडलेला 'रॉकी'

'रॉकी' या आपल्या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या काहीच दिवस आधी संजय दत्तची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री नर्गिस दत्त यांचं निधन झालं. 1981 साली जेव्हा रॉकी प्रदर्शनाच्या वाटेवर होता आणि नर्गिस आपल्या अखेरच्या घटका मोजत होत्या, तेव्हा संजय अमेरिकेत एका ड्रग्स रिहॅब सेंटरमध्ये उपचार घेत होता.

फोटो कॅप्शन,

आई-वडिलांसह संजय दत्त.

प्रकृती अत्यंत खालावलेली असतानाही नर्गिस यांनी संजयसाठी काही समजुतीच्या गोष्टी रेकॉर्ड केल्या आणि या टेप्स सुनील दत्त यांनी संजयला पाठवल्या.

आपल्या आईचा आवाज ऐकून सातासमुद्रापार असलेल्या संजयला ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर पडायला मदत होईल, अशी आशा सुनील दत्त यांना होती असा उल्लेख 'संजय दत्त: द क्रेझी अनटोल्ड स्टोरी ऑफ बॉलिवूड्स बॅड बॉय' या पुस्तकात म्हटलं आहे.

2. 'खलनायकी' वाटचाल

1993 सालच्या मुंबई स्फोटांनंतर संजयच्या आयुष्याला एक वेगळं वळण लागलं. 1994 साली मॉरिशसहून शूट संपवून परत येणाऱ्या संजय दत्तला मुंबई विमानतळावरूनच अटक करण्यात आली. स्फोटांशी संबंधित शस्त्रास्त्रांपैकी काही शस्त्रं संजयच्या घरात लपवण्यात आली होती.

फोटो कॅप्शन,

माध्यमांशी बोलताना संजय दत्त.

दाऊद इब्राहिम आणि अबू सालेमसारख्या गुंडांच्या संपर्कात संजय दत्त होता आणि शस्त्र बाळगून शस्त्रास्त्र कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. 18 महिने तुरुंगात काढल्यानंतर संजयची सशर्त जामिनावर सुटका करण्यात आली. संजयच्या अटकेचे राजकीय वर्तुळातही चांगलेच पडसाद उमटले.

सुनील दत्त काँग्रेसचे खासदार असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटले. संजयच्या सुटकेची मागणी सुनील यांनी बाळासाहेबांकडे केली, असं त्यावेळी वृत्तपत्रांनी छापलं होतं. 1999 साली आलेल्या 'वास्तव' चित्रपटाबद्दल संजयचं प्रचंड कौतुक झालं. याच काळात संजयच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक चढउतार आले.

फोटो कॅप्शन,

मान्यता दत्त आणि संजय.

3. भाईगिरी ते गांधीगिरी

2006 साली संजय दत्तला मोठा दिलासा मिळाला. संजयवर टाडा कायद्याअंतर्गत ठेवण्यात आलेले आरोप कोर्टाने रद्द केले.

'संजय दहशतवादी नव्हता आणि त्याने स्वसंरक्षणासाठी बंदूक बाळगली होती' असा निर्वाळा देत कोर्टाने त्याला केवळ शस्त्रास्त्र कायद्याखाली दोषी ठरवलं आणि 6 वर्षांची शिक्षा सुनावली.

पण 18 दिवस कोठडीची हवा खाल्ल्यानंतर संजय दत्तला लगेच जामीनही मिळाला. त्याच वेळी मुन्नाभाई मालिकेतला 'लगे रहो मुन्नाभाई' हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर हिट झाला. यामुळे संजयला त्याची प्रतिमा सुधारण्यातही मदत झाली.

फोटो कॅप्शन,

संजयने नेतागिरी करण्याचाही प्रयत्न केला.

4. पुन्हा एकदा कोठडीचा 'अग्निपथ'

2007 ते 2013 हा काळ संजयसाठी चांगला गेला. याच काळात त्याने चित्रपटसृष्टीत मान्यता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या (मूळच्या सारा खान असं नाव असणाऱ्या) अभिनेत्रीशी गोव्यात लग्न केलं. वर्षभरात तो जुळ्या मुलांचा पिता झाला.

2013 साली मार्च महिन्यात, म्हणजे मुंबई स्फोटांनंतर तब्बल 20 वर्षांनी कोर्टाने संजय दत्तला 4 आठवड्यांत शरण यायला सांगितलं. त्याची रवानगी पुण्यातल्या येरवडा जेलमध्ये करण्यात आली.

फोटो कॅप्शन,

कारागृह प्रांगणात संजय दत्त.

संजयच्या वकिलांनी दाखल केलेली पुनर्विचार याचिकासुद्धा कोर्टाने फेटाळून लावली. 2013 आणि 2014 या दोन वर्षांत संजयला 4 वेळा फर्लो मिळाला यावरून त्याला विशेष वागणूक मिळत असल्याची टीकाही झाली. पण यानंतरही एकदा संजयला पॅरोल मिळाला होता. या काळात संजय दत्तने तुरुंगात टोपल्या, पिशव्या विणण्याचं काम केलं.

5. 'काटे' संपवून आयुष्य पुन्हा 'खुबसूरत'

1994 साली अटकेपासून कोर्ट आणि तुरुंगांचे उंबरे अनेकदा झिजवलेल्या संजय दत्तची 2016 सालच्या फेब्रुवारी महिन्यात अखेर सुटका झाली. येरवडा तुरुंगातून सुटून येणाऱ्या संजयला तुरुंगाबाहेर भेटण्यासाठी मित्र, आप्तेष्ट आणि चाहत्यांची एकच गर्दी उसळली होती.

फोटो कॅप्शन,

मुलांसह संजय दत्त.

तुरुंगातून सुटल्यानंतर त्याच्यावर फडकणाऱ्या तिरंग्या झेंड्याला सलाम करणाऱ्या संजयचं दृश्य त्याच्या चाहत्यांना भावुक करणारं होतं. पण ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती की दिखावा, याबाबतही सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये खरपूस चर्चा रंगली.

संजय दत्त आता पत्नी मान्यता आणि जुळी मुलं शाहरान आणि इक्रा यांच्यासह आपल्या मुंबईतल्या घरात राहतो.

'संजू' या बायोपिकच्या निमित्ताने संजय दत्तच्या रुपेरी पडद्यावरच्या कथेलाच शोभेल अशा आयुष्यातल्या प्रसंगांची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. हा सिनेमा 29 जून 2018ला रिलीझ होणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)