#5मोठ्याबातम्या - काँग्रेसच्याही हातांना मुस्लिमांचं रक्त! : सलमान खुर्शीद

सलमान खुर्शिद Image copyright Buddhika Weerasinghe/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा सलमान खुर्शिद

पाहूयात विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या.

1. 'काँग्रेसच्याही हातांना मुस्लिमांचं रक्त'

काँग्रेसचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले आहेत, असं खळबळजनक वक्तव्य ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांनी केल्याचं द टाइम्स ऑफ इंडियाने एका बातमीत म्हटलं आहे.

मंगळवारी अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या कार्यक्रमात एका माजी विद्यार्थ्याने काँग्रेसच्या काळात झालेल्या सांप्रदायिक दंगलींविषयी विद्यापीठाच्या विचारलं. त्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना खुर्शीद म्हणाले की आमचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने भरले आहेत.

पक्षाच्या बाबतीत हे विचारण्यात येत असल्याचं त्यांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी, "मी काँग्रेसचाच एक भाग असल्यानं मी ते स्वीकारतो," असं उत्तर दिलं.

2. नाणारवरून शिवसेना नरमली?

नाणार प्रकल्पावरून आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रीमंडळ बैठकीत मौन बाळगणंच पसंत केल्याचं वृत्त लोकमतने दिलं आहे.

बैठकीपूर्वी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या कक्षात सेनेच्या मंत्र्यांची बैठक झाली. त्यानंतर नाणार प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेतर्फे मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात आलं.

नाणार प्रकल्पाबाबत राज्य आणि कोकणवासीयांच्या हिताचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

3. वेबसाइट ब्लॉक करण्यात भारत आघाडीवर

भारतातील इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी इंटरनेटवरील मजकुराची चाळणी करण्यासाठी विविध उपाययोजना केलेल्या आहेत. त्यामुळेच की काय भारत हा जगात वेबसाइट ब्लॉक करण्यात आघाडीवर आहे.

एक्सप्रेस ग्रुपने कॅनेडातील दोन संस्थांच्या सहाय्याने दहा देशांच्या केलेल्या संयुक्त तपासणीत हा निष्कर्ष निघाला असल्याचं वृत्त लोकसत्ताने पहिल्या पानावर दिलं आहे.

Image copyright Getty Images

भारतात इंटरनेटवरील मजकुराची चाळणी करणाऱ्या 42 यंत्रणा कार्यरत होत्या. तर पाकिस्तानात हीच संख्या 20 होती. वादग्रस्त मजकूर किंवा वेब पेजेस थेट ब्लॉक केले जातात.

पॉर्न किंवा पायरसी वेबसाइटचे पेज ब्लॉक केले जात असल्याचं आपल्याला माहीत असेल. पण कधीकधी परदेशी NGO, UNI, मानवाधिकार संघटना, आरोग्य आणि स्त्रीवादी संघटनांचे वेबपेज ब्लॉक केले जातात.

4. नक्षलवाद्यांचे 15 मृतदेह नदीत सापडले

गडचिरोलीमधल्या ताडगावनजीकच्या बोरिया जंगलात रविवारी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा आकडा आणखी वाढल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळने दिलेल्या वृत्तानुसार नजीकच्या इंद्रावती नदीत आणखी 15 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. म्हणजेच 48 तासांत सुरक्षा दलांनी तब्बल 37 नक्षलवाद्यांना ठार केलं आहे.

Image copyright Thinkstock
प्रतिमा मथळा संग्रहित छायाचित्र

C-60 आणि CRPF बटालियनच्या पोलिसांनी शनिवारी बोरिया जंगलात नक्षलवाद्यांविरोधात ही कारवाई केली. या चकमकीत 16 नक्षलवादी ठार झाल्याचं आधी सांगण्यात आलं होतं. नंतर नजीकच्याच इंद्रावती नदीत 15 नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले.

कारवाईमध्ये नक्षलवाद्यांचे नेते साईनाथ, सिनू, नंदू आत्राम हेसुद्धा ठार झाले आहेत.

5. 'सुप्रीम कोर्टाच्या भविष्यासाठी संपूर्ण कोर्टाला बोलवा'

विरोधी पक्षांचा सरन्यायाधीशांविरुद्धचा महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर दोनच दिवसांनी सुप्रीम कोर्टाच्या दोन ज्येष्ठ न्यायमूर्तींनी संपूर्ण कोर्ट भरवण्याची मागणी केली आहे.

न्या. उदय लोकूर आणि न्या. रंजन गोगोई यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पत्र लिहून संस्थात्मक बाबींची चर्चा करण्यासाठी आणि कोर्टाचं भविष्य ठरवण्यासाठी संपूर्ण कोर्टाला बोलावून एक बैठक घ्यावी, असं पत्र लिहिलं आहे.

Image copyright Getty Images

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी हा प्रस्ताव सोमवारी फेटाळून लावला. सरन्यायाधीश मिश्रा यांच्या निवृत्तीनंतर न्या. गोगोई हे डिसेंबर महिन्यात सरन्यायाधीशपदाची सूत्रं हातात घेण्याची शक्यता आहे, असं वृत्त द इंडियन एक्सप्रेसने पहिल्या पानावर आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)