गडचिरोलीत नक्षलवादी चळवळीला घरघर लागली आहे का?

C_60 Image copyright Getty Images/AFP

पत्र्याचं छप्पर असलेलं, विटांचं एका खोलीचं घर... दुर्लक्ष केलेल्या गोदामासारखं दिसतं होतं. पण मूळात ते तसं नव्हतं. ते एका तरुण आदिवासी जोडप्याचं घर. याच घरात त्यांनी त्यांच्या बाळाचा जन्म साजरा केला होता.

नवऱ्याचं वय होतं 26. तो दुर्गम अशा दक्षिण गडचिरोली भागातल्या गोंड जमातीतला. त्याचं नावं सुखदेव वड्डे. त्याची बायको नंदा, वयानं त्याच्यापेक्षा लहान होती. उत्साही, लाजाळू नंदा छत्तीसगडच्या बस्तरमधल्या कोंता या गावातल्या मुरिया जमातीतली.

गडचिरोलीपासून काही अंतरावर असलेल्या या लहान झोपडीवजा घरात ते राहत होते. 2015मध्ये मी त्यांना भेटलो होतो. आईवडिलांच्या परवानगीनं त्यांनी 2014मध्ये लग्न केलं. त्यांचं लग्न 'आंतरजमातीय' पद्धतीचं होतं, असं त्यांनी मला सांगितलं.

यात कुणाला फारसं काही वेगळं वाटणारही नाही. पण त्यांचा भूतकाळ एवढा सरळसाधा नाही.

एकेकाळी त्यांनी बंदुका हाती घेतल्या होत्या. दिवसरात्र दंडकारण्य पायी पालथं घालत पोलिसांशी संघर्ष केला होता. देशातल्या सर्वाधिक संघर्षग्रस्त भागात बांबूच्या आणि सागाच्या जंगलात पोलिसांशी लपताना, संघर्ष करतानाच त्यांच्यात प्रेम फुललं होतं.

सुखदेव आणि नंदा हे बंदी घालण्यात आलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या सशस्त्र पक्षाचे सदस्य होते. या संघटनेचा उल्लेख तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठीचा सर्वांत मोठा धोका असा केला होता.

Image copyright Bhamragad Police
प्रतिमा मथळा गडचिरोली पोलीस.

ते दोघे प्रेमात पडले होते आणि या सशस्त्र संघर्षानं त्यांचा भ्रमनिरास झाला होता. हा संघर्षातून काही हाती लागणार नाही, असं त्यांना वाटत होतं. त्यांना संसार करायचा होता.

पण शस्त्राचा त्याग केलेले ते काही एकमेव नाहीत. एकट्या गडचिरोलीमध्ये शस्त्राचा त्याग करून सर्वसामान्य जीवन जगणारी 150 जोडपी आहेत.

माओवाद्यांना घटता पाठिंबा

या आणि इतर अनेक घटकांमुळे महाराष्ट्रातल्या या जंगलातल्या स्थितीचे संदर्भ बदलत आहेत. इथूनच माओवाद्यांनी आंध्र आणि छत्तीसगड राज्यात भक्कम कॉरिडोर निर्माण केला आणि तीन दशकांपेक्षा अधिक काळ पोलीस आणि राज्य सरकारला बेजार केलं आहे.

याचाच अर्थ, बदलांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीमधल्या लोकांवरील बंडखोरांचा प्रभाव ओसरू लागला आहे.

याचाच प्रत्यय रविवार आणि सोमवारी, पोलिसांच्या नक्षलविरोधी C-60 कमांडोंच्या टीमनं केलेल्या मोठ्या कारवायांमधून आला. माओवाद्यांनी त्यांचे 37 सदस्य गमावले. त्यात माओवाद्यांच्या 2 विभागीय समितीच्या सदस्यांचाही समावेश आहे.

गडचिरोलीतल्या भामरागड तालुक्यात कासनसूर गावाजवळच्या बोरिया जंगलात झालेल्या चकमकीनंतर पोलिसांच्या दाव्यानुसार त्यांनी 16 मृतदेह ताब्यात घेतले. त्यात नऊ महिलांचा समावेश आहे. हा भाग महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर आहे.

सोमवारी, आणखी सहा माओवाद्यांना जिमलागट्टा भागात ठार केल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. रविवारच्या चकमक स्थळापासून ही जागा 60 किमी अंतरावर आहे.

Image copyright Getty Images/AFP

मंगळवारी इंद्रावती नदीत पोलिसांना कथित माओवाद्यांचे आणखी 15 मृतदेह सापडले. रविवारी झालेल्या चकमकीच्या ठिकाणाजवळच सापडलेल्या या मृतदेहांमुळे एकूण आकडा 37 झाल्याची गडचिरोली पोलिसांची माहिती आहे.

एवढ्या अल्प काळात मिळालेलं हे आजवरचं सगळ्यात मोठं यश असल्याचं पोलीस मानतात. ठार झालेल्या माओवाद्यांची ओळख पटवण्यात येत आहे; काहींची ओळख पटलीही आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून सुरक्षा दलांनी दक्षिण गडचिरोलीतली गस्त मोठ्या प्रमाणावर वाढवली होती. भामरागडमधल्या माहितीनुसार, रविवारी झालेली चकमक ही याच भागात कासनसूर गावाच्या जवळ झाली. हा भाग माओवाद्यांचा तळ मानला जातो.

पोलीस कारवाईमुळे मोठा धक्का

हा माओवाद्यांना मोठाच धक्का आहे. आजवर, दोन दिवसांच्या काळात एवढ्या संख्येनं सदस्य कधीच मारले गेले नाहीत. 2013 ते 2017 या काळात 76 माओवाद्यांना पोलिसांनी ठार केलं. त्याच काळात माओवाद्यांनी सुरक्षा दलाच्या 25 जणांना मारलं. तर याच काळात 200 हून अधिक माओवाद्यांनी शरणागतीही पत्करली असल्याचं आकडेवारी सांगते.

आत्मसमर्पण, अटक आणि ठार झालेल्या माओवाद्यांची संख्या साधारणपणे सारखीच आहे.

Image copyright Getty Images/STRDEL
प्रतिमा मथळा पोलिसांच्या वाहनाचं झालेलं नुकसान, 27 मार्च, 2012

पक्की खबर मिळाल्यानंतरच या कारवाया झाल्या असल्याचं पोलीस प्रत्येक कारवाईनंतर सांगतात. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी सोमवारी, पत्रकारांशी बोलताना, "अचूक आणि नेमकी माहिती, नक्षलवाद्यांचं घटतं मनोबल आणि त्यांच्यातल्या मतभेदामुळे मोहिम यशस्वी झाली," असं सांगितलं.

पोलिसांच्या रणनीतीतील बदल

नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी बदलण्यात आलेल्या धोरणानुसारच रविवार आणि सोमवारची कारवाई झाली.

हा बदल म्हणजे, काही वर्षांपर्यंत स्थानिक लोक पोलिसांच्या हालचालींची खबर माओवाद्यांना देत असत, आता ते पोलिसांना माओवाद्यांचा ठावठिकाणा सांगतात. गडचिरोलीतला पोलिसांच्या बाजूनं झुकलेला कल यातून दिसतो.

बंदी घालण्यात आलेल्या संघटनांविषयीचं प्रेम ते भ्रमनिरास, एकेकाळी ज्या भागात ते मुक्तपणे वावरत असत त्याच भागात वाढलेला सुरक्षा दलांच्या कारवाईचा दबदबा, पुनर्वसनाच्या आकर्षक योजना अशा अनेक कारणांमुळे माओवादी सशस्त्र मार्ग सोडत आहेत.

त्याचबरोबर, बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वास्तवामुळे या जिल्ह्यातला सशस्त्र चळवळीचा संदर्भही कमी होत चालला आहे.

माओवादी चळवळीला उतरती कळा?

सप्टेंबर 2013मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या (माओवादी) मध्यवर्ती समितीच्या कागदपत्रांमधल्या नोंदीनुसार, "गेल्या काही वर्षांतल्या अटकसत्रांमुळे महाराष्ट्रात चळवळीला मोठा फटका बसला आहे. देशभरात चळवळीची स्थिती गंभीर असली तरी सर्व राज्यातली परिस्थिती समान नाही. दंडकारण्यामध्ये प्रभाव क्षेत्र कमी होत आहे. पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी (PLGA)च्या प्रतिकाराची तीव्रता आणि विस्तार दोन्ही कमी झाले आहेत. पक्ष आणि यांच्यात वाढती दरी, कमी होत असलेली नवीन सदस्यांची भरती आणि PLGA सोडून जाणाऱ्यांची वाढती संख्या. या सगळ्यामुळे चळवळीला कठीण काळाचा सामना करावा लागतो आहे."

सशस्त्र संघर्षांमध्ये गुप्तवार्तेला प्रचंड महत्त्व असतं. माओवाद्यांविरोधातल्या लढाईत स्थानिक लोकांना सोबत घेण्याच्या प्रयत्नांना आता चांगली फळं मिळू लागली आहेत.

सी-60 काय प्रकार आहे?

नक्षलवाद्यांच्या गनिमी काव्यामुळे मेटाकुटीला आलेल्या महाराष्ट्र पोलिसांनी गडचिरोलीत 1992मध्ये विशेष कृती दलाची स्थापना केली. या दलासाठी स्थानिक आदिवासींना भरती करण्याचं धोरण स्वीकारण्यात आलं.

Image copyright Bhamragad Police
प्रतिमा मथळा ताज्या कारवाईत जप्त केलेली शस्त्रास्त्र दाखवताना गडचिरोली पोलीस.

त्यावेळी, 60 जणांच्या पथकाला मान्यता देण्यात आली होती. त्याचं C-60 असं नामकरण झालं. पुढे त्यात भर पडत गेली आणि नक्षलवाद्यांचा बिमोड करणारं महत्त्वाचं दल अशी त्याची ओळख तयार झाली.

सध्या या पथकात हजार जवान आहेत. त्यांना गनिमी युद्धनितीचं प्रशिक्षण देण्यात येतं, प्रगत शस्त्र पुरवली जातात. तसंच त्यांना बढती आणि बक्षिसं देखील दिली जातात.

C-60 या पथकातले जवानही मारले गेले आहेत. पण या पथकात आदिवासींचा समावेश करण्यात आला आहे. त्यांना स्थानिक भाषा, लोकसंस्कृती आणि भूभागाची योग्य माहिती असते. परिणामी गनिमी युद्धतंत्रात त्या महत्त्वाच्या ठरतात.

या पथकामुळे आपल्या अस्तित्वावर घाला येण्याची शक्यता नक्षलवाद्यांना वाटते. त्यामुळेच 1990च्या उत्तरार्धात आणि 2000च्या पूर्वार्धात नक्षलींनी C-60मध्ये भरती होऊ पाहणाऱ्या उमेदवारांना परावृत्त करण्यासाठीच त्यांच्यातल्या काही उमेदवारांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना मारलं होतं.

गेल्या दोन दशकात C-60 या पथकाला माओवाद्यांना चाप बसवण्यात यश आलं आहे. रविवारी आणि सोमवारी झालेल्या कारवाया या C-60 कमांडोंच्या दलानंच केल्यात.

त्यातच C-60 दलाचं खबऱ्यांचं नेटवर्क, वेगवेगळ्या स्रोतांकडून मिळालेली कुमक, सॅटेलाईट फोनंचं विस्तारलेलं जाळं, केंद्रीय निमलष्करी दलाचं जादा पाठबळ आणि वाढवण्यात आलेली गस्त यामुळे आधीच बळ कमी झालेल्या आणि शस्त्रांचा तुटवडा भासत असलेल्या नक्षलवाद्यांवरचा दबाव वाढला आहे.

या C-60 पथकाला 2014, 2015 आणि 2016 मध्ये मिळालेलं यश हे तत्काळ उपलब्ध झालेल्या खबरींवर आधारलेलं होतं. त्या चकमकी नव्हत्या, ते योजनाबद्ध हल्ले होते. यातूनच सशस्त्र राजकीय चळवळीला कमी होत असलेला पाठिंबा अधिकाधिक स्पष्ट होत आहे.

सुखदेव आणि नंदा यांचं जेव्हा लग्न झालं, तेव्हा पूर्वाश्रमीचे अनेक कॉम्रेड्स त्या सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांच्या भूमिकेतला, सशस्त्र संघर्षाकडून दैनंदिन घरगुती जबाबदाऱ्यांचा सामना करण्यापर्यंत झालेला बदल, लहान वाटला तरी अशा अनेक छोट्याछोट्या गोष्टींमधूनच तिथली बदलती परिस्थिती लक्षात येते.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि People's Archive of Rural Indiaचे सदस्य आहेत. या लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)