ओडिशा : ईर्ष्येपोटी त्यानं पार्सल बाँब पाठवून नवरदेवाला संपवलं!

सौम्या आणि रीमा
प्रतिमा मथळा सौम्या आणि रीमा

त्याला बदला घ्यायचा होता. आपल्याला डावलून एका महिलेला प्रमोशन दिलं, याचा सल त्याच्या मनात होता. बदला घेण्याचं सारं नियोजन त्यानं अगदी चोखपणे केलं होतं. पण एक चूक अन् तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

ओडिशातल्या एका छोट्या शहरात लग्नाच्या पाचव्या दिवशी पार्सलने एक बाँब पाठवून स्फोट घडवण्यात आला होता. यात नवरदेव आणि त्याची पणजी ठार झाले होते. स्फोटात नववधू गंभीर जखमी झाली होती.

जितका रहस्यमय हा घटनाक्रम होता, तितकंच धक्कादायक आणि अतर्क्य कारण या खुनामागे आहे. काय झालं होतं लग्नानंतरच्या पाचव्या दिवशी?

23 फेब्रुवारीला ओडिशातल्या पाटनगडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला होता. 26 वर्षांच्या सॉफ्टवेअर इंजिनीअर सौम्य शेखर साहू याचं लग्न रीमा हिच्याशी झालं.

लग्नानंतर पाच दिवसांनी त्यांच्या घरी दुपारी एक पार्सल आलं. नुकतंच लग्न झालं, म्हणून एखादं गिफ्ट आलं असेल, असा विचार करून सौम्यने ते पार्सल उघडलं, आणि तोच एक मोठा स्फोट झाला!

यात सौम्य आणि त्याची पणजी जेमामनी ठार झाले, तर नववधू रीमाला गंभीर दुखापत झाली.

असा लागला छडा

'असा भयानक प्रकार कोण करेल? आणि का?' हा प्रकार पोलिसांचीही मती गुंग करणारा होता. कारण पार्सल रायपूरवरून आलं होतं, जिथे साहू कुटुंबीयांचं कुणीच ओळखीचं नव्हतं.

घटनेनंतर गेल्या दोन महिन्यात पोलिसांनी सगळ्या पैलूंचा वेध घेतला. नवरदेव, नवरीच्या जवळच्या नातेवाईकांपासून ते लग्नाला आलेल्या पाहुण्यापर्यंत अशी जवळपास 100 पेक्षा जास्त लोकांची कसून चौकशी करण्यात आली.

अखेर पोलिसांनी या प्रकरणात पुंजीलाल मेहेर नावाच्या एका कॉलेज शिक्षकास अटक केली आहे. आणि त्यांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

कोण हे पुंजीलाल मेहेर?

नवरदेव सौम्य याची आई आणि अटकेत असलेले मेहेर एकाच कॉलेजमध्ये शिक्षक आहेत. संजुक्ता यांची नुकतीच कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून नेमणूक झाली होती. आपल्या जागी त्यांची नेमणूक झाली, याचा राग मेहेर यांच्या मनात होता.

त्यातूनच त्यांनी हा प्रकार घडवून आणला.

त्यांनी इंटरनेटवरून बाँब कसा बनवतात, याची माहिती गोळा केली, आणि घरीच स्फोटकांची जुळवाजुळव करून एक बाँब तयार केला, सगळं काही आपल्या राहत्या घरी.

मग त्यांनी हा तयार बाँब पॅक करून 230 किलोमीटर दूर रायपूरला रेल्वेने प्रवास करून नेला. तिथून त्यांनी हे पार्सल पाठवलं, जेणेकरून कुणीही त्यांचा माग काढू शकणार नाही.

रायपूरहून हे पार्सल पाठवल्यानंतर ते तीन बसेसमधून गेलं. किमान चार जणांनी हे पार्सल हाताळलं. अखेर ते 20 फेब्रुवारीला सौम्यच्या घरी पाटनगडला पोहोचलं. या पार्सलवर पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव 'एस. के. शर्मा, रायपूर' असं लिहिलं होतं.

अशा या जिवंत बाँब पार्सलने जवळपास 650 किलोमीटरचा सार्वजनिक प्रवास पूर्ण केला.

"हे तर लग्नाचं काही प्रेझेंट दिसतंय. पण कुणी पाठवलंय? मी तर रायपूरमध्ये कुणालाच ओळखत नाही," असं सौम्य शेखरने आपल्या पत्नीला सांगत ते पार्सल उघडलं. आणि...

ओडिशाचे पोलीस प्रमुख आर. पी. शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की मेहेर यांनी एकट्यानेच हा अख्खा कट रचला. बाँबची निर्मिती करण्यापासून ते पार्सल पाठवेपर्यंत त्यांनी सगळं स्वतः केलं.

संजुक्ता यांची प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याचा राग त्यांच्या मनात होता, त्यातून त्यांनी हा प्रकार केला, असं त्यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)