#5मोठ्याबातम्या : राहुल गांधी यांचं विमान बिघडलं - अपघात की घातपात?

राहुल गांधी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राहुल गांधी

आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :

1. राहुल गांधींचं विमान बिघडलं

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी विमानाने दिल्लीहून कर्नाटकच्या हुबळी येथे जाताना थोडक्यात बचावले. उड्डाण घेतल्यानंतर विमानात बिघाड असल्याचं लक्षात आलं, त्यानंतर गोंधळ उडाला.

राहुल गांधी ज्या विमानात बसले होते ते विमान हेलकावे खात होतं. हवामान चांगलं असून असं घडलं.

हा काही साधारण तांत्रिक बिघाड नसून घातपाताचा प्रकार आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसने केल्याचं वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

हुबळी विमानतळावर हे विमान उतरवण्याचे दोन प्रयत्न अयशस्वी ठरले. तिसऱ्या प्रयत्नात पायलटला यश आलं. विमानाचं ऑटोपायलट मोड काम करत नव्हतं. या प्रकरणात त्या पायलटविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2. 'न्यायालयाच्या स्वातंत्र्यावर गदा'

काल ज्येष्ठ वकील इंदू मल्होत्रा यांची सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला कायदा मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. मात्र न्यायाधीश के. एम. जोसेफ यांची सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीपदी बढती केंद्र सरकारने रोखली.

त्यांची बढती रोखण्याचे अधिकार केंद्राकडे आहेत, असं सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी म्हटलं आहे. यावरून वादाला तोंड फुटलं आहे.

Image copyright ZOLNIEREK

माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांनी या घटनेला "न्यायालयाच्या स्वातंत्र्यावर गदा घालण्याचा सरकारचा डाव" असल्याचं म्हटलं आहे.

द इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार लोढा म्हणाले, "सरन्यायाधीश मिश्रा म्हणतात, सरकारने केलेल्या कृतीमध्ये काही गैर नाही. मला त्यांच्या या वागण्याचं आश्चर्य वाटतं. हे वक्तव्य करण्याआधी त्यांनी कॉलिजिअममधल्या सहकाऱ्यांची संमती घेतली होती का?"

3. 'नौटंकी बंद करा'

उत्तर प्रदेशाच्या खुशीनगरमध्ये गुरुवारी रेल्वे क्रॉसिंगवर झालेल्या रेल्वे आणि बसच्या अपघातात 13 मुलांचा जीव गेला. त्या रेल्वे फाटकाच्या ठिकाणी रेल्वे कर्मचारी नसल्यामुळं हा अपघात घडला.

घटनेनंतर रेल्वे फाटकावर रेल्वे कर्मचारी असावेत अशी मागणी करत पीडितांच्या कुटुंबीयांनी निदर्शनं केली. ही निदर्शनं सुरू असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ घनास्थळी पोहोचले. त्या वेळी पीडितांच्या कुटुंबीयांनी आणि नागरिकांनी घोषणा द्यायला सुरुवात केली.

तेव्हा "घोषणाबाजी आणि नौटंकी बंद करा. मी इथं सांत्वन करायला आलो आहे," असं म्हणत त्यांनी निदर्शकांना दरडावलं, असं वृत्त NDTVने दिलं आहे.

4. 'बुलेट ट्रेनसाठी 77 हेक्टर वनजमीन जाणार'

मुंबई-अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचं काम वेगाने सुरू करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. त्यासाठी या मार्गात येणाऱ्या 77 हेक्टर वनजमिनीचा वापर करण्यासाठी मोदी यांनी परवानगी दिली आहे, असं वृत्त द हिंदूनी दिलं आहे.

Image copyright Getty Images

वन हक्क विधेयक 2006 नुसार वनजमीन वापरण्यासाठी केंद्राची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्राने परवानगीसाठी केंद्राकडे फाईल पाठवली होती. त्यानुसार ही वनजमीन वापरण्यास केंद्राने परवानगी दिली तसंच, या प्रकल्पाचं काम लवकर पूर्ण करा, असं देखील त्यांनी सांगितलं.

5. त्र्यंबकेश्वरमध्ये 200 कोटींचा देवस्थान जमीन घोटाळा

महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संगनमत करून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरची देवस्थानच्या 184 एकर जमिनीचं बेकायदा हस्तांतरण झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. या जमिनीची किंमत जवळपास 200 कोटी रुपये आहे, अशी बातमी लोकसत्ताने पहिल्या पानावर दिली आहे.

या बेकायदा व्यवहारप्रकरणी विश्वस्त आणि अन्य व्यक्तींबरोबरच दोन तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या विरोधात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याला दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी, प्रशासकीय स्तरावर त्यांच्या विरोधात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असं लोकसत्ताने या बातमीत म्हटलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)