'व्हॅटिकन'च्या कोर्सला महाराष्ट्र अंनिसचं आव्हान; भूत दाखवा, 21 लाख मिळवा!

व्हॅटिकन Image copyright Getty Images

गेल्या आठवड्यात म्हणजेच 18 एप्रिल रोजी बीबीसी मराठीवर ...जेव्हा व्हॅटिकनमध्ये भरते भूत उतरवण्याची शाळा ही बातमी प्रसिद्ध झाली होती. ज्यात ख्रिश्चन धर्मातल्या कॅथलिक पंथाचं प्रमुख केंद्र असलेल्या व्हॅटिकन सिटीमध्ये सुरू झालेल्या नव्या कोर्सची माहिती देण्यात आली होती. या कोर्समध्ये भूतबाधासारख्या गोष्टी कशा घालवायच्या याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या कोर्सला अंनिस कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर यांनी आक्षेप घेत आव्हान दिलं आहे.


'व्हॅटिकन सिटी' सध्या एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आहे. भूतपिशाच्च आणि अतिंद्रिय शक्ती यांची बाधा झालेल्या लोकांची बाधा कशी उतरवावी याविषयीचा एक विशेष कोर्स व्हॅटिकन सिटीमध्ये घेण्यात आल्यामुळे जगभरात याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

'व्हॅटिकन सिटी' हे स्थान ख्रिश्चन धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र समजलं जातं. पोप हे सर्वोच्च ख्रिश्चन धर्मगुरू व्हॅटिकन मध्ये राहतात. जगभरातल्या ख्रिश्चन धर्मगुरूंना याठिकाणी धर्मासंदर्भातल्या विविध गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जातं.

तसं पाहिलं तर, 'चमत्कारांचा दावा' आणि 'भूतपिशाच्च' यांच्यावरील विश्वास या गोष्टी व्हॅटिकन सिटी आणि पोप यांच्यासाठी नव्या नाहीत. ख्रिश्चन धर्मीयांमध्ये एखाद्या व्यक्तीला संत घोषित करण्याचे अधिकार हे केवळ पोप आणि व्हॅटिकन सिटीला आहेत.

ख्रिश्चन धर्मात व्यक्तीला संत घोषित करण्यासाठी त्या व्यक्तीनं दोन चमत्कार केले असण्याची पूर्वअट आहे. मदर तेरेसा यांना गेल्या वर्षी संतपद देण्यात आलं. त्यासाठी त्यांनी दोन चमत्कार केल्याचा दावा व्हॅटिकन सिटीमार्फत करण्यात आला होता. त्या अनुषंगानं या चमत्कारांच्या विषयावर जगभरातल्या विवेकवादी लोकांनी जोरदार टीका केली होती.

या टीकेला न जुमानता चमत्काराचे निकष बदलण्यात आले नाहीत. आता भूतपिशाच्च उतरवण्यासाठी धर्मगुरूंचं शिक्षण करून व्हॅटिकन सिटी आणि पोप काळाची चाकं उलटी फिरवण्याचा प्रयत्न करत आहेत असं वाटतं.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा जगभरातल्या धर्मगुरूंनी या अभ्यासक्रमाला हजेरी लावली आहे.

विज्ञानवादी विचाराची खूप मोठी परंपरा असलेल्या युरोपमध्ये धर्माच्या नावावर असल्या बाष्कळ गोष्टी खपवल्या जातात ही गंभीर बाब आहे.

अभ्यासक्रमाची पार्श्वभूमी

या कोर्समागची पार्श्वभूमी सांगताना असं म्हटलं जातं की, केवळ इटलीमध्ये 50 हजार पेक्षा अधिक लोक दरवर्षी भूतपिशाच्च उतरवणे यासाठी अतिंद्रिय शक्तींवर विश्वास ठेवून धर्मगुरूंची मदत घेतात.

संपूर्ण युरोपचा विचार केला तर ही संख्या काही लाखांत जाईल. आधुनिक विज्ञानाच्या मते भूतपिशाच्च अतिंद्रिय शक्ती यासारख्या कोणत्याही गोष्टीला काहीही वैज्ञानिक आधार नाही.

कोणत्याही प्रयोगाआधारे त्यांचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही. भीतीपोटी समाजमनावर गोष्टींचा पगडा असला तरी त्यांना वास्तवात कोणताही आधार नाही. अनेकवेळा स्किझोफ्रेनिया सारख्या मानसिक आजारांमध्ये रुग्ण व्यक्तीला विविध भास आणि भ्रम होत असतात.

या लक्षणांमध्ये कोणीही बोलत नसताना आवाज ऐकू येणे, समोर एखादी व्यक्ती नसली तरीही ती दिसणे, अश्या गोष्टी आजारामुळे मेंदूत झालेल्या रासायनिक बदलातून घडून येतात.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा 2005 पासून या अभ्यासक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

विकसनशील देश नव्हे तर विकसित देशांमध्ये देखील या आजारांविषयी टोकाचे अज्ञान असल्यामुळे आजारी व्यक्तीला आणि काही वेळा त्यांच्या नातेवाईकांना देखील या गोष्टी अतिंद्रिय शक्तींमुळे अथवा भूतपिशाच्च यांच्या प्रभावातून घडून आल्या आहेत असं वाटू शकतं.

आयुष्यातील शिक्षण, अर्थकारण, कौटुंबिक ताणतणाव यांच्यामधून व्यथित झालेल्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात चाललेला वाईट कालखंड हा भूतपिशाच्च किंवा अतिंद्रिय शक्तींच्या प्रभावातून होत आहे असं वाटू शकतं.

आपल्या त्रासाला बाह्य शक्तींना जबाबदार धरण्याची आदिम मानसिकता आपल्या सर्वांमध्ये असते. चांगल्या धर्मश्रद्धेनं लोकांना आपल्या आयुष्यातल्या प्रश्नांची कारणमिमांसा तपासून त्याप्रमाणे उत्तरं शोधायला शिकवणं अपेक्षित असते. त्याऐवजी लोकांची दिशाभूल करून त्यांना अतिंद्रिय शक्तींसारख्या चुकीच्या गोष्टींच्या मागे लावणं हे धोक्याचं आहे.

अशा व्यक्तींना खरंतर मनोविकारतज्ज्ञ आणि समुपदेशनाची गरज असते. अशावेळी धर्मगुरूंना जर प्रशिक्षणच द्यायचं असेल तर अशा लोकांना असलेला त्रास कसा ओळखावा? त्यांना योग्य तज्ज्ञांकडे कसं पाठवावं? याचं प्रशिक्षण देणं आवश्यक आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा भूतपिशाच्चांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं धर्मगुरूंचं म्हणणं आहे.

ते काहीही न करता, ज्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही अशा भोंदूगिरीचं प्रशिक्षण ख्रिश्चन धर्माच्या सर्वोच्च संस्थेनं देणं हे अशा गोष्टींवर विश्वास ठेवणार्‍या लोकांची फसवणूक करणं आहे.

व्हॅटिकन वेळीच निर्णय घेणार का?

'पृथ्वी सूर्याभोवती फिरते', हे वैज्ञानिक सत्य सांगण्याचं धाडस करणार्‍या गॅलिलिओला चर्चनं मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती. गॅलिलिओनं माफी मागितल्यामुळे पुढे ती शिक्षा स्थगित झाली.

पुढे तीनशे वर्षांनी का होईना चर्चनं गॅलिलिओची माफी मागितली. या माफीचं कारण हे पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सत्य नाकारण्यामधली हास्यास्पदता आणि आपली चूक चर्चच्या लक्षात आली हे होतं.

आपली चूक दुरुस्त केल्यानं कुठल्याही धर्माची अप्रतिष्ठा होण्याऐवजी ती वाढतेच. विज्ञान हे कायम आपली चूक सिद्ध झाल्यास ती दुरूस्त करतं आणि म्हणून प्रवाही राहतं.

गॅलिलिओच्या बाबतीत झालेली चूक आणि माफीनामा यांची पुनरावृत्ती जर चर्चला नको असेल तर त्यांनी तातडीनं धर्मगुरूंना अतिंद्रिय शक्तींवर उपचार करण्याचे दिले जाणारे धडे थांबवायला हवेत. तसंच असे कोर्स सुरू केल्याबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त करायला हवी.

विज्ञानवादी विचार आणि सेवाभाव यांचा मोठा वारसा जरी युरोपला असला तरी आशा भोंदूगिरीला पाठिंबा दिल्यानं त्यांचं जगभर हसं होत आहे.

Image copyright Getty Images

सॅम हॅरिस आणि रिचर्ड डॉकिन्स सारखे अनेक विवेकवादी विचारवंत ख्रिश्चन धर्मातल्या अंधश्रद्धांवर सातत्यानं टीका करत असतात.

सॅम हॅरिस यांनी आपल्या 'एन्ड ऑफ फेथ', तसंच 'लेटर टू ख्रिश्चन नेशन' अशा बेस्टसेलर पुस्तकांच्या माध्यमातून ख्रिश्चन धर्मातल्या अंधश्रद्धांविषयी जोरदार आवाज उठवला आहे. सध्याचे पोप हे सुधारणावादी विचारांचे आहेत.

पोप पुरोगामी आहेत, पण...

समलिंगी संबंधांविषयी त्यांनी प्रागतिक मतं व्यक्त केली आहेत. असं असताना अतिंद्रिय शक्तींसारख्या भोंदूगिरीवर देखील त्यांनी विज्ञानवादी भूमिका घेणं आवश्यक आहे असं वाटतं.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येत असतात शिक्षण, व्यवसाय, नातेसंबंध, प्रेम, लग्न यामधलं अपयश आणि आर्थिक ताण अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या अडचणी असतात. त्या अडचणींना असलेली खरी कारणं शोधण्याऐवजी बाह्यशक्तींना जबाबदार धरणं आणि परिस्थिती बदलण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याऐवजी अतिंद्रिय शक्तींचा दावा करणं ही वास्तवापासून पळून जाण्याची मानसिकता आहे.

धर्म संस्थेचं खरं उद्दिष्ट हे लोकांना वास्तवाला सामोरं जाण्यासाठीची कौशल्यं देणं असायला पाहिजे. त्याऐवजी लोकांची दिशाभूल करण्याचे जे काम व्हॅटिकन सिटी मार्फत होत आहे ते नक्कीच निंदनीय आहे.

भारतामध्ये देखील भूतप्रेत आणि पिशाच्च यांची बाधा आणि ते उतरवणाऱ्या मांत्रिक बाबाबुवा यांचा सर्वत्र सुळसुळाट दिसतो.

पण महाराष्ट्रासारखं राज्य हे जेव्हा जादूटोणाविरोधी कायद्याचा स्वीकार करतं तेव्हा लोकांची फसवणूक करणाऱ्या अशा गोष्टी केवळ चर्चेचा अथवा प्रबोधनाचा विषय न राहता कायदेशीररित्या गुन्हा होतात.

Image copyright Getty Images

जर अशा स्वरूपाची घटना महाराष्ट्रात घडली तर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत दैवी दहशतीचा वापर करून फसवणे या कलमाखाली असा दावा करणाऱ्या धर्मगुरूंवर थेट कारवाई करता येऊ शकते.

या अर्थानं महाराष्ट्रातला जादूटोणाविरोधी कायदा हा केवळ देशाला नव्हे तर जगालादेखील दिशादिग्दर्शक ठरू शकतो. डॉ नरेंद्र दाभोलकर यांचे या कायद्यासाठी आग्रही राहण्यातले जागतिक संदर्भ यामुळे आपल्या लक्षात येतात.

भूतपिशाच्चांचं अस्तित्व शास्त्रीय कसोटीवर सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र अनिसनं 21 लाखांचं आव्हान दिलं आहे. जगभरातली कोणतीही व्यक्ती हे आव्हान स्वीकारू शकते.

व्हॅटिकन सिटी आणि पोप यांनी अतिंद्रियशक्ती विषयी कोर्स सुरू करण्याआधी हे आव्हान स्वीकारून पहिल्यांदा भूतपिशाच्च अतिंद्रिय शक्ती यांचं अस्तित्व सिद्ध करून दाखवलं पाहिजे.

ते सिद्ध करून दाखवण्याची त्यांची तयारी नसेल तर हा कोर्स ही लोकांची शुद्ध फसवणूक ठरेल.

जगभरातले विज्ञानवादी लोक आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या सोबतीनं महाराष्ट्र अनिस व्हॅटिकन सिटी आणि पोप यांच्या अवैज्ञानिक आणि धर्माच्या नावावर सामान्य लोकांचे शोषण करणाऱ्या या प्रशिक्षणाचा जोरदार विरोध करणार आहे.

'व्हॅटिकन सिटी' चे पदाधिकारी या गोष्टींची योग्य दाखल घेऊन हा कोर्से मागे घेतील अशी आशा आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Related Topics