दृष्टिकोन : आसारामसारख्यांना लोक देवाचा दर्जा का देतात?

आसाराम Image copyright AFP

भारत हा मध्यस्थ आणि दलालांचा देश आहे. एका अभ्यासू संशोधकाच्या मते, दलाल सर्वसामान्यांच्या आयुष्यातले अडथळे कमी करतात. मध्यमवर्गीयांसाठी तर असे भोंदूबाबा आणि दलाल एकसारखेच. म्हणून अशा बाबांचा महत्त्व केवळ राजकीय आणि आर्थिक भूमिकेपुरतं मर्यादित नाही.

अध्यात्माला फक्त ध्यानधारणेची नव्हे तर मध्यस्थीचीही आवश्यकता असते. राज्यसत्ता आणि देव या सत्तेच्या दोन केंद्रांमध्ये संवाद घडवून आणण्यासाठी अध्यात्माला दलालांची गरज असते.

व्यापक अर्थानं पाहिल्यास 'गॉडमॅन' म्हणजेच स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू अथवा बाबा हे समाजाचाच भाग असतात. त्यांना कौटुंबिक गुरूपेक्षा मोठं मानलं जातं पण स्वामी नारायण आणि रामना महानसी यांच्यासारख्या आध्यात्मिक नेत्यांपेक्षा कनिष्ठ मानलं जातं.

दैनंदिन जीवनाचा विचार केल्यास आसाराम, गुरमीत राम रहीम आणि रामपाल यांच्यासारखे बाबा म्हणजे सेवा पुरवठादार आहेत. धार्मिक विधी ही अन्न पुरवण्यासारखीच सेवा झाली आहे.

म्हणूनच अशा बाबांना खरं तर शहरी जीवनाचा, विशेषत: छोट्या शहरांमधल्या लोकांच्या जीवनाचा अविभाग्य भाग म्हणून पाहायला हवं.

त्या दृष्टीने पाहिल्यास आसाराम, राम रहीम हे आपल्या काळातील आकांक्षावादी दंतकथा बनलेले आहेत. त्यांचे आश्रम आपल्याला आनंद देणाऱ्या एखाद्या स्वप्नवत अशा भविष्यातल्या ठिकाणांचं प्रतीक वाटतात.

छोट्या शहरांतले मोठे बाबा

उत्तर भारतातल्या छोट्या उपनगरांत कोणत्याही भागात नियमितपणे सत्संग भरताना आपण पाहतो. सत्संग म्हणजे एक प्रकारची धार्मिक सभा असते, ज्यामुळे सामाजिक सलोख्याची भावना निर्माण होताना दिसते. आश्रम आणि सत्संग यामध्ये आपण सामाजिक जीवनाचे दोन स्तंभ उभे करतो.

सर्वांसाठी समानता आणि सर्वसमावेशकतेची स्वप्नं दाखवणाऱ्या अशा बाबांची प्रचिती मग तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सर्वदूर पसरते, ती छोटी शहरं नावलौकिकास येतात.

या बाबांसोबत मग अशी ही लहान गावं इतिहासात प्रवेश करतात आणि त्यांच्यामुळे त्या गावाची आधुनिकतेकडे एक वेगळी वाटचाल सुरू होते.

Image copyright SAM PANTHAKY/AFP/GETTY IMAGES

राजकीय अर्थानं विचार केल्यास हे बाबा व्होट बँक वळवण्याचं एक महत्त्वाचं माध्यम म्हणूनही काम करतात. म्हणून त्यांच्या अनुयायींमध्ये मग अनेक राजकारणी सामील होतात, त्यांच्या दरबारी भेट देतात, सभा घेतात. म्हणून राजकारणी आणि अध्यात्मिक गुरूंमध्ये अशी पैसे, प्रभाव आणि मतांची देवाणघेवाण होत असतानाच दुसरीकडे धर्म आणि राजकारणाच्या वाटाघाटीही होत असतात.

म्हणूनच अशा बाबांचं वास्तव समजून घेणं आवश्यक आहे. तो खालच्या वर्गातला, थोडाथोडकाच प्रभाव पाडू शकणारा आणि काही भागांतच सक्रीय असतो. तो 'इशा फाउन्डेशन'च्या सद्गुरू किंवा 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या श्री श्री रविशंकरसारखा जागतिक पातळीवर प्रभाव पाडणारा व्यक्ती नसतो.

तो अशा जागी राजकारण करतो जिथे धर्माच्या मॉलमध्ये काही धार्मिक उद्योजकांना दुकानं उघडण्याची संधी असते.

विक्री कशाची आणि कशी?

आपण बाबा म्हणजेच अध्यात्मिक गुरू आहोत, हे भासवण्यासाठी ते आपली भडक प्रतिमा निर्माण करतात. याचबरोबर या लोकांचं साधू किंवा संन्यासी असणं हे ते मानत असलेल्या धर्मामुळे इतरांनाही भासवणं सोपं जातं. पण त्यापलीकडे जाऊन आपली चमत्कारीक प्रतिमा उभी करण्यासाठी ते आधुनिक तंत्रज्ञान आणि कधीकधी लोकांच्या लैंगिक भावनांचीही मदत घेतात.

गेल्या वर्षी बलात्काराच्या दोन गुन्ह्यांप्रकरणी सध्या तुरुंगात असलेले हर गुरमीत राम रहीम हे साधुत्व आणि ऐशोआरामाचं एक आकर्षक मिश्रण होते, थोडंसं ओशोंसारखं. बाबा-बुवा म्हटलं की साधारण, मध्यमवर्गीय लोकांना अशाच गोष्टींचं आकर्षण वाटतं, कारण त्यांना त्यात स्वतःचं भविष्य दिसतं. म्हणून ते त्यांच्या चकाकणाऱ्या दरबारी जाऊन वारंवार नतमस्तक होतात.

Image copyright AFP/GETTY IMAGES

आज तंत्रज्ञानाचा वापर न करणं कोणत्याही बाबा-बुवाला परवडण्यासारखं नाही. तंत्रज्ञानासाठीची आवड प्रत्येक बाबांच्या आध्यात्मिक तपशीलाचा भाग आहे. आणि ही तंत्रज्ञानाबद्दलची ओढ अशा बाबांच्या "भक्तांनाही" आवडते, कारण ते स्वतः तंत्रज्ञानाविषयी महत्त्वाकांक्षी असतात, आणि त्यांना आवडतं की त्यांचे बाबाही त्यांच्यासारखेच आहेत. मध्यमवर्गाला असं वाटतं की त्यांचा 'गुरू' हा त्यांच्यासारखाच महत्त्वाकांक्षी, अत्याधुनिक असावा.

रहीमनं आपल्या चित्रपटांमधून तयार केलेली स्वत:ची 'सुपरमॅन'ची प्रतिमा हा यातलाच एक भाग होता. खरं तर एखाद्या बाबासाठी राजकीय, अध्यात्मिक आणि आर्थिक समीकरणं अचूक टिपणं तितकंच कठीण पण महत्त्वाचं आहे जितकं एखाद्या शस्त्रास्त्र बनवणाऱ्या कंपनीसाठी कॉर्पोरेट आणि राजकीय हितसंबंध जपणं.

मग बलात्कारासारखे प्रकार कुठून येतात?

आता तर लैंगिकता आणि लैंगिक प्रयोग या बाबांच्या प्रदर्शन शास्त्राचा एक भाग बनले आहेत. लैंगिक शोषण तसंच मानवी तस्करीसारख्या गोष्टींना याच बाबींतून सुरुवात होते. पण आजचे बाबा त्यांच्या साम्राज्याच्या वाढीसाठी अशा कामांकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

पण अशा कोणत्याही प्रकारचा लैंगिक पराक्रम किंवा जुलूम केला नाही तर आपल्याला कुणी आपल्या साम्राज्यात गंभीरतेने घेणार नाही, असं या बाबांना वाटत असतं.

तंत्रज्ञान, सत्ता आणि लैंगिकता अशा सर्व बाबींचा संबंध यांना भ्रष्टाचाराच्या क्षेत्रातला स्थानिक डॉन बनवतं.

सगळ्याच पुढाऱ्यांप्रमाणे या आश्रमांचं प्रारंभिक स्वरूप म्हणजे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या संस्थांचं असतं. पण असं न होता हे आश्रम एका वेगळ्याच पातळीवर काम करू लागतात, जिथे सत्ता, ताकद आणि निवडणुकीच्या राजकारणाचं जाळं विणलं जातं.

Image copyright AFP/GETTY IMAGES

लोकशाहीमध्ये धर्म आणि सत्ता यांच्यातला समतोल राखण्यासाठी हे कथित अध्यात्मिक गुरू व्यापाऱ्याच्या भूमिकेत गेलेले असतात. यामुळे छोट्या उपनगरातील अशा प्रत्येक आश्रमात काही अनिवासी भारतीयांचा एक गोतावळा तयार झाल्याचं चित्रही दिसून येतं.

समाज कल्याण की समाजकारण?

भारतातली गुन्हेगारी आणि अध्यात्म या दोन गोष्टी खऱ्या अर्थानं आधी जागतिक झाल्या होत्या. भारताच्या अर्थव्यवस्थेचं त्यानंतर बऱ्याच वर्षांनी जागतिकीकरण झाली.

आश्चर्यकारक बाब म्हणजे कथित अध्यात्मिक गुरू आणि त्यांचे आश्रम हे आपण खूप समाजसेवा करत असल्याचा दावा करत असतात. खरं तर ही समाजसेवाच नंतर लैंगिक शोषणावरंच आच्छादन बनते. कायद्याचं पालन तर केलं जातंच.

पण हळूहळू हे आश्रम एखाद्या मोठ्या कंपनीप्रमाणे काम करू लागतात आणि काही कायद्याची अडचण निर्माण झाल्यास ते कायद्यात अडथळा निर्माण करू पाहतात. पण जेव्हा कायदा त्याचं काम बजावू पाहतो तेव्हा हे आश्रम कायदा आणि सुव्यवस्थेसाठी अडचण बनतात.

आसारामच्या निकालामुळे जयपूरमध्ये कलम 144 लागू करण्याची मागणी करण्यात आली. या बाबांना असं वाटतं की ते एखाद्या राजकारण्याप्रमाणे आहेत, जे कायद्याच्याही वर आहेत.

धर्मनिरपेक्षता असो वा अध्यात्म, भारतात दोन्ही गोष्टी लोकशाही आणि न्यायव्यवस्थेसमोर एकसमान धोका निर्माण करतात. बलात्कारासारख्या प्रकरणांमध्ये अनेकदा या दोनपैकी एका गोष्टीचा कुठे ना कुठे उल्लेख असतो.

याच अर्थाने आसाराम आणि तत्सम कठुआ बलात्कार प्रकरणातले भाजपचा नेते हे सत्तेतून आलेला माज दाखवत असतात. यातून लोकशाहीला आलेला दुतोंडीपणा दिसून येतो.

अध्यात्म आणि राजकीय गोष्टींना आपण भारतीयच खतपाणी घालतो, हे दु:खद आहे. त्यांच्यावर आपण आता इतकं अवलंबून आहोत की आता त्यातून आपण मनोरंजनासाठी मजकूर शोधत असतो. ही रोजच्या जगण्यातली नाटकं सामान्यांच्या जीवनात थोडी गती, थोडी मजा आणत असते, हेही भारतीयांच्या जीवनातलं एक विडंबनच आहे.

(हा लेख लिहिणारे शिव विश्वनाथन हे Compost Heap या पर्यायी संकल्पना आणि कल्पनांवर काम करणाऱ्या गटाशी संबंधित तज्ज्ञ आहेत.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)