UPSC टॉपर अनुदीप यांचा यशाचा प्रवास!

अनुदीप Image copyright Anudeep durishetty

"माझे वडील मला नेहमी सांगत असत, खेळाचं मैदान असो वा परीक्षा आपलं लक्ष्य नेहमी त्यात नैपुण्य मिळवणं हे असलं पाहिजे. त्यांची हीच शिकवण मी माझ्या आयुष्यात आणि परीक्षेत अंगीकारली आणि निकाल तुमच्यासमोर आहे."

अनुदीप दुराशेट्टी भरभरून सांगत होते. "माझ्या आई-बाबांचा तर अजूनही विश्वास बसत नाहीये."

भारतीय आयकर विभागात काम करणाऱ्या अनुदीप यांच्यासाठी हा दिवस सर्वसामान्य दिवसांप्रमाणेच होता. पण 'त्या' क्षणी सर्वकाही बदललं. केंद्रीय लोकसेवा आयोगानं 2017 या वर्षासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. सेवेसाठी पात्र ठरलेल्या 990 जणांची निवड झाल्याची घोषणा UPSCनं केली आणि अनुदीप एका अभूतपूर्व क्षणाचा साक्षीदार बनले. देशातल्या सर्वांत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये अनुदीप पहिले आले.

Image copyright अनुदीप

"हा निश्चितच माझ्या कुटुंबासाठी सर्वांत मोठा आनंदाचा क्षण आहे. जेव्हा मी माझ्या आईला सांगितलं मी परीक्षेत पहिला आलो तेव्हा तिच्या डोळ्यातून पाणी आलं आणि माझ्या वडिलांचं तर विचारुच नका. त्यांचा तर अजूनही विश्वास बसत नाहीये की मी देशात पहिला आलो आहे. हा खरंच माझ्यासाठी अविश्वसनीय क्षण आहे," भारावलेल्या अनुदीप यांनी बीबीसीला सांगितलं.

UPSCमध्ये पहिला आल्याचा आनंद अनुदीप यांना नक्कीच आहे पण ते सांगतात, "मी खूप आनंदी आहे, पण रॅंकपेक्षा मोठी जबाबदारी मात्र पुढेच आहे. त्या जबाबदारीची मला पूर्ण कल्पना आहे."

या ठिकाणी येण्यासाठी आपल्याबरोबरच अनेकांना कष्ट करावे लागले याची अनुदीप यांना जाणीव आहे. "मी माझ्या कुटुंबीयांचे, मित्रांचे, शिक्षकांचे आणि त्या सर्वांचे आभार मानतो ज्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलो," ते सांगतात.

आतापर्यंतचा तुमचा प्रवास कसा झाला असं बीबीसी हिंदीनं त्यांना विचारलं आणि त्यांनी त्यांचा प्रवास उलगडून सांगितला.

राजस्थानच्या बिट्स पिलानीमधून इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इंस्ट्रुमेंटेशन या विषयातून पदवी घेतलेल्या अनुदीपनं UPSCचा ध्यास घेतला. यशाचा पहिला अनुभव त्यांना 2013 साली आला. त्यावेळी त्यांची निवड IRSसाठी झाली. पण या ठिकाणी थांबायचं नाही असा निश्चय करून पुढच्या तयारीला ते लागले.

ते सांगतात, "मी नोकरी सांभाळून अभ्यास करू लागलो. मी हैदराबादमध्ये असिस्टंट कमिश्नर या पदावर काम करतोय. मला साप्ताहिक सुटीच्या दिवशी अभ्यासाला वेळ मिळत असे. जो काही वेळ मिळत असे त्या वेळी मात्र मी अभ्यासच करत असे."

Image copyright Anudeep durishetty

"मला असं वाटतं की, या परीक्षेत गुणवत्ता हा खूप महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर त्याला एकाग्रतेची जोड हवी. आपण नेहमी सर्वोत्कृष्ट बनण्याचा ध्यास धेतला पाहिजे. केवळ मेहनत आणि उत्कृष्ठतेचा ध्यास याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्याचं फळ तुम्हाला आपोआप मिळतं."

देशात UPSCची तयारी लाखो जण करतात. ही देशातली सर्वांत मोठी, कठीण आणि प्रतिष्ठेची स्पर्धा परीक्षा मानली जाते.

"ही खूप अवघड परीक्षा आहे. कारण देशातील अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात. आज ही तुम्ही यादी बघाल तर तुमच्या लक्षात येईल की, अनेक पात्र विद्यार्थी या यादीमध्ये झळकले आहेत. आपण किती तास अभ्यास करतो यापेक्षा महत्त्वाचं आहे, आपण कसा अभ्यास करतो."

'प्रेरणास्रोत तुमच्या आजूबाजूलाच असतात'

इतकं मोठं यश मिळवायचं म्हणजे साहजिकच त्या पाठीमागे कुणीतरी प्रेरणास्रोत असायला हवा. तुमची प्रेरणा काय असं बीबीसीनं विचारलं असता अनुदीपनं दोन व्यक्तींचा उल्लेख केला.

अनुदीपला इतिहासाची आवड आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा आपल्यावर प्रभाव आहे, असं अनुदीप म्हणाले.

"लिंकन माझ्यासाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहिले आहेत. त्यांनी अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीमध्ये देशाचं नेतृत्व केलं. महान नेता कसा असावा याचं ते उत्तम उदाहरण आहेत. मी नेहमी त्यांच्यापासून प्रेरणा घेतो."

अनुदीप यांचा दुसरा प्रेरणास्रोत आहेत त्यांचे वडील. या यशाचं श्रेय ते आपल्या वडिलांना देतात. "माझे वडील तेलंगणातील गरीब भागातून आले आहेत. त्यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर सर्वकाही मिळवलं. त्यांच्यामुळेच मला चांगलं शिक्षण मिळालं. त्यांनी नेहमीच मला मदत केली आहे. ते प्रचंड मेहनत करतात आणि उच्च गुणवत्तेचा ध्यास घेतात. मी नेहमीच त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न केला आहे. ते माझ्यासाठी रोल मॉडेल आहे," या शब्दात अनुदीप यांनी वडिलांबद्दलची भावना व्यक्त केली.

अनुदीप सांगतात, "आपले प्रेरणास्रोत नेहमी आपल्या आजूबाजूलाच असतात, फक्त त्यांना ओळखता आलं पाहिजे."

'छंदामुळं आपण नैराश्य आणि तणावापासून दूर राहतो'

UPSCची तयारी करायची म्हणजे अभ्यासाचा ताण येणार हे ओघानं आलंच. मग हा ताण तुम्ही दूर कसा ठेवला? असं विचारलं असता अनुदीप सांगतात, "फुटबॉल खेळल्यामुळे मी तणावाला दूर ठेऊ शकलो."

लहानपणापासूनच अनुदीप फुटबॉल खेळतात आणि पाहतातही.

"फुटबॉल माझ्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. मी भरपूर खेळतो आणि पाहतो देखील. जेव्हाही मी तणावात असतो तेव्हा मला फुटबॉलनंच आधार दिला आहे. या व्यतिरिक्त मला वाचनाची आवड आहे. मी फारसं कथा कादंबऱ्यामध्ये रमत नाही पण नॉन फिक्शन पुस्तकं वाचायला मला आवडतात,"असं अनुदीप यांनी सांगितलं.

"मला जेव्हाही रिकामा वेळ मिळतो तेव्हा मी एकतर वाचतो नाहीतर खेळतो. मला वाटतं प्रत्येकालाच काही छंद असायला हवा. छंदामुळं आपण नैराश्य आणि तणावापासून दूर राहतो. इतकंच नाही तर त्यामुळे आपलं चारित्र्य निर्माण होतं आणि आपलं व्यक्तिमत्त्व विकसित होतं."

कुठल्या क्षेत्रात काम करायची इच्छा आहे?

भविष्यात कुठल्या क्षेत्रात काम करायची इच्छा आहे यावर ते सांगतात, "सरकार जी जबाबदारी देईल ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. पण माझी शिक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे. मला वाटतं आपली शिक्षण क्षेत्रात प्रगती होणं आवश्यक आहे. विकसित देश जसं की स्कॅंडेव्हियन देशांचा जास्त भर शिक्षणावरच असतो."

"मजबूत शिक्षण व्यवस्था हेच त्यांच्या विकासाचं मूळ आहे. जर आपल्याला नव्या भारताची निर्मिती करायची असेल तर आपल्याला आपली शिक्षण व्यवस्था सुधारणं आवश्यक आहे. आपण या दिशेनी पावलं टाकत आहोत आणि भविष्यातही आपल्याला शिक्षणावर जोर देणं आवश्यक आहे. या विकास यात्रेमध्ये खारीचा वाटा उचलण्याची माझी इच्छा आहे," असं अनुदीप सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)