#5मोठ्याबातम्या : निम्म्या महाराष्ट्रात दूषित पाणी

पाणी Image copyright Getty Images

पाहूयात विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या आजच्या ठळक बातम्या.

1. निम्म्या महाराष्ट्रात दूषित पाणी

राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त जिल्ह्यांतील विहिरी, हातपंप आणि इतर ठिकाणचे जलस्त्रोत दूषित आढळले असल्याचं सकाळनं पहिल्या पानावर छापलेल्या विशेष वृत्तात म्हटलं आहे.

राज्यात सर्वाधिक 27 टक्के दूषित पाणी वाशीममध्ये आढळलं. त्यापाठोपाठ हिंगोलीमध्ये 24 टक्के आणि चंद्रपूरमध्ये 21 टक्के पाणी दूषित आहे.

उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे पाणी दूषित होण्याचं प्रमाण वाढलं असल्याचं प्रयोगशाळेचं म्हणणं आहे.

प्रत्येकाला शुद्ध पाणी पुरवठा करण्याची स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे. मात्र महानगरपालिका, नगरपरिषदा असो की ग्रामपंचायत नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्यास असर्मथ असल्याचे राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या मार्च महिन्याच्या अहवालात दिसते. दूषित पाणी पिण्यासाठी वापरल्यामुळे पटकी, कावीळ, विषमज्वर, अतिसार अशा जलजन्य साथरोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती असते.

2. हिंदू तरुणानं घेतली जैन धर्माची दीक्षा

डोंबिवली इथल्या एका 19 वर्षींय हिंदू तरुणानं जैन धर्माची दीक्षा घेतली आहे.

Image copyright SAM PANTHAKY/GETTY IMAGES

लोकमतच्या वृत्तानुसार, शहराच्या पूर्व भागातील तुकारामनगरात राहणाऱ्या मंदार म्हात्रे यानं शेकडो जैनांच्या उपस्थितीत जैन धर्मात प्रवेश घेतला. उर्वरीत आयुष्य जैन धर्माच्या प्रचार आणि प्रसाराकरिता अर्पण करण्याचा निर्धार त्यानं केला आहे.

मंदारवर जैन धर्माच्या प्रार्थनेचा प्रभाव पडला. या संस्कारामुळे त्यानं जैन धर्माची दीक्षा घेतली असून यास त्याच्या आईवडिलांची मान्यात असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

3. न्यायमूर्ती जोसेफ नियुक्ती प्रकरणात कॉलेजिअम बैठक

सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांनी पुढील आठवड्यात कॉलेजिअमची बैठक बोलवली आहे. या बैठकीचा अजेंडा ठरलेला नसलेला तरी न्यायमूर्ती जोसेफ यांच्या सर्वोच्च न्यायालयातील नियुक्तीसंदर्भात या बैठकीत चर्चा होऊ शकते असं द इंडियन एक्सप्रेसनं म्हटलं आहे.

Image copyright Getty Images

बुधवारी पाच सदस्यीय न्यायमंडळाची बैठक होणार आहे. न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांच्या नियुक्तीसंदर्भात सरकारनं पुनर्विचार करण्याविषयीचा मुद्दा यात चर्चेला येण्याची शक्यता आहे. अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

सुट्ट्यानंतर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज सुरू होईल. तर, बुधवारी ही बैठक होत आहे. या बैठकीचा अजेंडा कळवण्यात आलेला नाही. न्यायमूर्ती जोसेफ नियुक्ती प्रकरणात आता काय होणार, याचं उत्तर या बैठकीनंतरच मिळेल.

4. रुग्णाचा डोळा उंदरानं कुरतडल्याचा नातेवाईकांचा आरोप

ठाण्यातील 27 वर्षीय रुग्णाच्या कुटुंबानं रुग्णालयातील उंदरांनी रुग्णाचा डोळा कुरतडल्याचा आरोप केला आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रातिनिधीक

द टाइम्स ऑफ इंडियाच्या मुंबई आवृत्तीनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. जोगेश्वरी इथल्या बाळ ठाकरे ट्रॉमा केअर हॉस्पीटलमध्ये रुग्णाचा उजवा डोळा उंदरांनी कुरतडला असा आरोप कुटुंबियांनी केला. रुग्णालयानं मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.

एका अपघातानंतर परमींदर गुप्ता यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शस्त्रक्रियेनंतर ते कोमात गेल्याने आणि रुग्णालयाचा खर्च वाढत चालल्याने त्यांना बाळ ठाकरे ट्रॉमा केअर हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आलं.

रुग्णालयाच्या जनरल वॉर्डमध्ये उंदराने डोळ्याचा चावा घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.

5. कुलगुरूपदी सुहास पेडणेकर

मुंबई विद्यापीठाला अखेर नवे कुलगुरू मिळाले आहेत.

Image copyright Getty Images

रसायनशास्त्राचे प्राध्यापक तसेच माटुंग्याच्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास रघुनाथ पेडणेकर यांची कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. असं वृत्त महाराष्ट्र टाइम्सनं दिलं आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये डॉ. संजय देशमुख यांना विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरुन कार्यमुक्त केलं होतं. तेव्हापासून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूपद रिक्त होतं. कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते.

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन केली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)