लौंडा नाच : बिहारमधला बिनबायकांचा तमाशा जिवंत ठेवण्यासाठी त्याची ही धडपड - पाहा व्हीडिओ

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : बिहारमधला बिनबायकांचा तमाशा पाहिलात का?

एप्रिलचा महिना होता. रात्रीचे 8 वाजले होते. तिने विनाओढणी चोळी आणि लहेंगा घातला होता. ओठांवर लिपस्टिक होतं, डोळ्यांत काजळ, कपाळावर बिंदी आणि लांबसडक केसांवर रबरबँड होता. आणि ती दिल्लीतल्या 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मध्ये पुरुषांच्या प्रसाधनगृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होती.

"सर, तुम्ही या प्रसाधनगृहात जाऊ शकत नाही." गार्डचा मागून आवाज आला.

"भैय्या, माझं नाव राकेश आहे. ओळखलं नाही का? तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी! आता आमचा शो आहे. थिएटर ऑलिम्पिकमध्ये आम्ही लौंडा नाच करणार आहोत."

दिल्लीत यंदा पहिल्यांदाच थिएटर ऑलिम्पिक फेस्टिवल पार पडलं. जगभरातल्या जवळपास 30 देशांतल्या 25,000 कलाकारांनी यात सहभाग नोंदवला.

समारोप सोहळ्यात राकेश कुमार यांच्या 'लौंडा नाच'ने सर्वांची मनं जिंकली.

राकेश दिल्लीतल्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (NSD) शिकतात. हे तेच NSD आहे जिथे अनुपम खेर, पंकज कपूर आणि ओम पुरी यांच्यासारखे प्रसिद्ध अभिनेते शिकले आहेत.

जिद्द

राकेश मूळचे बिहारमधल्या सिवानचे. NSD मध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांना सलग पाच वेळा परीक्षा द्यावी लागली. लेखी परीक्षा उत्तीर्ण होणारे राकेश शेवटच्या राऊंडमध्ये मात्र नेहमी अयशस्वी होत. पण जिद्दीच्या जोरावर अपयशाचा पाडाव करता येतो. राकेश यांची जिद्द शेवटी त्यांना NSDमध्ये घेऊन आली.

आणि आज मुलीच्या वेशभूषेत राकेश यांनी दमदार लौंडा नाच केला.

Image copyright BBC/ RAKESH KUMAR

लौंडा नाच आहे काय?

बिहारच्या ग्रामीण भागात लौंडा नाच खूप लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातल्या बिनबायकांच्या तमाशाबद्दल तुम्ही ऐकलं असेल. हा बिहारमधला तसाच एक प्रकार.

यात स्त्रियांचा वेष परिधान करून पुरुष नृत्य करतात. भोजपुरीचे शेक्सपियर समजले जाणाऱ्या भिखारी ठाकूर यांना हे कलाकार आदर्श मानतात.

ठाकूर यांचं 'बिदेसिया' हे नाटक राकेश यांनी त्यांच्या गुरूंसोबत अनेक व्यासपीठांवर सादर केलं आहे. पण आता ही कला हळूहळू लयास जात आहे.

यात पुरुष महिलांप्रमाणे मेक-अप करून नाचतात. पण याला अश्लील संवाद आणि इशाऱ्यांसाठीही ओळखलं जातं.

Image copyright BBC/ RAKESH KUMAR

NSD सारख्या व्यासपीठावर लौंडा नाच सादर करण्याची कल्पना राकेश यांना कशी सुचली?

"व्यावसायिकरीत्या लौंडा नाच करेन, असा विचार मी कधीच केला नव्हता. लहान असताना एखाद्याच्या लग्नाला गेलो की तिथे मुली नाचताना दिसायच्या. मग मी स्वत: त्यांच्यासोबत नाचायला लागायचो. घरी आल्यानंतर मात्र खूप मार खावा लागायचा. पण तरीही मी ऐकायचो नाही ," राकेश सांगतात.

राकेश यांची लौंडा नाचविषयीची आवड तिथूनच सुरू झाली.

बालपणीची एक घटना आठवत राकेश सांगतात, "सहावीत होतो तेव्हा एकदा मॅडमनी सांगितलं - 'ज्यांना ज्यांना नाटकात काम करायचं असेल त्यांनी हात वर करा'. मी नाटकात भाग घेतला आणि मुलीची भूमिका निभावली. माझ्या भूमिकेची लोकांनी खूप स्तुती केली. यानंतर तर मला यो गोष्टीचा नादच लागला."

Image copyright BBC/ RAKESH KUMAR

'कला आहे, देह व्यापार थोडीच करतो!'

लौंडा नाचला आणखी एक वेगळा पैलू आहे. यात काम करणाऱ्या मुलांकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं.

"लौंडा जा ता, माल ठीक बा, चल खोपचा में चल (म्हणजे 'हा लौंडा नाच करतो. माल ठीक आहे. चल खोपच्यात चल') अशा कमेंट्स राकेश यांनीही ऐकल्या आहेत.

अशा कमेंट्स ऐकून असं वाटतं की लोक जणू सेक्स वर्करसोबतच बोलणी करत आहेत.

"आम्ही देह व्यापार थोडीच करतो? ही तर एक कला आहे," राकेश सांगतात.

पण समाजासारखंच त्यांच्या परिवारानंही या कलेचा तिरस्कार केला का?

राकेश बालपणीचा एक किस्सा ऐकवतात - "माझ्या परिवारातल्या कुणीच मला कधी थांबवलं नाही. माझ्या वडिलांनी तर सर्वप्रथम व्यासपीठावर येऊन मला बक्षीस दिलं होतं, तेही 500 रुपये. खूप चांगलं वाटलं होतं."

Image copyright BBC/RAKESH KUMAR

"माझे वडील सैन्यात आहेत. त्यांच्याकडे बघितल्यास एकदम कठोर वाटतात. पण त्यांनी मला प्रोत्साहित केलं तेव्हा मात्र मला खूप छान वाटलं," राकेश पुढे सांगतात.

NSDच्या व्यासपीठावर लौंडा नाच

"ढोल आणि हार्मोनियम वाजवून, झाल वाजवून जेव्हा पुरुष उड्या मारत नृत्य करतो तेव्हा त्यात वेगळीच मजा असते," असं राकेश लौंडा नाचबद्दल सांगतात.

"लहानपणापासूनच माझा आवाज गोड होता आणि मी नृत्य चांगलं करायचो. आता तर मी मेक-अप करून, खोटे स्तन लावून तर मी पूर्णपणे परफॉर्मन्समध्ये हरवून जातो," राकेश पुढे सांगतात.

पण आता ही कला लयास जाण्याच्या मार्गावर आहे, असं राकेश यांना वाटतं. "असा नाच करणारे खूप कमी लोक उरले आहेत. त्यामुळे ही कला मरायला नको," असं त्यांना वाटतं.

"NSDच्या व्यासपीठावर आणून मी या कलेला एक ओळख देऊ पाहत आहे, जेणेकरून ही कला जिवंत राहील."

हेही वाचलंत का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
भारतातील काही मोजक्याच पुरुष बेली डान्सरपैकी इशान हिलाल एक आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)