मशीद बांधण्यासाठी हिंदू आणि शीख करत आहेत मदत! कुठे?

मूम

भारतातले धार्मिक गट अनेकदा एकमेकांशी भिडतात. त्यातून हिंसाचारही होतो. पण पंजाबमधल्या एका गावात धार्मिक सलोखा टिकवून ठेवणारी एक उल्लेखनीय गोष्ट घडत आहे.

गवंडी काम करणारे नजीम राजा खान हे त्या गावात शिव मंदिर बांधत होते. तेव्हा त्यांच्या मनात मशिदीचाही विचार आला.

40 वर्षीय राजा खान मुस्लीम आहेत. ते हिंदूचं मंदिर बांधत होते. पण त्यांना स्वत: प्रार्थना करायची असल्यास आसपास मशीद नाही.

"नमाज पढण्यासाठी इथे जागाच उपलब्ध नव्हती. नातेवाईक यायचे तेव्हा प्रार्थनेसाठी जागा नसल्यानं गैरसोय व्हायची," असं खान सांगतात.

ही गोष्ट त्यांनी त्यांच्या मूम गावातल्या 400 मुस्लीम कुटुंबीयांसमोर मांडली. पण ही सर्वच मंडळी गरीब असल्यानं मशिदीसाठी जागा विकत घेण्याची त्यांची क्षमता नव्हती.

आम्हाला थोडी जागा द्याल?

या भागातले बहुसंख्य मुस्लीम हे अकुशल मजूर असून ते बांधकामाच्या साईटवर काम करतात. तर उर्वरित 400 हिंदू आणि 4000 शीख समुदायातील लोक हे त्यांच्या तुलनेनं सुस्थितीत आहेत.

मंदिराचं काम सुरू होऊन 18 महीने झाले होते. बांधकाम पूर्ण व्हायला आलं तेव्हा राजा यांनी एक विचार मांडला.

प्रतिमा मथळा नजीम राजा खान (उजवीकडे)

त्यांनी मंदिर प्रशासनाकडे म्हणणं मांडंलं. ते म्हणाले, "तुम्हाला तुमचं नवीन मंदिर लवकरच मिळेल. तसंच एक जुनं मंदिरही आहे. पण आम्हा मुस्लिमांकडे मात्र प्रार्थना करण्यासाठी मशीद नाही. ती बांधण्यासाठी जागा विकत घ्यायची म्हटली तर त्यासाठी पैसेही नाहीत. तुम्ही आम्हाला थोडीशी जागा द्याल का?"

एका आठवड्यानंतर राजा यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मंदिर प्रशासनानं मंदिरासमोरील जवळपास 900 स्क्वेअर फूट इतकी जागा त्यांना देण्याचं ठरवलं.

"माझं मन आनंदानं भरून आलं होतं. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नव्हते," राजा त्यावेळच्या परिस्थितीचं वर्णन करतात.

मंदिर व्यवस्थापन समितीतील पुरषोत्तम लाल यांनी सांगितलं की, "ती मागणी अत्यंत मनापासून करण्यात आली होती. आम्ही सर्व एकत्र येऊन आनंद आणि दु:ख वाटून घेतो. असं असताना मुस्लिमांकडे त्यांची मशीद नसणं, ही अयोग्य गोष्ट होती."

दोन महिन्यांपासून राजा आणि इतर गवंडी यांनी एकत्र येऊन मशीद बांधण्याचं काम सुरू केलं आहे.

मशीद उभारण्याकरता लागणाऱ्या निधीसाठी शीख समुदाय मदत करत आहे, तसंच या मशिदीची भिंत गुरुद्वाराला लागूनच आहे. अल्पसंख्याक समाज अनेकदा पक्षपातीपणा झाल्याची तक्रार करताना दिसतो. पण इथे मात्र देशातल्या तीन धर्मांमधील सांप्रदायिक सौहर्दाचं हे एक दुर्मीळ उदाहरण पाहायला मिळतं.

मर्यादा आहेत का?

अलिकडच्या काळात, मानवी हक्क संघटनांनी देशात अती उजव्या विचारसरणीच्या राष्ट्रवादी सरकारांच्या कार्यपध्दतीवर टीका केली आहे.

यामुळे भीती आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण झाल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

असं असलं तरी, मूममध्ये हिंदू, मुस्लीम आणि शीख असे तिन्ही समुदाय एकत्र नांदताना दिसतात. त्यांच्यात वाद उद्भवल्याचा कोणताही इतिहास नाही. सर्व समुदायातील लोक कोणत्याही ठिकाणच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करतात.

बहुतेक हिंदू गुरुद्वारामध्ये जातात आणि त्यातले काही शीख लोकांप्रमाणे पगडीही परिधान करतात. तसंच ते इतरांच्या घरी असलेले धार्मिक विधी, पूजापाठ यामध्ये सहभागी होतात.

गुरुद्वारामधील धर्मोपदेशक गियानी सुरजीत सिंग सांगतात, "हिंदूंसाठी पवित्र असलेल्या गीतेचं पठण शीख हॉलमध्ये होतं."

"लोक या जागेकडे फक्त गुरुद्वारा म्हणून पाहत नाहीत तर सामाजिक कार्यासाठी एकत्रित येण्याची जागा म्हणून बघतात," सिंग पुढे सांगतात.

मंदिर निर्माण प्रक्रियेत सक्रिय असलेले शिक्षक भारत राम सांगतात, "आम्ही नशीबवान आहोत की एकमेकांपासून तोडणारे तसंच आमच्यामध्ये दरी निर्माण करणारे राजकीय नेते आमच्याकडे नाहीत."

"प्राचीन काळापासून आमच्या गावातल्या लोकांमध्ये बंधुत्वाचं वातावरण आहे आणि यामुळेच आम्ही लगेच मशीद बांधण्यासाठी जागा दिली," राम पुढे सांगतात.

राजकारण आडवं आलं नाही तर भारत आणि पाकिस्तानमधील लोकांमध्येही कटुता राहणार नाही, असा त्यांचा दावा आहे.

प्रतिमा मथळा राजा त्यांचे मित्र भरत शर्मा यांच्यासोबत.

निधी तसंच जमिनीच्या देणग्यांबद्दल कुणीही रागावलेलं नाही. उलट मशीद फक्त मुस्लिमांसाठी होणार नसून ती सर्व गावकऱ्यांसाठी आहे, अशी भावना गावकरी व्यक्त करतात.

असं असलं तरी या एकात्मतेलाही मर्यादा आहेतच. आपल्या मुला-मुलींचे इतर समुदायातल्या मुला-मुलींशी लग्न लावून द्याल का, असं विचारल्यावर मिळालेली उत्तरं वेगळी होती.

"बंधुत्व ही एक वेगळी गोष्ट आहे. शीख आणि मुस्लीम हे वेगळे धर्म आहेत," असं शीख पंचायतीचे सदस्य चूड सिंग यांनी सांगितलं.

"आमच्या गावात अशाप्रकारची कोणतीही गोष्ट स्वीकारली जाणार नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शिक्षक भरत शर्मा सांगतात, "असं काहीही भूतकाळात घडलेलं नाही आणि असं काही भविष्यात घडेल याची सुतराम शक्यता नाही."

"देव सगळीकडेच असतो. मग ते गुरुद्वारा असो, मशीद असो की मंदीर!" शर्मा म्हणतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)