#5मोठ्याबातम्या : अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या 2 कार्यकर्त्यांची गोळ्या घालून हत्या

Image copyright FACEBOOK/Yogesh Ralebhat
प्रतिमा मथळा योगेश राळेभात

1. अहमदनगर : राष्ट्रवादीच्या 2 कार्यकर्त्यांची गोळ्या घालून हत्या

केडगाव इथं दोन शिवसैनिकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचं प्रकरण चर्चेत असतानाच अहमदनगरमधील जामखेड इथं शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

लोकमतच्या वृत्तानुसार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश अंबादास राळेभात (वय 30 वर्ष) आणि युवा कार्यकर्ता राकेश उर्फ रॉकी अर्जुन राळेभात अशी हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत.

हे दोघं दुकानासमोर बसलेले असताना संध्याकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास दोन मोटारसायकलवरून तीन अज्ञात व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून आल्या होत्या. त्यांनी गावठी कट्ट्यातून योगेश आणि राकेश यांच्यावर लागोपाठ 8 गोळ्या झाडल्या.

त्यानंतर तीनही हल्लेखोर पसार झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांच्या हत्याकांडांमुळे जिल्हा पुन्हा हादरुन गेला आहे.

2. 'नरेंद्र मोदी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण'

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दोघेही ब्राह्मणच आहेत असं वक्तव्य गुजरात विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी केलं आहे. गांधीनगर येथे भरलेल्या 'मेगा ब्राह्मण बिजनेस समिट'मध्ये ते बोलत होते, असं वृत्त इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.

Image copyright Getty Images

प्रत्येक ज्ञानी व्यक्ती ही ब्राह्मणच असते. त्यामुळे हे बोलताना मला संकोच वाटत नाही की डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण आहेत. एखाद्या ज्ञानी व्यक्तीला ब्राह्मण म्हणण्यात काहीच गैर नाही. त्याच आधारावर मी हे अभिमानाने म्हणू शकतो, की आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील ब्राह्मण आहेत, असं ते म्हणाले.

ब्राह्मण हे सत्तेचे भुकेले नसतात. कृष्ण, राम आणि चंद्रगुप्त मौर्य यांना घडवण्यात ब्राह्मणांचं खूप मोठं योगदान आहे. चाणक्याला वाटलं असतं तर ते गादीवर बसू शकले असते, पण त्यांनी चंद्रगुप्त मौर्यांकडेच राज्य सोपवलं असं त्रिवेदी म्हणाले.

3. मराठा मोर्चा आता संघर्षाची भूमिका

मराठा क्रांती मोर्चाची शांततेची भूमिका संपलेली आहे, आता संघर्षाची भूमिका यापुढे घेणार आहोत, असं मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सरकारला इशारा दिला आहे.

Image copyright Getty Images

सकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक शनिवारी झाली. या बैठकीत सरकारनं मराठा समाजासाठी काढलेला जीआर मराठा क्रांती मोर्चातर्फे फाडण्यात आला.

दोन वर्षे आम्ही खूप संयम पाळला आहे. शांततेनं आम्हाला काहीच मिळालेलं नाही म्हणून आता संघर्षाची भूमिका आम्ही घेत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रात जर उद्रेक झाला तर त्याला सरकारच जबाबदार असेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला.

4. आसाराम म्हणाले, 'अच्छे दिन आयेंगे'

आसाराम यांची एक 15 मिनीटांची ऑडियो क्लिपल व्हायरल झाल्यानं राजस्थान पोलीस सध्या चांगलेच कोंडीत सापडले आहेत.

Image copyright Getty Images

जोधपूर जेलमध्ये आजन्म कारावासाची सजा भोगणाऱ्या आसाराम यांनी फोनवर समोरच्या व्यक्तीला आपला जेलमधील कार्यकाळ अल्पच असल्याचं सांगत 'अच्छे दिन आयेंगे' असं आश्वासित केल्याची ऑडियो क्लिप व्हायरल झाली असल्याचं वृत्त द टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

जोधपूर जेलमधून आसारामनं फोन केल्यानंतर समोरच्या व्यक्तीने हा ऑडियो रेकॉर्ड केला असावा असा दावा पोलिसांनी केला आहे. अहमदाबाद इथल्या मोटेरा आश्रमातील निशांत जाधवानी याला हा कॉल करण्यात आला होता.

5. हागणदारीमुक्त गाव नसल्यास मोफतचा तांदूळ बंद- किरण बेदी

हागणदारीमुक्त आणि स्वच्छता नसलेल्या गावांना मोफत तांदूळ मिळणार नाही, असा इशारा पुड्डचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी दिला आहे. त्यावरुन नवा वाद निर्माण झाल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.

Image copyright SAJJAD HUSSAIN/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा किरण बेदी

पुड्डचेरीमध्ये सरकारमार्फत मोफत तांदूळ दिला जातो. मात्र गाव कचरामुक्त व्हावे, उघड्यावर शौचाला जाण्याचे प्रकार बंद व्हावेत यासाठी कठोर उपाययोजना राबविण्याचे संकेत बेदी यांनी दिले.

बेदी यांनी गावांना चार आठवड्यांची मुदत दिली आहे. ग्रामस्थांना गाव हागणदारीमुक्त आणि स्वच्छ असल्याचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)