चार वर्षांच्या मुलाची आई कशी बनली UPSC टॉपर?

अनु Image copyright Anu kumari/bbc

हरियाणातल्या सोनीपतच्या अनु कुमारी यांनी UPSC परीक्षेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. अनु कुमारींना चार वर्षांचा मुलगा आहे. नोकरी सोडून, घर सांभाळून अभ्यास करणं हे त्यांच्यासाठी खडतर आव्हान होतं. बीबीसीनं अनु कुमारी यांची त्यांच्या सोनीपतमध्ये असलेल्या घरी मुलाखत घेतली. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दुसऱ्या क्रमांक आणण्याचं आव्हान त्यांनी कसं पेललं, याची ही संघर्षकथा.

दोन वर्षांपूर्वी त्यांनी खासगी नोकरी सोडली होती. अनु सांगतात, "20 लाख रुपये वार्षिक पॅकेज असलेली नोकरी सोडणं हे खरं तर खूप हिमतीचं काम होतं. पण घरच्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यामुळं मी हे करू शकले. माझ्या आयुष्यातला हा सर्वांत कठीण निर्णय होता पण आता वाटतं की हाच माझ्या आयुष्यातला सर्वांत चांगला निर्णय होता."

अनु सांगतात, "मी खासगी क्षेत्रात 9 वर्षं काम केलं. मग मला वाटू लागलं मी हे काम आयुष्यभर करू शकत नाही. मी जर हेच करत राहिले तर माझं आयुष्य मला अपूर्ण वाटलं असतं. मी अनेकदा नोकरी सोडायचा विचार केला."

Image copyright Anu kumari/bbc

पण नोकरी सोडणं हा खूप मोठा निर्णय नव्हता का? असं त्यांना विचारल्यावर त्या सांगतात, "UPSCची तयारी करण्याचा मी निर्णय घेतला. यामध्ये जर मला यश मिळालं नाही तर शिक्षिका होईन पण पुन्हा खासगी क्षेत्रात परतणार नाही, असं मी ठरवलं होतं."

'मुलाची आठवण आली की मी रडत असे'

"UPSCची तयारी करण्यासाठी नोकरी सोडावी असा आग्रह माझा भाऊ आणि मामानं माझ्याकडे धरला. ज्या वर्षी टीना दाबी UPSCमध्ये पहिली आली त्या वेळी माझ्या मामानं मला मेसेज केला आणि म्हटलं जर UPSCसाठी तू नोकरी सोडली तर तुझा सर्व खर्च मी उचलण्यास तयार आहे. माझ्या भावानेच माझा प्रीलिमचा फॉर्म भरला," असं अनु सांगतात.

दीड महिन्याच्या तयारीवर अनु यांनी प्रीलिम दिली. पहिल्या प्रयत्नात त्या प्रीलिम देखील पास झाल्या नाहीत. पण त्यांनी लगेच अभ्यासाला सुरुवात केली.

Image copyright Anu kumari/bbc
प्रतिमा मथळा आपल्या भावासोबत अनु कुमारी

त्या सांगतात, "माझा पगार महिन्याला 1,60,000 रुपये होता. त्यामुळे मला आर्थिक स्थैर्य प्राप्त झालं होतं. पैशाअभावी माझ्या आयुष्यात आता अडचण निर्माण होणार नव्हती. मला हा विश्वास आला होता की जर मी आता पास झाले नाही तरी माझ्या मुलाचा मी योग्यरीत्या सांभाळ करू शकते."

नोकरी करत असताना त्यांचा जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्येच जात असे. अनु यांच्या सासरच्या लोकांना वाटत होतं की त्यांनी कंबाइन ग्रॅज्युएट लेव्हलची परीक्षा द्यावी. "...पण मी UPSCचं द्यावी असा आग्रह माझ्या भावानं धरला होता," असं अनु यांनी सांगितलं.

अनु यांना चार वर्षांचा एक मुलगा आहे. जेव्हा मी तयारी सुरू केली तेव्हा तो तीन वर्षांचा होता. मुलाबद्दल बोलताना त्या भावुक होतात.

त्या सांगतात, "माझा मुलगा माझ्याशिवाय राहू शकत नव्हता. त्याला सोडून राहणं माझ्यासाठी खूप अवघड काम होतं. त्यामुळं मी गच्चीवर जाऊन त्याच्या आठवणीत रडत असे."

अनुबद्दल सांगताना त्यांच्या आईला गहिवरून आलं. त्या म्हणाल्या, "लहानपणापासूनच अनु अभ्यासात हुशार होती. आमच्या घरात फार जागी नव्हती. पण अनु एका कोपऱ्यात तिचा अभ्यास करत असे."

आव्हानांचा कसा करणार सामना?

अनु सांगतात, "आपल्या व्यवस्थेमध्ये नक्कीच काही दोष आहेत. आपल्याला त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पण मी खासगी नोकरी आणि घर एकाच वेळी सांभाळलं. तेव्हा मला वाटतं की मी भविष्यात देखील येणाऱ्या आव्हानांचा सामना करू शकेन.

"मी प्रामाणिक आहे. महात्मा गांधी म्हणत असत तुमच्यामध्ये भले काही गुण नसले तरी चालतील पण तुमचा निर्धार असायला हवा गुण आपोआप येतील. असं असू शकतं की माझ्यात सध्या काही गुण नाहीत पण वेळेनुसार ते येतील असं मला वाटतं."

"तुम्ही स्वतःला सशक्त समजता का असं मला मुलाखतीवेळी विचारण्यात आलं होतं. त्यांना मी म्हटले की सशक्त होण्यासाठी शिक्षण आणि आत्मनिर्भर असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमचं आरोग्य देखील चांगलं असायला हवं, देवाच्या दयेनं माझ्याकडं या सर्व गोष्टी आहेत. आज हरियाणातील मुली माझ्याकडे प्रेरणास्रोत म्हणून पाहतात,"असं अनु सांगतात.

"ज्यावेळी एखादी महिला स्वतःला आतून कणखर समजते, निर्भय समजते, आर्थिक रूपाने ती स्वतंत्र असते, आपल्या मुलांसाठी निर्णय घेऊ शकते त्याच वेळी ती खऱ्या अर्थाने सशक्त झाली असं आपण म्हणू शकतो."

आपल्या यशाचं श्रेय त्या आपल्या आईला आणि मावशीला देतात. "मी जेव्हा अभ्यास करत असे तेव्हा माझी मावशी मला जागेवर जेवण आणून देत होती. या दोघीच माझ्या यशाच्या शिल्पकार आहेत," असं त्या अभिमानाने सांगतात.

'कूल असणं महत्त्वाचं'

"मुलाखतीवेळी तुमचं व्यक्तिमत्त्व तपासलं जातं. तुमच्या ज्ञानापेक्षा तुम्ही कसे आहात याला जास्त महत्त्व असतं. तुम्ही किती कूल आहात आणि शांत स्वभावाचे आहात, आव्हानांना सामोरं जाण्याची तुमची तयारी आहे की नाही, कठीण काळात तुम्ही शांत राहू शकता की नाही याची तपासणी ते करतात."

"जेव्हा मी मुलाखतीला जाऊ लागले तेव्हा मी माझ्या मनात अशी कल्पना केली की घरातील मोठ्या माणसांशी बोलायला जात आहे. त्यामुळं मी त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार असं ठरवलं होतं. ते लोक माझ्यापेक्षा जास्त हुशार आणि अनुभवी असतील याची मला पूर्ण कल्पना होती. मुलाखतीला जाताना मी आनंदी होते," असं त्या हसून सांगतात.

Image copyright Anu kumari/bbc

"मला अनेक प्रश्न विचारले गेले पण मला वाटतं ते मला चिंताग्रस्त करण्यासाठी किंवा घाबरवण्यासाठी केले गेले नव्हते तर माझी तर्कशक्ती कशी आहे हे तपासण्यासाठी केले असावेत. मला जे पॅनेल आलं होतं त्यापैकी एक सदस्य फार कडक शिस्तीचे वाटत होते. सर्वांनी माझ्याकडं पाहून स्मितहास्य केलं पण त्यांनी केलं नव्हतं. मग जेव्हा त्यांनी मला प्रश्न विचारला तेव्हा उत्तर द्यायला सुरुवात करण्याआधी मी स्मितहास्य केलं. त्यांनी देखील केलं आणि तणाव निवळला. माझी मुलाखत एकदम छान झाली होती."

'हरियाणातली परिस्थिती बदलत आहे'

"सोनीपत सारख्या जिल्ह्यामध्ये मुलींची संख्या कमी आहे. पण आता परिस्थिती बदलत आहे. मानुषी छिल्लर आणि साक्षी मलिकसारख्या मुली पुढे येत असतील तर परिस्थिती बदलत आहे असंच म्हणावं लागेल," असं त्यांचं मत आहे.

"माझ्या वडिलांनी माझ्या भावांपेक्षा माझ्या शिक्षणावर अधिक खर्च केला आहे असं त्या सांगतात. शहरी भागात मुलींना संधी आहे पण अजूनही ग्रामीण भागातील मुलींची परिस्थिती बिकट आहे. मुलींनी जास्तीत जास्त प्रमाणात लोकसेवा आयोगाच्या परीक्षा द्याव्यात असं मी म्हणेन. मुलींनी स्वप्न पाहावीत आणि ती पूर्ण करावीत असं मला वाटतं."

भविष्यात मला मुलींसाठी काम करायला आवडेल असं त्या सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)