#5मोठ्याबातम्या : सरकारी नोकरीपेक्षा पान टपरी सुरू करा-विप्लब देव

भाजप, त्रिपुरा Image copyright Twitter
प्रतिमा मथळा त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लब देव

वेगवेगळी वृत्तपत्र आणि वेबसाईट्सवरी आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या

1. सरकारी नोकरी नव्हे, पानाची टपरी टाका

तरुणांनी सरकारी नोकरी आणि राजकारण्यांच्या मागे फिरण्यापेक्षा स्वत:ची पानटपरी सुरू करा, असा सल्ला देत त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी नव्या वादाला खतपाणी घातलं आहे.

शनिवारी त्रिपुरातल्या प्रज्ञा भवनमध्ये त्रिपुरा वेटेरनरी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत विप्लब बोलत होते. 'एबीपी माझा'नं यासंदर्भातली बातमी दिली आहे.

सरकारी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेऊन पशुसंवर्धन क्षेत्रासह विविध विभागात काम सुरू करून स्वावलंबी होण्याचा सल्ला विप्लब यांनी दिला.

सरकारी नोकरीसाठी तरुण वेळ आणि पैसा वाया घालवतात. याच तरुणांनी सरकारी नोकरीऐवजी पानाची टपरी काढली असती तर आतापर्यंत बँक खात्यात पाच लाख रुपये जमा झाले असते, असं ते म्हणालेत.

याआधीही विप्लब यांनी आपल्या वक्तव्यांनी वाद ओढवून घेतला होता. आगरतळा येथे आयोजित एका कार्य़क्रमात मेकॅनिकल किंवा इंजिनिअरिंग करणाऱ्यांनी सिव्हिल सर्व्हिसमध्ये न येण्याचा सल्ला बिप्लब यांनी दिला होता.

2. ठाण्यात मुलींचा जन्मदर राज्यात नीचांकी

गेल्या वर्षभरात राज्यातल्या मुलींच्या जन्मदरात अगदी नगण्य प्रमाणात वाढ झाली असली तरी ठाणे जिल्ह्यात दर हजार मुलांमागे मुलींचं प्रमाण अवघं 770 असल्याचं स्पष्ट झालं आहे.

एका वर्षात हे प्रमाण दीडशेहून अधिक आकड्यांनी खाली आल्यामुळे ठाण्यात मुलींच्या जन्मदराबाबत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. 'लोकसत्ता'नं याबाबत बातमी दिली आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या अहवालातून हे वास्तव समोर आलं आहे. ठाण्यापाठोपाठ नगर जिल्ह्यात मुलींच्या जन्मदराची घसरण सुरू आहे.

या अहवालानुसार 2016-17 काळात मुलींचा जन्मदर 922 होता. 2017-18 काळात हे प्रमाण 926 झालं आहे. ठाणे जिल्हा मुलींच्या जन्मदरात नीचांकी आला आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ठाणे जिल्ह्याचा मुलींचा जन्मदर नीचांकी आहे.

सातत्यानं खालावणाऱ्या मुलींच्या जन्मदराची दखल घेत ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी चार महिन्यांपूर्वी जिल्हास्तरीय बैठकीचं आयोजन केलं होतं.

याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व रुग्णालयं आणि दवाखान्यांची धडक मोहिमेअंतर्गत तपासणी करण्याचे तसंच तालुकानिहाय आणि महापालिका क्षेत्रामध्ये चार सदस्यीय पथकं तयार करण्याचंही सूचित करण्यात आलं होतं.

आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूरमध्ये मुलींचा जन्मदर 1,176 एवढे आहे. हजाराचा आकडा पार केलेला चंद्रपूर राज्यातील एकमेव जिल्हा आहे.

3. सार्वजनिक बँकातील 50 कोटींवरील कर्जाचं ऑडिट होणार

अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी यापुढे 50 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या कर्जाचं ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन एक्स्प्रेस'नं यासंदर्भातली बातमी दिली आहे.

ऑडिट पूर्ण झाल्यानंतर भविष्यात थकित कर्ज ठरू शकतील अशा अकाऊंट्सची माहिती एका अहवालाद्वारे तयार करण्यात येईल. हा अहवाल सरकार आणि आर्थिक गुन्हे तपास यंत्रणांना सादर करण्यात येईल.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यानंतर बँकांनी खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

घोटाळ्याची शक्यता भासणाऱ्या अकाऊंटची माहिती चीफ व्हिजिलन्स ऑफिसरशी चर्चा करून थेट सीबीआयला देण्यात येईल. थकित कर्ज ठरू शकणाऱ्या खात्यांसंदर्भात सेंट्रल इकॉनॉमिक इंटेलिजन्स ब्युरोकडून चाचपणी करण्यात येईल. तसंच फॉरेन्सिक ऑडिट कोर्टात पुरावा म्हणून सादर केला जाऊ शकतो.

4. मुंबई हल्ला खटल्यातील सरकारी वकिलाला हटवले

मुंबईवर 26 नोव्हेंबर 2011 रोजी झालेल्या हल्ल्याच्या खटल्याप्रकरणी पाकिस्तानच्या गृह मंत्रालयानं मुख्य सरकारी वकील चौधरी अझहर यांना बाजूला केलं आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'नं यासंदर्भातली बातमी दिली आहे.

अझहर हे पाकिस्तान सरकारनं दिलेल्या सूचनांचं पालन करत नाहीत, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पाकिस्तान गृहमंत्रालयाच्या या निर्णयामुळे मुंबईवरील हल्ल्याप्रकरणाच्या सूत्रधारांवर कायद्याचा फास आवळण्याच्या भारताच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मुंबई हल्ला

लष्कर-ए-तय्यबा या संघटनेनं मुंबई शहराला वेठीस धरताना केलेल्या हल्ल्यात 166 नागरिकांनी जीव गमावला होता. 300 हून अधिकजण जखमी झाले होते.

अझहर यांना पदारून हटवल्याच्या वृत्ताला फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या एका अधिकाऱ्यानं दुजोरा दिला. अझहर हे 2009 पासून या खटल्याशी संलग्न होते. अझहर यांना फक्त मुंबई हल्ल्याशी निगडीत खटल्यातून बाजूला करण्यात आलं आहे. मात्र बेनझीर भुत्तो हत्या प्रकरणात काम सुरूच ठेवण्याचा आदेश त्यांना देण्यात आला आहे.

5. राष्ट्रवादीचं मराठा कार्ड

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं संघटनात्मक फेरबदल करताना जयंत पाटील यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. रविवारी पुण्यात झालेल्या बैठकीत जयंत पाटील यांनी सूत्रं स्वीकारली. 'लोकमत'ने यासंदर्भातली बातमी दिली आहे.

प्रवक्ते नवाब मलिक यांची प्रदेश उपाध्यक्षपदी तर हेमंत टकले यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)