ग्राऊंड रिपोर्ट: 'सन्माना'साठी हिंदू धर्म सोडून ऊना पीडितांचा बौद्ध धम्मात प्रवेश

ऊना

"त्या धर्माला मानन्यात काय अर्थ आहे, जिथं आपला आदरच होत नाही."

गुजरातमधल्या ऊनाजवळच्या मोटा समाधियाला गावात लगबग सुरू होती. एक मंडप टाकून तिथं अनेकजण बसलेले दिसत होते. गौतम बुद्धांची एक मोठी प्रतिमा त्या ठिकाणी होती आणि काही भिक्खू एका कार्यक्रमाची तयारी करत होते.

हा कार्यक्रम होता दीक्षा घेण्याचा.

हिंदू धर्मात आदर मिळत नाही म्हणून अंदाजे 300 दलितांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.

ऊना मारहाण प्रकरणातल्या पीडितांनी देखील यावेळी धम्मदीक्षा घेतली.

2016 साली याच गावात दलितांना कथित गोरक्षकांनी मारहाण केली होती. गाईंना मारण्याचा आरोप करून कथित गोरक्षकांनी वाश्रम सरवैया आणि त्यांच्या भावांना अर्धनग्न करून बेदम मारहाण केली होती.

या मारहाणीच्या घटनेनंतर गुजरातच्या दलितांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं. त्यांचा राग अनावर झाला आणि राज्यात जागोजागी निदर्शनं झाली. या घटनेमुळे नाराज झालेल्या अनेकांनी रविवारी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.

ऊना पीडितांनी आधीच सांगितलं होतं की ते आपला धर्म बदलणार आहेत. त्यांचा आरोप होता की हिंदू धर्मात त्यांना सातत्यानं भेदभावाला सामोरं जावं लागत आहे. तसंच, सरकारकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही, असं देखील त्यांचं म्हणणं होतं.

रविवारच्या या कार्यक्रमाचं आयोजन सरवैया कुटुंबीयांनी केलं होतं. या कार्यक्रमात गुजरातच्या काना-कोपऱ्यातून आलेले दलित सहभागी झाले होते. ऊना प्रकरणानंतर दलित नेता अशी ओळख निर्माण झालेले जिग्नेश मेवाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित नव्हते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा

सरवैया कुटुंबीयांनी डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा घेतल्या.

कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या लोकांचं स्वागत करण्यात बालू सरवैया अगदी मग्न होते. दूर गावावरून आलेल्या लोकांसाठी या ठिकाणी त्यांनी खाण्या-पिण्याची व्यवस्था देखील केली होती. यावेळी तापमान अंदाजे 43 डिग्री सेल्सियस होतं, पण कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत कुणीही आपली जागा सोडली नाही.

"आजपासून मी एका नव्या आयुष्याला सुरुवात करत आहे," असं बालू यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं.

बौद्ध धर्माचा प्रसार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिकवणीवर चालणं हेच माझं ध्येय असेल असं सरवैया यांनी म्हटलं.

का बदलला धर्म?

सरवैया बंधुंपैकी सर्वांत जास्त वाश्रम सरवैया बोलके आहेत. ते सांगतात, त्या धर्माला मानन्यात काय अर्थ आहे जिथं आपला आदरच होत नाही. त्यांच्या अंगावर पांढरे कपडे होते आणि गर्दीला नियंत्रित करणाऱ्या कार्यकर्त्यांना ते सूचना देत होते.

"बौद्ध धर्म माणसाला प्रेम करणं शिकवतो. फक्त एखाद्या गाईवर किंवा जनावरावर प्रेम करा अशी बौद्ध धर्माची शिकवण नाही," असं ते म्हणतात.

पोलिसांचा बंदोबस्त

कार्यक्रमावेळी सरकारकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गीर सोमनाथचे पोलीस अधीक्षक हितेश जॉयसर यांनी सांगितलं, "कार्यक्रमासाठी 350 पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यात तीन पोलीस उपाधीक्षक आणि महत्त्वपूर्ण ठिकाणी पोलीस निरीक्षक तैनात करण्यात आले होते."

या गावात एक बौद्ध मठ बांधायचा असं सरवैया कुटुंबीयांचं म्हणणं आहे. वापरात नसलेल्या जमिनीचे अधिकार घेऊन त्या ठिकाणी मठ बांधायचा सरवैया कुटुंबीयांचा विचार आहे. ऊना प्रकरण होण्याआधी या गावात मेलेल्या जनावरांची कातडी कमावली जात असे.

"प्रत्येक गावाबाहेर कातडी कमावण्यासाठी जागा मोकळी सोडण्यात आलेली असते. साधारणतः ही जागा दलितांच्या देखभाली खालीच असते. हे प्रकरण होण्यापूर्वी आम्ही तशाच जागी काम करत होतो. आता त्याच जागी आम्हाला बौद्ध मठ बांधायचा आहे. यासाठी आम्ही सरकारला अर्ज करून कायदेशीर प्रक्रिया सुरू करू," असं सरवैया सांगतात.

अपूर्ण वचन

तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी पीडितांना नोकरी आणि शेतीसाठी जमीन देण्याचं वचन दिलं होतं. पण दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात सरकारनं स्पष्टीकरण दिलं होतं की अशा प्रकारचं कुठलंही वचन लिखित स्वरुपात देण्यात आलं नाही.

सरकारच्या रेकॉर्डमध्ये बौद्ध धर्म स्वीकारला याची नोंद व्हावी म्हणून जनहित याचिका दाखल केली जाऊ शकते. सरकार दफ्तरी त्यांची नोंद अद्यापही हिंदू अशीच आहे.

ऊना येथील दलित नेते केवल सिंह राठोड सांगतात, 2013मध्ये बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या दलितांची अजूनही रेकॉर्डवर नोंद हिंदू अशीच आहे.

गुजरातमध्ये धर्मांतर रोखण्यासाठी कायदा बनवण्यात आला आहे. तो कायदा घटनाबाह्य आहे असं राठोड यांचं म्हणण आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)