#MeToo : बॉलिवूडमध्ये काम करताना तरुणींचा लैंगिक छळ होतो का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : 'मी तुला रोल दिला, तर तुलाही मला खुश करावं लागेल'

राधिका आपटे, उषा जाधव, रणवीर सिंग, फरहान अख्तर आणि अनेक अभिनेत्रींशी बोलून या प्रश्नाचा बीबीसीनं घेतलेला वेध.

देशातल्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी हजारो तरुणी मुंबईच्या मायानगरीत बॉलिवूड स्टार व्हायचं एक स्वप्न घेऊन येतात. त्यांना बॉलिवूडमध्ये नाव कमवायचं असतं पण त्यांच्या नशिबात भलतंच घडतं. बॉलिवूडमधल्या कामाच्या बदल्यात आपलं लैंगिक शोषण झाल्याचं अनेक अभिनेत्रींनी बीबीसी प्रतिनिधी रजनी वैद्यनाथन आणि प्रतीक्षा घिल्डियाल यांना सांगितलं.

सहा वर्षांपूर्वी सुजाता (बदलेलं नाव) मुंबईत पोहोचली तेव्हा ती केवळ 19 वर्षांची होती. त्यांच्याकडे बॉलिवूड इंडस्ट्रीमधलं कुणीही ओळखीचं नव्हतं. अभिनयही जेमतेम यायचा. मात्र फिल्म इंडस्ट्रीत कसा प्रवेश करावा याचा सल्ला देणारे लोक त्यांना लगेच भेटले.

अशाच एका कास्टिंग एजंटने सुजाताला त्यांच्या घरी भेटायला बोलावले. अशा भेटी सहसा घरी होत असतात त्यामुळे त्यांना यात काही वावगं वाटलं नाही.

पण घरी गेल्यावर त्यांना एक विचित्र अनुभव आला.

'त्यांनं मला घरी बोलावलं आणि...'

"तो माझ्या अंगाला कुठंही स्पर्श करू लागला. त्यांनं माझ्या कपड्याच्या आत हात घातल्यावर मात्र मी त्याला थांबवलं. मग तो रागात म्हणाला, इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असंल तर तुझा हा रुबाब चालणार नाही," असं सुजाता सांगतात.

सुजाता यांच्या दाव्याचा बीबीसी स्वातंत्ररीत्या पडताळणी करू शकली नाही. पण, इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी मला खूप वेळा लैंगिक छळाला सामोरं जावं लागलं, असं सुजाता यांचं म्हणणं आहे.

शेवटी सुजाता यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पण त्यांनी तक्रार नोंदवूनच घेतली नाही. उलट, 'फिल्मी लोक त्यांना पाहिजे ते करू शकतात,' असं उलट उत्तर दिलं.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ दिल्लीत 10 पैकी 9 स्त्रियांनी मेट्रो, बसमध्ये लैंगिक छळ झाल्याचं सांगितलं.

हे सगळं बीबीसीला सांगत असताना त्यांनी आपली ओळख लपवण्याची विनंती केली. उघडपणे बोलणं महागात पडेल असं त्यांना वाटतं.

त्यांच्या मते, एखादी अभिनेत्री जाहीरपणं बोलली तर तिच्यावर सहज प्रसिद्धी मिळवून पैसे कमवण्याचा उद्योग असल्याचा ठपका ठेवला जातो. त्यांमुळे स्वत:ची प्रतिमा खराब होण्याचा धोका वाढतो.

तरुणी उघडपणे बोलायला का घाबरतात?

दरम्यान, फिल्म इंडस्ट्रीमध्ये कामाच्या बदल्यात सेक्शुअल फेवर्स मागणं ही काही नवीन गोष्ट नाही असं काहीचं म्हणणं आहे.

लैंगिक शोषण आणि घाणेरड्या टोमण्यांना सामोरं जावं लागलेल्या अशा डझनभर अभिनेत्रींशी बीबीसीनं चर्चा केली.

स्वत:ची बदनामी होऊ नये म्हणून यापैकी बहुतेकींनी आपली ओळखी लपवली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेत्री उषा जाधव या मात्र या विरोधात उघडपणे बोलल्या.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा वीरप्पन आणि भूतनाथ सारख्या अनेक सिनेमात उषा जाधव यांनी काम केलं आहे.

अशा पद्धतीने पुढे येऊन बोलल्यामुळं इतर तरुणी आवाज उठवतील, असं त्यांना वाटतं.

उषा जाधव मुंबईत पहिल्यांदा आल्या तेव्हा त्यांना अनेकांनी घाबरवलं होतं. काहींनी तर सिनेमात काम करायचं असेल तर डायरेक्टर आणि प्रोड्युसरसोबत झोपावं लागंल, असंही सांगितल्याचं त्या म्हणाल्या.

असाच एक प्रसंग आठवून त्या सांगतात, "आम्ही तुम्हाला काही देत आहोत त्याच्या मोबदल्यात तुम्हालाही काही द्यावं लागणार, असं एक व्यक्ती म्हणाली."

नाईलाजानं तरुणींना अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. आपण प्रत्येक वेळी लैंगिक संबंधाना विरोध करत आलो आहोत, असं उषा ठामपणे सांगतात.

पण त्यांच्या या भूमिकेमुळं त्यांना काही अडचणींनाही सामोरं जावं लागलं. फिल्ममध्ये काम देणार नाही असंही सांगण्यात आलं होतं.

"तुला चांगला रोल मिळणार नाही. तुझ्याबरोबर काहीही चांगलं होणार नाही, अस एकानं चक्क शाप दिल्यावर.. तू एवढाही मोठा माणूस नाहीस, असं मी त्याला खडसावलं...", असं त्या सांगतात.

बॉलीवूडमधले दिग्गज लोक गप्प का आहेत?

फिल्म इंडस्ट्रीमधले बहुतेक दिग्गज लोक याबाबत बोलणं जाणून-बुजून टाळतात, असं अभिनेत्री राधिका आपटे सांगतात.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा बॉलिवूडमधली संधी सरळ मार्गे मिळत नसल्यानं मुलींचं लैंगिक शोषण होतं, असं राधिका आपटे सांगतात.

राधिका या पहिल्यापासून पडद्यावर आणि पडद्यामागेसुद्धा महिलांच्या हक्कांचे मुद्दे मांडत आल्या आहेत. "मी या विरोधात उघडपणे आवाज उठवते. पण काही कारणांमुळे गप्प बसणाऱ्या आवाज न उठवणाऱ्या बऱ्याच अभिनेत्रींबद्दल मला वाईट वाटतं," असं त्या म्हणाल्या.

बॉलीवुडमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग कठीण असल्यानं तरुणींना अशा प्रसंगांना सामोरं जावं लागत आहे, असं राधिका सांगतात.

भारतीय फिल्ममध्ये संधी मिळणं हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं. रोल देण्याच्या अगोदर तुमचा जनसंपर्क, सामाजिक स्थान या गोष्टी ध्यानात धरल्या जातात. या उलट, हॉलीवुडमध्ये जायचं असंल तर योग्य प्रशिक्षण घेऊन तुम्ही काम करू शकता, असं राधिका सांगतात.

बॉलीवुडमध्ये #Metoo चं वादळ येईल का?

बॉलीवुडमध्येही #Metoo चं वादळ यावं असं त्यांना वाटतं. पण इंडस्ट्रीमधल्या मोठ्या व्यक्तींनी याविरोधात आवाज उठवल्याशिवाय असं घडणार नाही, अशी खंत त्या व्यक्त करतात.

बॉलीवुडमधली आणखी एक नामांकित अभिनेत्री कल्कि कोचलिन यांनीही बीबीसीशी चर्चा केली. याआधी बालपणात त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत त्या बोलल्या आहेत.

"तुम्ही सामान्य नागरिक असाल तर तुमच्याकडे कुणीही लक्ष देत नाही. पण त्याच जागी एखादी सेलेब्रिटी असलात तर त्याची मोठी बातमी होते," असं काल्की सांगतात.

लैंगिक शोषण हे केवळ बॉलीवुड पर्यंतच मर्यादित राहिलं नाही. प्रादेशिक फिल्म इंडस्ट्रीमध्येही असाच प्रकार घडत असल्याच सांगितलं जातं.

काही दिवसांपूर्वी तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमधल्या अभिनेत्री श्री रेड्डी यांनी एका फिल्म असोशिएशनच्या परिसरातच स्वत:चे कपडे उतरवले. कास्टिंग काउच विरोधात आपण आवाज उठवत आहोत, असं त्या सांगतात.

सुरुवातीला त्यांच्यावर प्रसिद्धी मिळवण्याचा सोपा उद्योग केल्याचे आरोप झाले. काही स्थानिक फिल्म असोशिएशननं त्यांच्यावर बंदीही घातली होती. पण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं हस्तक्षेप करत त्यांच्यावरची बंदी हटवली. तेलुगू इंडस्ट्रीतील अशा प्रकाराची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे.

"इंडस्ट्रीमधले लोक माझ्या नग्न फोटोंची मागणी करतात. मग मी सगळ्यांसमोर माझे कपडे काढले तर काय बिघडलं?" असं श्री रेड्डी यांनी विचारलं होतं.

काही दिवसांपूर्वी केरळमधल्या एका तरुण अभिनेत्रीचं अपहरण करून तिचा लैंगिक छळ केल्याची घटना पुढे आली. त्यानंतर इथल्या इंडस्ट्रीतील महिलांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी एक समूह स्थापन केला आहे.

पुरुष अभिनेत्यांचही लैंगिक शोषण?

इंडस्ट्रीमध्ये केवळ महिलांचं शोषण होतं असं नाही. अभिनेता रणवीर सिंह यांनीही 2015मध्ये दिलेल्या एका मुलाखतीच्या आपल्यालाही कास्टिंग काउचला सामोरं जाव लागलं होतं, असं सांगितलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा 2015मध्ये एका कास्टिंग काउचच्या प्रसंगावेळी रनवीर सिंह यांना अशाच एका प्रसंगाला सामोरं जाव लागलं होतं.

रणवीर सारख्या बॉलीवुडमधल्या काही ठराविक अभिनेत्यांनी पुरुषांच्या लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवला आहे. अशाच प्रकारे अभिनेता, गायक आणि दिग्दर्शक फरहान अख्तर यांनी याबाबत जाहीरपणे आवाज उठवला आहे.

त्यांनी Men Agaisnt Rape And Discrimination (MARD) नावाच्या एका अभियानाची सुरुवात केली. याद्वारे देशातल्या दूर गावात लैंगिक शोषणाविरोधात जागरुकता निर्माण केली जात आहे.

बॉलीवुडमधल्या अशा घटना महिलांनी जाहीररीत्या मांडाव्यात, असं त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. ते म्हणतात, "काही ठिकाणी आमच्या बाबत असं घडत आहे महिला जेव्हा सांगतात तेव्हा मी त्यांना गांभीर्यानं घेतो."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा देशातल्या दुरच्या गावात लैंगिक शोषणाविरोधात जागृकता निर्माण करण्यासाठी अभिनेता फरहान अख्तर यांनी MARD नावाचं अभियान सुरू केलं आहे.

बॉलीवुमध्येही #metooचं वादळ निर्माण होईल अशी फरहान यांना आशा आहे. पण महिला जाहीरपणे बोलतील तेव्हाच लोकांना ते करण्याच्या अगोदर लाज वाटेल, असं त्यांचं मत आहे.

जोपर्यंत इंडस्ट्रीमधल्या मोठ्या व्यक्ती लैंगिक शोषणाविरोधात आवाज बुलंद करणार नाहीत तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही, असं बऱ्याच अभिनेत्रींनी बीबीसीला सांगितलं.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
BBC EXCLUSIVE : राधिका आपटे आणि उषा जाधव जेव्हा कास्टिंग काऊच बद्दल बोलतात...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)