आसारामना शिक्षा झाली पण जेलमध्ये पाठवणाऱ्या कुटुंबाची फरफट सुरूच - BBC EXCLUSIVE

आसाराम
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक रेखाटन

हवेत पसरलेला साखर कारखान्यांतून बाहेर पडणारा मळीचा दर्प शहरापासून दूर आल्याची जाणीव करून देतो. राजधानी दिल्लीपासून साडेतीनशेपेक्षा किलोमीटर दूर उत्तर प्रदेशातल्या शाहजहांपूरची ही पहिली ओळख.

काकोरी कटाचे प्रमुख राम प्रसाद बिस्मिल्ल आणि अशफाकउल्ला खान सारख्या क्रांतिकारांचं हे गाव. या गावाच्या मातीतच साहस आणि शौर्याचा वसा आहे. या मातीनेच बंडाचा आणि निर्भयपणे जगण्याचा वारसा दिला आहे.

याच मातीशी नाळ सांगणाऱ्या त्या कुटुंबाने आसाराम यांच्या स्वैराचाराविरोधात आवाज उठवला. आसारामविरुद्ध जाणं आव्हानांना आमंत्रण होतं. पण त्यांनी सत्याशी सचोटी राखायचं ठरवलं. प्रवास संघर्षपूर्ण आणि अडथळ्यांनी भरलेला होता. पण त्यांनी हार न मानता लढा सुरूच ठेवला.

ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असलेल्या पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्याची माझी ही तिसरी वेळ. खटल्याच्या सुरुवातीपासूनच त्यांच्या घराच्याबाहेर एक पोलीस चौकी बनवण्यात आली आहे. या चौकीत ठेवलेल्या रजिष्टारमध्ये नाव आणि पत्ता लिहल्यानंतर मी वऱ्हांड्यात दाखल झाले. घराच्याबाहेर तीन ट्रक उभे होते.

पीडितेच्या भावानं माहिती दिली की, ट्रकमध्ये साड्यांचे गठ्ठे टाकून सुरतला पोहोचवण्यात येत आहेत. "सध्या सीझन असल्यानं काम मिळालं आहे. आधीच्या तुलनेत व्यवसाय कमी झाला आहे," असं त्यांनी सांगितलं.

वऱ्हांड्यातच तयार करण्यात आलेल्या कार्यालयात पीडितेचे वडील साधा कुर्ता पायजमा घालून बसले होते. मालाच्या आवाक-जावकशी निगडीत कागदपत्रांवर सह्या करण्यात ते मग्न होते. मी आत पोहोचताच त्यांनी काही मीडियावाल्यांच्या वागणुकीवर नाराजी जाहीर केली.

कुटुंबीय मीडियावर नाराज

ते म्हणाले, "आम्ही जोधपूरमध्ये होतो तेव्हा कुणालाही आमची पर्वा नव्हती. सुनावणी होईपर्यंत कुठल्याच मीडियानं आमची दखल देखील घेतली नाही. अनेक वृत्तपत्रं आसारामच्या समर्थकांचं म्हणणं मांडत होते. आमचंही म्हणणं मांडा असं त्यांना सांगायचो तर कुणीच ऐकून घ्यायला तयार नव्हतं. आता निकालानंतर सगळेच धावत आलेत."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पीडितेच्या कुटुंबीयांना या खटल्यामुळे प्रचंड त्रास भोागावा लागला.

सतत येत-जात असलेल्या पत्रकारांपासून वाचण्यासाठी त्यांनी मला त्यांच्या मोठ्या मुलाबरोबर पहिल्या मजल्यावर बांधण्यात आलेल्या खोलीत प्रतीक्षा करण्यासाठी पाठवलं.

नवीन कडक कायद्यानंतरही काही मीडिया संस्थांनी त्यांच्या घराची दृष्यं टीव्हीवर दाखवली असं पीडिताच्या भावानं सांगितलं. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती.

ते म्हणाले, "यामुळे आम्हाला जास्त धोका आहे. आज संपूर्ण शहराला माहिती आहे की, आसारामवर केस करणारं कुटुंब शहरात कुठं राहतं. तुम्ही शहरातल्या कुठल्याही भागात जाऊन लहान मुलाला विचारलंत तर तोही तुम्हाला आमच्या घरापर्यंत आणून सोडेल. आमचं सामान्य जगणं तर कधीच संपलं आहे."

पाच वर्षांची फरपट

जवळपास 40 मिनिटांनंतर पीडित मुलीचे वडील थंडपेय आणि काही बिस्कीटं घेऊन मी बसले होते त्या खोलीत आले. उष्णतेचा उल्लेख करत त्यांनी मला थंडपेय घेण्याचा आग्रह केला.

पीडितेच्या वडिलांना बघून मला पाच वर्षांपूर्वीचा त्यांचा चेहरा नजरेसमोर आला. आधीपेक्षा आता त्यांची तब्येत खालावलेली दिसत होती. डोक्यावरचे केस उडालेले होते आणि असा भास होत होता की या प्रदीर्घ लढाईनं त्यांचं वजन निम्म्यावर आणून ठेवलं होतं.

प्रतिमा मथळा पीडितेच्या घरातली देवदेवतांच्या तसबिरी.

खटल्याचा काळ आठवत त्यांनी बोलायला सुरुवात केली, "मागील पाच वर्षं आमच्यासाठी काय होते कसं सांगू. शब्द कमी पडतील. मानसिक आणि शारीरिक कष्टांची तर सीमाच नव्हती.

"मध्यंतरी आमचा व्यवसाय पण ठप्प पडला होता. पाच वर्षांमध्ये समाधानानं कधी जेवल्याचं आठवत नाही. जेवणाची इच्छाच होत नव्हती.

झोप लागायची नाही. मध्येच रात्री उठून बसायचो. जीवाला धोका इतका वाटायचा की मागच्या पाच वर्षांमध्ये स्वतः विकत घेतलेले कपडेसुद्धा मी घालू शकलो नाही. स्वतः बाजारात जाऊन फळं आणि भाजीपाला विकत घेतला नाही.

फिरणं तर दूरच राहिलं. आजारी जरी पडलो तरी आम्ही डॉक्टरांना घरी बोलावून घ्यायचो. स्वतःच्याच घरात कैद्यासारखं जीवन जगलो."

निकाल लागला आणि सुटकेचा नि:श्वास सोडला

ते पुढे म्हणतात, "ज्यादिवशी आम्ही आसारामविरोधात खटला दाखल केला होता त्या दिवशी आमच्या घरात दुःखामुळे कुणीच जेवलं नव्हतं.

"त्यानंतर जेव्हा 25 एप्रिलला जेव्हा आम्ही हा खटला जिंकलो त्यादिवशी आनंदामुळे जेवण गेलं नाही. दुसऱ्या दिवशी मग आम्ही अनेक वर्षांनंतर चांगलं जेवू शकलो. निकालानंतर आम्हा सगळ्यांना चांगली झोपही येऊ लागली. असंख्य वर्षांनंतर सूर्योदय झाल्याची जाणीव झाली."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जोधपूर कारागृह

ऑगस्ट 2013मध्ये आसारामविरोधात खटला दाखल करतेवेळी पीडितेचं वय फक्त 16 वर्षं होतं. सुनावणी दरम्यानच्या काळात पीडितेच्या जीवनावर झालेल्या परिणामांचा उल्लेख करताना वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळतात.

ते म्हणतात, "माझ्या मुलीची सगळी स्वप्नं उध्वस्त झाली. तिला शिकून IAS व्हायचं होतं. पण मध्येच तिला शिक्षण थांबवावं लागलं. 2013 मध्ये खटल्यामुळे सगळं वर्ष वाया गेलं. सुनावणीसाठी दरवेळेस साक्ष देण्याकरिता हजर रहावं लागत असल्यानं 2014 हे वर्षं त्यातच गेलं. दोन वर्षं तर अशीच वाया गेलीत.."

आता तिचं जीवन पूर्वपदावर आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. ते म्हणतात, "तिला आता BAला प्रवेश मिळवून दिला आहे. दुसऱ्या वर्षाची परीक्षा तिनं दिली आहे. आमच्यावर एवढी संकटं आली की आभाळच कोसळलं. अशा वातावरणात कोण शिक्षण घेऊ शकेल? पण माझी मुलगी हुशार आहे. ती आताही परीक्षेत पहिली आली आहे. 85 टक्के मिळवले आहेत. आताही तुम्ही तिला कधी बघितलं तर ती नेहमी अभ्यास करत असते."

आसारामच्या धमक्या

पीडितेच्या वडिलांचं म्हणणं आहे की, आसाराम यांनी हा खटला मागे घेण्यासाठी पैशांबरोबरच जीवे मारण्याच्या धमक्याही उघडपणे आमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत.

ते म्हणतात, "जेव्हा सुनावणी सुरू होती तेव्हा छिकरा नावाचा आसारामचा एक गुंड आमच्याकडे आला होता. दरवाज्यावर बसलेल्या पोलिसांना त्यानं आमच्याकडे ट्रक भाड्यानं घेण्यासाठी आल्याचं सांगितलं.

त्याच्यासोबत आणखी एक शस्त्रधारी व्यक्ती होती. मी कामात मग्न होतो. पण त्याला बघताच मी त्याला ओळखलं. मी याआधीही त्याला आसारामच्या सत्संगांमध्ये बघितलं होतं.

तेव्हापर्यंत साक्षीदारांच्या हत्या सुरू झाल्या होत्या म्हणून मी सतर्क झालो होतो. त्यांनी मला खटला परत घ्यायला सांगितलं. असं केलं तर हवे तितके पैसै मिळतील नाहीतर जीवानिशी मारलं जाईल अशी धमकी दिली.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा आसाराम यांच्या धमक्यांमुळे पीडितेच्या कुटुंबीयांना त्रास झाला.

त्या दिवशी मी जीव वाचवायला खटला मागे घेऊ असं सांगितलं. हे सगळं आसारामपर्यंत पोहोचलं असेल.

ते पुढे सांगतात, "सुनावणीच्या दिवशी मी जेव्हा खरी साक्ष दिली तेव्हा आसाराम आश्चर्यचकित झाला. न्यायालयाच्या बाहेर निघताना त्यानं माझ्या दिशेनं अंगुलिनिर्देश केला. त्याच्या बाजूनं असलेल्या एका ज्युनिअर वकिलानं मला सांगितलं की या माणसाला संपवावं असा त्या इशाऱ्याचा अर्थ आहे. साक्षीदार मारले जात होतेच. आता तर तो अगदी खुलेपणाने धमक्या देत होता आणि आम्ही ते सहन करत होतो.

या प्रकरणात आतापर्यंत नऊ साक्षीदारांवर हल्ला झाला आहे हे उल्लेखनीय. त्यातल्या तिघांची हत्या झाली आहे. एक साक्षीदार आजही बेपत्ता आहे. वडिलांबरोबर मुलीलासुद्धा न्यायालयात धमकावलं जायचं.

पीडितेचे वडील पुढे सांगतात, "जेव्हा माझी मुलगी साक्ष द्यायची तेव्हा आसाराम समोरून गुरकावायचा आणि चित्रविचित्र आवाज काढून मुलीला घाबरवण्याचा प्रयत्न करायचा. आमचे वकील न्यायाधीशांना ही गोष्ट लक्षात आणून द्यायचे. त्याला शांत बसवण्यासाठी न्यायाधीशांना पोलिसांची सुद्धा मदत घ्यावी लागायची आणि हे सगळं न्यायालयात चालायचं.

साक्ष-जबान्यांचा कठीण कालखंड

सुनावणीच्या वेळी शहाजहांपूरपासून एक हजार किलोमीटर दूर असलेल्या जोधपूरला जाणंयेणंही पीडितेच्या कुटुंबासाठी आव्हान होतं. वडील सांगतात की या प्रकरणात त्यांच्या मुलीची साक्ष तीन महिने सुरू होती. त्यांच्या पत्नी आणि आईची साक्ष दीड महिना सुरू होती.

ते सांगतात, "आम्हाला जे वाहतुकीचं साधन मिळायचं ते घेऊन आम्ही जोधपूरला जायचो. कधी ट्रेनमध्ये, कधी बसमध्ये, तर कधी स्लीपरचं तिकीट मिळालं तर कधी अगदी जनरलमध्ये बसून जायचो."

"साक्ष कधी एक दीड तास चालायची तर कधी दिवसभर. मग संपूर्ण दिवस काय करायचं? मग आम्ही हॉटेलमध्येच रहायचो. कधी कधी कोर्टाला सुटी पडायची. अशा वेळेला काय करायचं काही सुचायचं नाही. जिथं कुणीच ओळखीच नाही, आपलं घर नाही अशा भागात आपण का भटकतोय."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा आसाराम सुनावणीदरम्यान धमकावत असे असं पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितलं.

सुनावणीच्या वेळी पीडित मुलगी आपल्या आई वडिलांबरोबर जोधपूरला जायची आणि तिचे दोघंही भाऊ शहाजहांपूरलाच असायचे. बराच वेळ घरी नसल्यानं पीडितेच्या वडिलांच्या उद्योगात मंदी असायची. कधी कधी तर त्यांना काम मिळायचं बंद झालं होतं. सुनावणीच्या खर्चासाठी त्यांना आपला ट्रकसुद्धा विकावा लागला होता.

"जेव्हा आम्ही जोधपूरला होतो तेव्हा आम्हाला मुलांची काळजी असायची आणि त्यांना आमची. मोठा मुलगा आमचा व्यापार सांभाळायचा आणि लहान मुलाला पण सांभाळायचा. मध्यंतरी लहान मुलाला टायफॉईड झाला होता. आम्ही तिघं तेव्हा सुनावणीसाठी जोधपूरमध्ये होतो. तो काळ फारच वाईट होता," असं असलं तरी पीडितेचं कुटुंब तिच्या मागे उभं होतं.

मुलांवर कोणी हल्ला करू नये याची पालकांना चिंता असायची. मुलांना पण पालकांवर कोणी हल्ला करेल का याची चिंता असायची. पण आसारामला शिक्षा देणं हेच त्यांच्या आयुष्याचं उद्दिष्ट होतं.

पण इतकी लढाई लढल्यावर आसारामसारख्या व्यक्तीला त्यांनी तुरुंगाची हवा खायला लावली खरी, पण समाजाने त्यांना दगा दिला. त्यांच्या मुलांशी कोणी लग्न करायला तयार नाही असं तिचे वडील सांगतात.

ते सांगतात, "माझा मोठा मुलगा 25 वर्षांचा आहे आणि मुलगी 21 वर्षांची आहे, पण त्यांच्या लग्नात अनेक अडथळे आहेत. मुलीसाठी मी तीन चार घरी स्थळं घेऊन गेलो. पण तिच्या केसबद्दल कळताच काही लोकांनी भीतीने दार बंद केलं आणि सांगितलं की तुमच्या मुलीवर कलंक लागला आहे."

ते पुढे म्हणतात, " माझ्या मुलाचं वय निघून चाललं आहे. ते म्हणतात की माझ्या मुलीवर कलंक लागला आहे. आम्हाला भेटायला लोक येतात तर बाहेर त्यांना पोलीस चौकी दिसते. एका कुटुंबानं आम्हाला विचारलं की तुमच्या मुलावर हल्ला होऊ शकतो मग मी माझी मुलगी का द्यावी? माझ्या मुलीसाठी जी स्थळं येतात ते एकतर मोठ्या वयाचे असतात किंवा विधूर उमेदवार असतात. अशा माणसांशी मी माझ्या मुलीचं लग्न का लावून देऊ?"

एक हजार किलोमीटर दूर सुरू असलेला खटला, ठप्प पडलेला व्यापार, साक्षीदारांच्या होणाऱ्या हत्या, जीवे मारण्याच्या धमक्या आणि आता मुलांच्या भविष्याची चिंता.

मी परत निघण्याआधी पीडितेचे वडील म्हणतात, "आसारामने आमची चहूबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही हे कसं सहन केलं हे आमचं आम्हालाच माहिती. याच काळजीनं माझं वजन कमी होत चाललं आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)