#5मोठ्याबातम्या : राहुलजी, कागद न घेता 15 मिनिटं बोलून दाखवा - मोदी

मोदी Image copyright Narendra Modi/Twitter

पाहूयात विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या आजच्या ठळक बातम्या.

1. 'राहुलजी, कागद न घेता 15 मिनिटं बोलून दाखवा'

कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारातील पहिल्या जाहीर सभेतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य केलं.

'राहुल गांधी यांनी कागदावर उतरवून काढलेल्या मुद्द्यांशिवाय फक्त 15 मिनिटं कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या चांगल्या कामाची माहिती द्यावी. हिंदी, इंग्रजी किंवा आपल्या आईच्या मातृभाषेत ते बोलले तरी हरकत नाही. कर्नाटकातील जनताच त्यावर निर्णय घेतील', असा टोला पंतप्रधानांनी लगावला.

बहुतांश वर्तमानपत्रांनी या बातमीस पहिल्या पानावर जागा दिली आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'मधल्या वृत्तानुसार, कर्नाटकमध्ये भाजपच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी 15 जाहीर सभा घेणार आहेत.

त्यातील पहिल्या सभेत मोदी यांनी आपल्या मुद्द्यांची दिशा स्पष्ट केली. 'संसदेत मला फक्त 15 मिनिटे बोलू द्या. भ्रष्टाचारासह अनेक विषयांवर मी बोललो, तर पंतप्रधान 15 मिनिटेही आपल्या जागेवर बसू शकणार नाहीत', या राहुल यांच्या वक्तव्याला मोदी यांनी उत्तर दिलं.

"ते 15 मिनिटे बोलले तरी खूप झाले. ते म्हणतात, मी 15 मिनिटंही त्यांच्यासमोर बसू शकत नाही. बरोबर आहे. ते नामदार आहेत आणि आम्ही कामदार. त्यांच्यासमोर बसण्याची योग्यता नाही," असा चिमटाही त्यांनी काढला.

देशातील सर्व गावांत वीज पोहोचल्याच्या घटनेबाबत ते म्हणाले, '२८ एप्रिल हा दिवस भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल. नागरिकांच्या आणि कामगारांच्या कष्टातून हे यश मिळाले आहे. पण काँग्रेसच्या नेत्यांकडे या कामगारांच्या कौतुकासाठी दोन शब्दही नाहीत', अशी टीकाही त्यांनी केली.

2. एकनाथ खडसेंना क्लीन चिट?

भोसरी येथील एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं एकनाथ खडसे दोषी नसल्याचा अंतिम अहवाल कोर्टात सादर केला असल्याचं वृत्त हाही राज्यातल्या बहुतांश माध्यमांतला चर्चेचा विषय आहे.

Image copyright TWIITER/EKNATH KHADSE

'सकाळ'नं दिलेल्या बातमीत या बाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. भोसरी येथील तीन एकर जमीन खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावानं उकानी यांच्याकडून खरेदी करण्यात आली होती.

या व्यवहारात खडसेंवर पदाचा दुरुपयोग केल्याचा आणि जमीन कवडीमोल दरात मिळवून देत सरकारचं नुकसान केल्याचा आरोप होता.

याप्रकरणी आधी गुन्हा दाखल करावा मग चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल कारण्यात आली होती. यात न्यायालयाच्या आदेशानं लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिक्षकांकडून चौकशी करण्यात आली. शेवटी या विभागानं अंतिम अहवाल कोर्टात सादर करून खडसेंना क्लीन चिट दिली आहे.

3. 'बुलेट ट्रेनसाठी जमिनी देऊ नका', राज ठाकरेंचं आवाहन

बुलेट ट्रेनसाठी जमिनी देऊ नका, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसईत नागरिकांना केलं. तसंच, जबरदस्तीनं जमिनी घेतल्यास बुलेट ट्रेनचे रुळ उखडून टाकू, अशा शब्दांत राज ठाकरेंनी मोदी सरकारला खुलं आव्हान दिलं.

Image copyright MNS/Facebook

'एबीपी माझा'नं दिलेल्या बातामीनुसार, राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात पालघर जिल्ह्यातून केली.

या दौऱ्यातली पहिली आणि एकमेव सभा वसईत झाली. ऑगस्ट महिन्यापर्यंत राज ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करुन पक्षबांधणी करणार आहेत.

सभेतल्या भाषणात राज ठाकरेंनी मोदी सरकारला चहुबाजूंनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. डिजिटल इंडिया, स्थानिक रोजगार, नाणार अशा अनेक विषयांना यावेळी त्यांनी हात घातला.

4. जे. डे हत्याकांडाचा निकाल आज?

पत्रकार जे. डे हत्या खटल्यातील मुख्य आरोपी, संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या छोटा राजनसह 11 आरोपींच्या शिक्षेवरील फैसला सत्र न्यायालय बुधवारी जाहीर करण्याची शक्यता आहे.

'लोकसत्ता'च्या वृत्तात म्हटल्याप्रमाणे, 11 जून 2011 रोजी डे दुचाकीवरून पवई येथील निवासस्थानी जात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.

पाच गोळ्या लागल्यानं गंभीर जखमी झालेल्या डे यांनी हिरानंदानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या गुन्ह्याचा सुरुवातीचा तपास मुंबई गुन्हे शाखेनं केला.

या तपासातून डे यांची हत्या संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या छोटा राजनच्या इशाऱ्यावरून करण्यात आल्याचं स्पष्ट झाले. पुढे डे यांच्यावर गोळ्या झाडणारा सतीश थंगप्पन जोसेफ ऊर्फ सतीश काल्या आणि त्याच्या साथीदारांना अटक केली गेली.

त्यांच्या चौकशीतून या हत्याकांडासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या सहकार्य केलेल्या, सहभाग घेतलेल्या एकूण 12 आरोपींना मोक्कान्वये गजाआड केले गेले.

5. 'कंडोमची जाहिरात पाहण्याजोगी नसते'

कंडोमची जाहिरात खूप अश्लील असते, ती कुटुंबासोबत पाहण्याजोगी नसते. सुखाचे साधन म्हणून कंडोमची जाहिरात केली जाते. गर्भनिरोधकासाठी ही जाहिरात नसते, असं परखड मत राजस्थान उच्च न्यायालयानं व्यक्त केले आहे.

'लोकमत'च्या वृत्तानुसार कंडोमची जाहिरात रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत दाखवावी, असं फर्मान माहिती व प्रसारण मंत्रालयानं काढलं आहे. त्या विरोधात ग्लोबल अलायंस फॉर ह्युमन राईटस् या संघटनेनं याचिका दाखल केली होती.

कंडोमचा शरीरसुखासाठी वापर करावा की नाही? याच्याशी संस्थेचा काहीही संबंध नाही़. शरीरसंबंधाद्वारे पसरणाऱ्या आजारांना निर्बंध घालणं हा संस्थेचा उद्देश आहे़. कंडोमची जाहिरात रात्री 10 नंतर दाखवल्यास आणि या जाहिरातींना निर्बंध घातल्यास नेमका काय अडथळा निर्माण होऊ शकतो, हे याचिकाकर्त्यानं स्पष्ट केले नाही, असं नमूद करीत न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)