जे. डे यांची शिकवण : 'बातमी विकत घेऊ शकत नाही म्हणून चांगला रिपोर्टर होऊन काम करावं!'

ज्योतिर्मय डे, जे डे, पत्रकार
प्रतिमा मथळा ज्योतिर्मय डे, पत्रकार

ते वर्ष होतं 2002. कॉलेजच्या न्यूजलेटरसाठी मुंबईच्या अंडरवर्ल्ड विश्वातील 'Evolution of Arms' अर्थात बदलत्या काळातील शस्त्रं या विषयावर लिहायचं होतं. कोणाशी ओळख नाही, कोणी सोर्स नाही, अशा परिस्थितीत या विषयावर लिहिणं म्हणजे अवघडच होतं. लेख कसा लिहायचा याबाबत कळत नव्हतं.

मनात गोंधळ आणि मेंदूत चलबिचल सुरू असताना संडे एक्स्प्रेसमधल्या एका कॉलमनं माझं लक्ष वेधलं. 'नोट्स फ्रॉम द अंडरवर्ल्ड' असं त्या लेखाचं हेडिंग होतं. क्राइम अर्थात गुन्हेगारी विश्वाच्या बातम्या देणारे जे.डे या कॉलममध्ये अंडरवर्ल्डच्या सुरम्य कहाण्या प्रत्येक आठवड्याला मांडायचे.

माझ्या लेखासाठी जे. डे यांची मदत घेऊ शकतो, हे डोक्यातही आलं नाही. पण माझ्या संपादकांच्या हे लक्षात आलं. त्यांनी जे.डे यांना भेटायचा सल्ला दिला आणि मी लालबाग परिसरातल्या 'इंडियन एक्स्प्रेस'च्या ऑफिसात जाऊन धडकलो.

या भेटीत काही हाती लागेल असं मला वाटलं नव्हतं. कॉलेजला जाणाऱ्या मुलाच्या लेखापेक्षा त्यांना अधिक महत्त्वाची कामं असणार, असं मला वाटलं होतं. असे सगळे विचार मनात रुंजी घालत असतानाच जे.डे भेटले.

त्यांनी वेळ दिला. मी त्यांना 'डे सर' असं म्हणून बोलू लागलो. त्यांनी चहा पाजला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पत्रकार जे.डे. हत्याप्रकरणी न्यायालयानं छोटा राजन यांना दोषी ठरवलं.

आमची ओळख वाढली. मुंबईच्या अनेक गल्ल्या, चौक, रस्त्यांची त्यांनी मला सैर घडवली. अंडरवर्ल्ड बाबतच्या असंख्य गोष्टी टिपताना माझी वही भरली. माझ्या डोक्यात जे जे प्रश्न फेर धरून होते, त्या सगळ्यांची सविस्तर उत्तरं मिळाली.

माझा लेख यथावकाश प्रसिद्ध झाला. छापून आलेल्या लेखाची प्रत घेऊन मी डे सरांकडे गेलो. लेख पाहून ते खूश झाले आणि आणखी एक चहासत्र झालं.

डे सरांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन एक्स्प्रेसमध्ये इंटर्नशिप करायचं डोक्यात होतं. कामाशी पक्के असणारे, दिवसभर पायपीट करून, लोकांना भेटून डे सर संध्याकाळी सातला ऑफिसात अवतरायचे. चहाचा फड झाला की ते बातम्यांची चळत द्यायचे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जे. डे यांची हत्या झाली ते घटनास्थळ

काही वेळेला कामात गर्क असताना ते हातात कागद सोपवायचे. ही कागदपत्रं पाहून घे. यातून बातमी होऊ शकते, असं ते सांगायचे.

अनेक वर्षं सरली. 'मिड डे' वर्तमानपत्रात मी रुजू झालो होतो. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासंदर्भातली बातमी करत होतो. डे सरांचा फोन आला. त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेला 'जुगल पुरोहित' आणि मी एकच आहे ना, याची शहानिशा करण्यासाठी त्यांनी कॉल केला होता.

आम्ही वेळोवेळी भेटत राहिलो. एकदा इंडियन कोस्ट गार्डने सागरात एका बोटीवर आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आम्ही भेटलो. एका वरिष्ठ कोस्ट गार्ड सेलर अधिकाऱ्याशी आम्ही बोलत होतो.

काही क्षणांनंतर मी तिथून बाजूला झालो, पण डे सर त्या अधिकाऱ्याशीच बोलत होते. त्या अधिकाऱ्याबरोबर ते इतका वेळ काय बोलत होते, याची मला उत्सुकता होती.

ते त्या अधिकाऱ्यासोबत नेमकं काय बोलत होते, हे मला काही दिवसांनी एक बातमी पाहून कळलं. ज्या बोटीवर स्वार होऊन आम्ही फिरत होतो त्या बोटीच्या उणिवांविषयी डे सरांनी ती बातमी केली होती.

डे सरांच्या बातमीने कोस्ट गार्ड अधिकारी अवाक झाले. ही बातमी कुठून आली, हे कोडं त्यांना पडलं. पण मला बातमीचं मूळ माहिती होतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जे.डे. यांच्या हत्येविरोधात पत्रकारांनी मोर्चाचं आयोजन केलं होतं.

अल्पावधीत समोरच्या माणसाचा विश्वास संपादन करणं, ही त्यांची हातोटी होती. माझी आणि त्यांची शेवटची भेट मिड डेच्या कार्यालयातच झाली.

त्यांची हत्या झाली त्याच्या काही दिवस आधीच आमची भेट झाली होती. त्या वेळी ते मुंबईतील ऑइल माफियांवरील वृत्तमालिकेसंदर्भात ते काम करत होते.

'इंडियन एक्स्प्रेस'मधील इंटर्नशिपनंतर डे सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा योग जुळून आला नाही, याची खंत मनात राहिली. हे मी त्यांनाही सांगितलं. त्यांनी हलकंसं स्मितहास्य केलं. लवकरच एकत्र काम करू असं ते म्हणाले.

पण नियतीच्या मनात तसं नव्हतं.

त्या शनिवारी पाऊस कोसळत होता आणि तेवढ्यात डे सरांवरील हल्ल्याची बातमी आली. त्यांची हत्या झाल्यानंतर काही मिनिटांतच त्यांचे संपादक टीव्हीवर अवतरले. तोपर्यंत डे यांचा त्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं होतं. "डे यांचं योगदान म्हणजे त्यांनी पत्रकारांची एक पिढी घडवली," असं ते संपादक म्हणाले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा 2002 मध्ये जे.डे. यांची हत्या करण्यात आली होती.

डे सरांच्या मृत्यूनंतर पोलीस रिसोर्सेस आणि रिपोटर्स या त्यांच्या एरव्हीच्या प्रतिस्पर्ध्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत, त्यांच्या हातून घडलेल्या चुकांबाबत भरभरून लिहिलं.

जे घडलं त्यासाठी ते स्वत:च जबाबदार होते, असा त्या सगळ्यांचा सूर होता. बायलाइनसाठी त्यांनी डे यांच्या आयुष्याची चिरफाड केली. दुर्दैवाने आपली बाजू मांडण्याची संधी डे सरांकडे नव्हती.

डे सर गेल्यानंतर मी त्यांच्या आजारी आई तसंच बहिणीच्या संपर्कात होतो. मुंबईत एका साध्या घरात त्या दोघींचं राहात होत्या. सुरुवातीला रागाने बोलणाऱ्या त्या दोघींनी नंतर बोलणंच टाकलं.

आजूबाजूच्या कलुषित वातावरणात जाहीरपणे बोलण्यापेक्षा गप्प राहणंच योग्य ठरेल, याची जाणीव त्या दोघींना झाली असावी. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप नको म्हणून मी जाणं येणं, बोलणं कमी केलं.

जे.डे यांचं गुणवैशिष्ट्य काय, या प्रश्नाचं उत्तर 'इंडियन एक्स्प्रेस'मध्ये इंटर्नशिप करत असतानाच त्यांच्या एका उत्तराने दिलं होतं.

ते ऑफिसला आले. ते बातम्या कुठून उकरून काढतात, कागदपत्रं कुठून मिळवतात, असं मी विचारलं.

त्यांचं उत्तर मला आयुष्यभर लक्षात राहील.

"हमारी सॅलरी इतनी नहीं की हम खबर खरीद सकें. तो एक अच्छा और भरोसेमंद रिपोर्टर बन के अपना काम करते रहो (आपला पगार तुटपुंजा आहे, त्यामुळे आपण बातमी विकत घेऊ शकत नाही. म्हणूनच एक चांगला आणि विश्वासार्ह पत्रकार होऊन काम करत रहायचं.)"

पाहा व्हीडिओ - कोर्टरूममध्ये काय घडलं?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)