बडा राजनचा 'गेम' झाला अन् 'छोटा राजन' जन्माला आला

छोटा राजन. Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा छोटा राजन.

जे. डे हत्याकांडातला दोषी राजेंद्र निकाळजे एकेकाळी मुंबईतल्या टिळक नगरमध्ये एका सिनेमा हॉलबाहेर तिकिटं ब्लॅक करायचा. तिथून भारताच्या वॉन्टेड लिस्टमध्ये नाव होण्यापर्यंतचा छोटा राजनचा प्रवास एखाद्या थरारकथेपेक्षा कमी नाही.


टिळक नगरमध्ये 1960 साली एका मराठी कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव होतं राजेंद्र सदाशिव निकाळजे. त्याचे वडील सदाशिव ठाण्यात नोकरी करायचे. राजनला तीन भाऊ आणि दोन बहिणी होत्या.

राजनचं मन अभ्यासात रमायचं नाही. पाचवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्याने शिक्षण सोडलं. त्याला वाईट संगत लागली. राजन जगदीश शर्मा उर्फ गूंगाच्या गँगमध्ये सामील झाला. अशा प्रकारे किशोरवयातच त्याची पावलं गुन्हेगारी विश्वाकडे वळू लागली होती.

राजेंद्रचं लग्न सुजाता नावाच्या मुलीशी झालं. त्यांना तीन मुली झाल्या.

1979 मध्ये आणीबाणीनंतर पोलीस काळा बाजार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळत होते. त्याच वेळी राजेंद्रने मुंबईत सहकार सिनेमाच्या बाहेर तिकीटांचा काळा बाजार करण्यास सुरुवात केली.

एके दिवशी पोलिसांनी याच सिनेमागृहाच्या बाहेर लाठीमार केला. या लाठीमारामुळे संतापलेल्या राजनने थेट पोलिसांची लाठी हिसकावली आणि पोलिसांनाच मारायला सुरुवात केली. पोलीस आणि राजेंद्र यांच्यातली ती पहिली चकमक होती.

या झटापटीत अनेक पोलीस जखमी झाले. पाच फूट तीन इंच उंची असलेल्या राजनला आपल्यात सामील करून घेण्यास अनेक टोळ्या उत्सुक होत्या. राजेंद्र अखेर राजन नायर या गुंडाच्या टोळीत सामील झाला.

या बडा राजनच्या मदतीने राजेंद्र मोठा होऊ लागला. चोऱ्या, दरोडे या सारख्या गोष्टींमध्ये आपला हात आजमावू लागला.

कोण होता बडा राजन?

बडा राजन आधी शिंप्याची नोकरी करायचा. दिवसाला 25-30 रुपये कमवायचा. एकदा आपल्या गर्लफ्रेंडला वाढदिवसाचं गिफ्ट द्यायचं म्हणून त्याने आपल्या कार्यालयातून एक टाइपराइटर चोरला आणि 200 रुपयांना विकला. त्यातून त्याने आपल्या गर्लफ्रेंडला साडीही घेतली, पण चोरीप्रकरणी त्याला तीन वर्षांसाठी जेलची हवा खावी लागली.

जेलमधून बाहेर आल्यावर त्याने तावातावात 'गोल्डन गँग' बनवली आणि त्यात अब्दूल कुंजू या गुंडाला सामील करून घेतलं. पण काही दिवसांनी या बडा राजनची गर्लफ्रेंड याच कुंजूवर मेहरबान झाली. साहजिकच, राजन आणि कुंजू शत्रू बनले.

1983 साली चंद्रशेखर सफालिका आणि अब्दुल कुंजू या दोघांनी राजन नायरचा खून केला. इथे 'बडा भाई' राजनची कहाणी संपली आणि सुरू झाली छोटा राजनची स्टोरी.

आपल्या गुरूच्या खुनाचा बदला घेण्यासाठी राजेंद्रने मग सफालिका आणि कुंजू यांचा काटा काढायचं ठरवलं.

त्या काळातल्या वृत्तपत्रांनी दिलेल्या बातम्यांनुसार, कुंजूने आता छोटा राजनचा असा धसका घेतला होता की 9 ऑक्टोबर 1983 ला कुंजूने मुंबईच्या गुन्हे शाखेकडे शरणागती पत्करली. कुंजूला वाटलं की जीव वाचवण्याचा त्याच्यासमोर हा एकच मार्ग आहे.

पण छोटा राजनसुद्धा हार मानायला तयार नव्हता. जानेवारी 1984 मध्ये छोटा राजनने कुंजूला मारण्याचा प्रयत्न केला. पण कुंजू या हल्ल्यात फक्त जखमी झाला.

25 एप्रिल 1984 ला जेव्हा पोलीस कुंजूला उपचारासाठी पोलीस रुग्णालयात घेऊन गेले तेव्हा तिथे एक व्यक्ती हाताला प्लास्टर लावून बसला होता. कुंजू जसा जवळ आला तसं या व्यक्तीने आपल्या हाताचं प्लास्टर बाजूला काढून गोळीबार करायला सुरुवात केली.

नशिबाने या वेळीही कुंजूची साथ दिली. पण या हल्ल्याने दोन लोक अतिशय प्रभावित झाले. पहिला म्हणजे दाऊद इब्राहिम आणि दुसरं होतं बॉलिवुड. या प्रसंगाचं अनेक चित्रपटांमध्ये चित्रण झालं आहे.

गुन्हेगारी विश्वाबाबत विपुल लेखन केलेल्या हुसेन झैदी यांनी आपल्या 'डोंगरी टू दुबई' या पुस्तकात म्हटलं आहे की हॉस्पिटलमधल्या प्रसंगानंतर दाऊदने राजनला भेटायला बोलवलं आणि आपल्या गँगमध्ये सामील करून घेतलं. यानंतर राजेंद्रने सफालिका आणि कुंजू या दोघांचा काटा काढला आणि गुन्हेगारी जगतात आपली पहिली मोठी 'कामगिरी' करून दाखवली.

इथेच 'छोटा राजन'चा जन्म झाला. आपल्या मृत गुरूला दिलेल्या या 'गुरुदक्षिणेमुळे' त्याला हे बिरूद मिळालं होतं.

दाऊदशी संपर्क आणि फारकत

दाऊदच्या गँगमध्ये सामील झाल्यानंतर काही काळातच राजनने त्याचा विश्वास संपादित केला. 1987 साली दाऊदच्या इतर अनेक माणसांप्रमाणेच राजनही दुबईला गेला आणि तिथून काम करू लागला.

हुसेन झैदींच्या लिखाणातून असं आढळून येतं की, छोटा राजन आणि दाऊदच्या संबंधांत वितुष्ट यायला सुरुवात झाली ती 1992 साली. अरुण गवळी गँगने दाऊदचा मेव्हणा इब्राहिम पारकर याचा भरदिवसा खून केला होता. राजनच्या माणसांनी गवळी गँगविरुद्ध पावलं न उचलल्याने दाऊदची मर्जी खप्पा झाली.

1993 सालच्या मुंबई स्फोटांनंतर या दोघांचे मार्ग पूर्णतः वेगळे झाले. 'भारताविरुद्ध कट करणाऱ्या दाऊदची साथ सोडणारा देशभक्त डॉन', अशी आपली प्रतिमा राजनला उभी करायची होती.

स्फोटांनंतर तातडीने राजनने दाऊदची साथ सोडली. भारतीय यंत्रणांना वेळोवेळी दाऊदबद्दलची माहिती पुरवून राजनने आपल्यासाठी 'गुडविल' तयार केलं असंही मानलं जातं.

अनेक वर्षं क्राईम रिपोर्टिंग केलेले बीबीसीचे प्रतिनिधी जुगल पुरोहित सांगतात की, "राजन भारतीय यंत्रणांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता आणि दाऊदविरुद्ध माहिती पुरवून ते साधण्याचा त्याचा प्रयत्न होता. मुंबई पोलिसांनी अनेक वर्षं त्याचा पाठपुरावा केला."

मुंबई स्फोटांनंतर दाऊदपासून फारकत घेतलेल्या राजनने 1998 साली नेपाळच्या एका मंत्र्याचा खून करवला. मिर्झा दिलशाद बेग हे मूळचे उत्तर प्रदेशचे. बेग यांनी नंतर नेपाळचं नागरिकत्व घेतलं आणि संसदेत निवडून आले.

"बेग तत्कालीन नेपाळ सरकारमध्ये मंत्री होते आणि त्यांचे दाऊद इब्राहिम आणि ISIशी संबंध असल्याचं उघडपणे बोललं जायचं. अनेक गुन्हेगारी कृत्यांशी बेग यांचा छुपा संबंध होता," बीबीसी नेपाळीचे संपादक जितेंद्र राऊत यांनी सांगितलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अटकेत छोटा राजन.

"राजनच्या हस्तकांनी दाऊदला नेपाळमध्ये बस्तान बसवण्यासाठी मदत करणाऱ्या बेग यांना जीवे मारण्याचा घाट घातला. जून 1998 मध्ये त्यांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली," राउत यांनी पुढे सांगितलं.

या घटनेनंतर इंडिया टुडे मासिकाला दिलेल्या मुलाखतीत राजन म्हणाला होता, "दाऊदला सहकार्य करणारा प्रत्येक माणूस माझा शत्रू आहे."

छोटा राजन हे सगळं भारताबाहेर राहून करत होता. 1987 साली दुबईला गेल्यानंतर राजनने अनेक देशांमध्ये वास्तव्य केलं. भारतात परतल्यास पोलीसांच्या हाती पडण्याचं भय त्याला सतावत होतं. इतर गुन्हेगारी टोळ्यांशी त्याची दुश्मनी संपलेली नव्हतीच.

2000 साली बँकॉकमध्ये रोहित वर्मा या आपल्या मित्राच्या घरी असताना राजनवर छोटा शकीलच्या माणसांनी खुनी हल्ला केला. राजन यातून सुखरूप सुटला पण रोहित वर्मा आणि त्यांच्या पत्नीला यात प्राण गमवावे लागले होते.

2001 साली राजनने आपला ठावठिकाणा आपल्या हल्लेखोरांपर्यंत पोचवणाऱ्या दोन गुंडांचा खात्मा केला. ते दोघेही दाऊदसाठी काम करायचे, असा कयास होता. 2003 साली राजनच्या टोळीने शरद शेट्टी या दाऊदच्या सहकाऱ्याचा खून केला. शेट्टी दाऊदचे आर्थिक व्यवहार पाहायचा.

रिअल इस्टेट व्यवसाय

देशाबाहेर राहून आपली गुन्हेगारी कृत्यं सुरू ठेवत असतानाच राजनचा मुंबईत रिअल इस्टेटचा व्यवसायही सुरू होता. राजनची पत्नी सुजाता निकाळजे 'खुशी डेव्हलपर्स' या आपल्या कंपनीमार्फत हा व्यवसाय सांभाळायची.

अनेक वर्षं मुंबईच्या झगमगाटापासून दूर राहिलेल्या टिळक नगर परिसरात जेव्हा पुनर्विकासाचे वारे वाहू लागले तेव्हा राजनने त्याचा फायदा उचलायचं ठरवलं.

जुन्या इमारती पाडून त्या जागी अधिक FSIच्या मदतीने नव्या इमारती उभारून बांधकाम व्यवसायातून त्याने उदंड संपत्ती कमवली. रिअल इस्टेट व्यवसायाच्या माध्यमातूनच विनोद चेंबूर (विनोद गोवर्धन असरानी) राजनच्या संपर्कात आला होता. विनोद चेंबूर जे. डे प्रकरणातल्या आरोपींपैकी एक होता.

सुजाता निकाळजेला डिसेंबर 2005मध्ये मकोका कायद्याखाली खंडणीच्या संदर्भात अटक करण्यात आली होती.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राजनविरुद्ध इंटरपोलची नोटीस होती.

राजनचे भाऊ दीपक निकाळजे हे रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत. मार्च 2018 मध्ये त्यांच्याविरुद्ध एका 22 वर्षीय तरुणीने बलात्काराचे आरोप केले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

दाऊद आणि राजनबद्दल अनेक दंतकथा आहेत ज्यांच्याबद्दल अनेकदा बोललं जातं, पण त्यासंदर्भात अधिकृत पुष्टी कधीच झालेली नाही. तपास यंत्रणा, तपास अधिकारी यांच्याबद्दलही अनेक कानगोष्टी सुरू असतात.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पत्रकार जे डे यांच्या हत्येप्रकरणी राजनला जन्मठेप सुनावली गेली आहे.

एका देशातून दुसऱ्या देशात, असा पळ काढत राजन ऑस्ट्रेलियात पोहोचला. 2015 साली ऑस्ट्रेलियात असताना राजनवर छोटा शकीलच्या माणसांनी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर राजनने बालीचा रस्ता धरला आणि बाली विमानतळावरच त्याला अटक करण्यात आली.

ऑस्ट्रेलियन पोलिसांनी इंडोनेशियन पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर राजनला बाली विमानतळावर ताब्यात घेतलं गेलं होतं. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी तिथून त्याचा ताबा घेतला.

राजनच्या दंतकथा

राजनला भारतात आणल्यानंतर त्याच्यावरच्या सगळ्या केसेस CBIने हाती घेतल्या. महाराष्ट्र सरकारने आपल्याकडच्या सगळ्या केसेस CBIकडे हस्तांतरित केल्या. पण राजनला भारतात आणल्यानंतर हाती काय आलं?

2016 साली बालीपासून दिल्लीपर्यंत राजनचा पाठलाग करणारे पत्रकार अरुणोदय मुखर्जी यांनी सांगितलं, "तपास यंत्रणांच्या हाती काही ठोस लागलं, असं वाटत नाही. राजनची तातडीने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली गेली होती आणि तपास यंत्रणांना त्याच्याकडून फार मोठी माहिती मिळाली नाही."

आज पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. अजूनही त्याच्याविरुद्ध अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत.

(बीबीसी हिंदीचे प्रतिनिधी विकास त्रिवेदी यांच्या माहितीसह)

पाहा व्हीडिओ - कोर्टरूममध्ये काय घडलं?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)