#5मोठ्याबातम्या : विधान परिषद निवडणूक; युती कायम, आघाडीत बिघाडी?

mls.org.in Image copyright mls.org.in

पाहूयात विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या आजच्या ठळक बातम्या.

1. विधान परिषद निवडणुका; युती कायम, आघाडीत बिघाडी?

राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती जे. डे हत्याकांडांच्या प्रकरणातल्या निकालाची. त्या जोडीनं राज्याच्या प्रशासनात झालेल्या बदलांचीही चर्चा आहेच. पण राज्याचं राजकारण ढवळून काढलं आहे ते विधान परिषदेच्या येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे.

या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आज, 3 मेपर्यंत आहे. 21 मे रोजी मतदान होईल, तर 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे. याबाबतचं वृत्त 'लोकसत्ता'नं दिलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून देण्याच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेनं परस्पर तीन उमेदवार जाहीर करून टाकले. उरलेल्या तीन जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेत भाजपनं विदर्भातील दोन आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघातून उमेदवार निश्चित केले. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत भाजप-शिवसेना यांच्यातला थेट संघर्ष टळला असून सेनेशी जागावाटपाची चर्चा टाळूनही भाजपनं युती कायम राखल्याचं चित्र समोर आलं आहे.

'लोकसत्ता'तल्या या संदर्भातल्या दुसऱ्या वृत्तात विधान परिषद निवडणुकीत आघाडीत वादाचा मतदारसंघ ठरलेल्या उस्मानाबाद-लातूर-बीडमधून उमेदवारी जाहीर करून राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. नाशिक आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील उमेदवारही राष्ट्रवादीनं निश्चित केले आहेत. परभणीची जागाही लढवणार असल्याचं प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर अद्याप कोणत्याही प्रकारची आघाडी झाली नाही, असं प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

2. शिवस्मारकाची उंची वाढवण्याचा निर्णय

मुंबईच्या अरबी समुद्रात प्रस्तावित असणाऱ्या शिवस्मारकाची उंची दोन मीटरनं वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. जगातील सर्वाधिक उंचीचं स्मारक ठरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

'झी24तास'च्या बातमीत याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी शिवस्मारकाची उंची 210 मीटर असणार होती. मात्र, चीनमधील स्प्रिंग बुद्ध मंदिराची उंची 208 मीटरवरून 210 मीटर प्रस्तावित करण्याचा निर्णय नुकताच चीन सरकारनं घेतला.

Image copyright MAHARASHTRA DGIPR

त्यामुळे शिवस्मारकाची उंची 210 मीटरवरून 212 मीटर करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे शिवस्मारक जगातील सर्वांत उंच स्मारक म्हणून ओळखलं जाणार आहे. हे स्मारक उभारण्यासाठी 'लार्सन अँड ट्युब्रो' या कंपनीला २५०० कोटींचं कंत्राट देण्याचा निर्णय मार्च महिन्यात घेण्यात आला होता.

3. राहुल गांधी हाजीर हो!

महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं घडवून आणली, या वादग्रस्त विधानाप्रकरणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल आहे. ही केस समरी ट्रायल प्रमाणं न चालवता समन्स ट्रायलमध्ये रूपांतरित करावी, याविषयी दाखल अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. 'महाराष्ट्र टाइम्स'नं ही बातमी दिली आहे.

Image copyright TWITTER/@INCINDIA

याचिकाकर्त्याच्या वकिलासह राहुल यांची वकील नारायण अय्यर यांनी बाजू मांडली. या अर्जावर अंतिम निर्णय १२ जून रोजी येणार आहे. मात्र, या दिवशी राहुल यांना न्यायालयात उपस्थित राहणं गरजेचे आहे, असंही यावेळी न्यायालयानं स्पष्ट केलं.

4. बल्लारशाह आणि चंद्रपूर रेल्वे स्थानकांनी काढलं नाव

रेल्वे स्टेशन सौंदर्यीकरण स्पर्धेत महाराष्ट्रातल्या बल्लारशाह आणि चंद्रपूर रेल्वे स्टेशनांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर बिहारचं मधुबनी हे स्टेशन दुसऱ्या स्थानावर आहे.

रेल्वे मंत्रालयानं याची माहिती दिली. मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळानं या दोन्ही स्टेशनांवर राष्ट्रीय ताडोबा उद्यान आणि स्थानिक आदिवासी कलेतली चित्रं रेखाटली आहेत.

Image copyright Twitter/ @Central Railway
प्रतिमा मथळा चंद्रपूर स्थानकातलं वाघाचं चित्रं

'लोकमत'च्या बातमीनुसार, बिहारचं मधुबनी स्टेशन दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्थानिक कलाकारांनी पूर्ण स्टेशनला मधुबनी चित्रांनी नवा साज दिला. याशिवाय तामिळनाडूच्या मदुराई स्टेशनलाही दुसरं स्थान मिळालं आहे.

तिसरा क्रमांक संयुक्तरीत्या गुजरातमधील गांधीधाम, राजस्थानमधल्या कोटा आणि तेलंगणातल्या सिकंदराबाद स्टेशनांना मिळाला आहे. पहिल्या स्थान पटकावलेल्या विजेत्या स्टेशनला 10 लाख रुपये देण्यात येणार आहेत.

5. राज ठाकरे आदिवासी पाड्यावर जेवले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी वसईमध्ये सभा घेतल्यानंतर बुधवारी पालघरमधल्या कार्यकर्त्याच्या आदिवासी पाड्यावरील घरी जेवण घेतले.

वसईच्या सभेत भाजपवर टीका करत ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली. मनसेच्या संघटनात्मक बांधणीसाठी हा त्यांचा दौरा आहे.

'सरकारनामा'च्या बातमीत म्हटल्याप्रमाणे पालघर जिल्ह्यात त्यांनी दौरा केला. त्यावेळी वाडा विभाग अध्यक्ष आणि कुंतल ग्रामपंचायत सदस्य रवी जाधव याच्या आदिवासी पाड्यावरच्या घरी त्यांनी जेवण घेतले. त्यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकरही होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)