अलीगढ विद्यापीठ वाद : 'जिन्नांच्या फोटोला विरोध मग सावरकरांचा फोटो कसा चालतो'

अलीगढ विद्यापीठ, मोहम्मद अली जिन्ना, पाकिस्तान, राजकारण, हिंदू, मुस्लिम Image copyright AFP
प्रतिमा मथळा मोहम्मद अली जिन्नांच्या फोटोवरून वातावरण तापलं आहे.

अलीगढ विद्यापीठात मोहम्मद अली जिन्नांच्या फोटोवरून वातावरण तापलं आहे. काय आहे नेमकं प्रकरण याचा घेतलेला आढावा.

घटनाक्रम

  • विद्यापीठाच्या युनियन हॉलमध्ये मोहम्मद अली जिन्ना यांचा फोटो लावण्यावरून वाद निर्माण झाला आहे.
  • भाजप खासदार सतीश गौतम आणि महेश गिरी यांनी अलीगढ विद्यापीठात जिन्ना यांचा फोटो लावण्याचा निषेध केला.
  • बुधवारी काही व्यक्तींनी विद्यापीठाच्या बाहेर अर्वाच्य आणि आक्षेपार्ह भाषेत शेरेबाजी केली.
  • विद्यार्थ्यांनी विद्यापीठाबाहेरील या व्यक्तींना अटक करावी अशी मागणी केली.
  • पोलिसांनी एएमयू अर्थात अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर लाठीमार केला. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले.
  • अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी याविरोधात प्रदर्शनं केली.

अलीगढचे खासदार सतीश गौतम यांनी ट्वीटच्या माध्यमातून विद्यापीठात जिन्नांच्या फोटोसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. गौतम यांनी अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे कुलपती तारिक मंसूर यांना पत्रही पाठवलं आहे.

देशाच्या फाळणीसाठी कारणीभूत व्यक्तीचा फोटो अलीगढ विद्यापीठात का आहे? असा सवाल गौतम यांनी केला आहे. फोटो लावण्याची सक्ती आहे का? असंही त्यांनी पत्राद्वारे विचारलं.

Image copyright facebook/Getty/BBC
प्रतिमा मथळा भाजपचे खासदार सतीश गौतम यांनी अलीगढ विद्यापीठातील जिन्ना यांच्या फोटोला आक्षेप घेतला आहे.

दरम्यान अलीगढ विद्यापाठीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी उमर पीर यांनी मात्र प्रशासनाला सतीश गौतम यांचं कुठलंही पत्र मिळालं नसल्याचं बीबीसीला सांगितलं.

बीबीसीनं यासंदर्भात सतीश गौतम यांच्याशी संपर्क केला. मात्र वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही. मात्र ट्विटरवर सतीश गौतम याबाबत सातत्यानं ट्वीट करत आहेत.

जिनांचा फोटो नेमका आहे कुठे?

मोहम्मद अली जिन्ना यांचा फोटो नेमका कुठे आहे याविषयी अलीगढ विद्यापीठातले इतिहासाचे प्राध्यापक मोहम्मद सज्जाद यांनी माहिती दिली.

ते म्हणाले, "अलीगढ मुस्लीम विद्यापीठात स्टुडंट युनियन हॉलमध्ये मोहम्मद अली जिन्ना यांचा फोटो 1938 पासून आहे. त्यावर्षी जिन्ना यांना विद्यापीठानं आजीवन सदस्यत्व दिलं. विद्यापीठाच्या स्टुडंट युनियनद्वारे आजीवन मानद सदस्यता देण्यात येते. पहिली सदस्यता महात्मा गांधी यांना प्रदान करण्यात आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सी.व्ही.रमण, जयप्रकाश नारायण, मौलाना आझाद यांनाही मानद सदस्यत्व देण्यात आलं. सदस्यत्व देण्यात आलेल्या मान्यवरांपैकी बहुतांशी व्यक्तींचे फोटो विद्यापीठात लावण्यात आले आहेत."

प्रतिमा मथळा मुंबईतील जिना हाऊस

ऐंशी वर्षांनंतर जिन्ना यांच्या फोटोवरून वाद का निर्माण व्हावा याबाबत सज्जाद यांना विचारलं असता ते म्हणाले, "फाळणीतली जिन्ना यांची भूमिका काय यावर चर्चा करणारी माणसंच या फोटोबाबत आक्षेप घेत आहेत. 1947 नंतर जिन्ना यांचा फोटो का काढण्यात आला नाही अशी विचारणा करत आहेत. अलीगढ विद्यापीठ इतिहास मिटवून टाकण्यावर विश्वास ठेवत नाही. सध्या अनेक ऐतिहासिक वास्तूंचं असंच काहीसं होतं आहे."

यामागचं राजकारण समजून घेणं आवश्यक आहे असं सज्जाद सांगतात.

ते म्हणतात, "अलीगढ विद्यापीठातर्फे बुधवारी माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना आजीवन मानद सदस्यता प्रदान करण्यात येणार होती. जिन्ना यांच्या फोटोला विरोध करणाऱ्या मंडळींनी हमीद यांना एका विचारधारेत अडकवलं आहे. भारतातील मुस्लिमांना अपराधी वाटावं असा त्यांचा प्रयत्न आहे. फाळणीसाठी मुस्लीम नागरिक जबाबदार आहेत आणि ते देशविरोधी आहेत असं वातावरण तयार करण्यात येतं. जेणेकरून त्यांच्या नावानं ध्रुवीकरण करता येतं. कैराना उपनिवडणुका आणि पुढच्यावर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. बेरोजगारी, महागाई या विषयावर काम करण्याची कोणालाही इच्छा नाही. मात्र ध्रुवीकरण करून तेढ निर्माण करायला पुढे येतात."

अलीगढ विद्यार्थी संघाची भूमिका

अलीगढ विद्यापीठात आजीवन मानद सदस्यता विद्यार्थी संघातर्फे देण्यात येते. दरवर्षी ज्या व्यक्तींना सदस्यत्व देण्यात येतं त्या सगळ्या व्यक्तींचे फोटो लावण्यात येत नाहीत.

विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मशकूर अहमद उस्मानी यांनी यासंदर्भातील भूमिका मांडली. ते म्हणाले,"स्टुडंट युनियन स्वतंत्र उपक्रम आहे. स्टुडंट युनियनच्या कामात विद्य़ापीठ दखल देत नाही. जिन्ना यांच्या विचारांचा आम्ही विरोध करतो. मात्र त्यांचा फोटो असणं ऐतिहासिक सत्य आहे. जिन्ना यांचा फोटो विद्यापीठाच्या वास्तूमध्ये आहे. याचा अर्थ विद्यार्थी जिन्ना यांच्याकडून प्रेरणा घेतील असं नव्हे."

ते पुढे म्हणतात, "जिन्ना यांना सदस्यत्व 1938 मध्ये देण्यात आलं आणि त्याचवर्षी फोटो लावण्यात आला. त्यानंतर ते पाकिस्तानला रवाना झाले, त्यांनीच फाळणीचं बीज रोवलं असा विरोधकांचा आरोप आहे. असं सगळं आहे मग जिन्ना हाऊसचं नावही बदला. ते नाव बदलण्यात आलं तर आम्ही फोटोही काढू."

प्रतिमा मथळा अलीगढ विद्यापीठ

याविषयाशी निगडित प्रसारमाध्यमांच्या भूमिकेविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या आठवडाभरात अलीगढ विद्यापीठाला सातत्यानं लक्ष्य करण्यात आलं. टीव्ही चॅनेल्सवर आयोजित होणारे चर्चेचे कार्यक्रम अख्खा देश पाहतो.


याविषयावर आम्ही लेखक आणि राजकीय भाष्यकार सुधींद्र कुलकर्णी यांच्याशी बातचीत केली आहे.


80 वर्षांनंतर वाद घालून काय साध्य होणार?

जिन्ना यांचा फोटो भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी लावण्यात आला होता. फोटो लावून 80 वर्षं झाल्यानंतर त्यावरून वाद घालून काय साधणार? असा सवाल प्राध्यापक आणि विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सज्जाद करतात.

मात्र भाजपचे खासदार सतीश गौतम यांचं म्हणणं वेगळं आहे. ते म्हणतात, "जिन्ना यांचा फोटो स्वातंत्र्यापूर्वीचा आहे. पण मग आता त्यांचा फोटो असण्याचं औचित्य का? जिन्ना यांच्यामुळे देशाची फाळणी झाली. हा फोटो पाकिस्तानला पाठवायला हवा."

यावर उस्मानी म्हणतात, "जिन्ना यांच्या फोटोनं पोटशूळ उठतो. मात्र गांधीहत्येच्या आरोपींपैकी एक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी ते सोयीस्करपणे विसरतात. जिन्ना यांचा फोटो नको असेल तर मग सावरकर यांचा फोटोही हटवायला हवा. इतिहास पुसून टाकायचा असेल तर मग सगळ्याच गोष्टी गाडून टाकायला हव्यात."

भारतात जिना यांचं अस्तित्व कुठे कुठे?

भारतात अनेक ठिकाणी मोहम्मद अली जिन्ना यांचे फोटो आजही आहेत. मुंबईतल्या काँग्रेसच्या कार्यालयात 1918 पासून जिन्ना यांचा फोटो आहे. मुंबईत जिन्ना हाऊस नावाची वास्तू आहे.

प्राध्यापक सज्जाद यांनी जिन्नांविषयीचा लिखित किस्सा सांगितला. 'जिन्ना ऑफ पाकिस्तान' पुस्तकाचे लेखक स्टॅनले वॉल्पर्ट यांनी तो लिहिला आहे.

जेव्हा पहिलं महायुद्ध संपलं तेव्हा बॉम्बे गव्हर्नर यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्यानं त्यांना निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी या निरोप समारंभाविरोधात जिन्ना रस्त्यावर उतरले होते. जिन्ना यांच्या पुढाकारानं हिंदू आणि मुस्लीम असे समाजातले वेगवेगळे घटक एकत्र आले होते. इंग्रजांना विरोध व्हायला हवा असा विचार मांडण्यात आला. त्याचवेळी जिन्ना यांच्यासाठी वर्गणी म्हणून 6500 रुपये जमा करण्यात आले. एक हॉल बांधण्यात आला. या सभागृहाचं नाव 'पीपल्स ऑफ जिन्ना हॉल'. हा हॉल आजही अस्तित्वात आहे.

सज्जाद सांगतात, "फाळणीसाठी फक्त जिन्नाच जबाबदार आहेत का? भारतासाठी जिन्ना खलनायक मानले जातात. पण फाळणीसाठी एकटे जिन्ना कारणीभूत होते का? पाकिस्तानच्या निर्मितीत हिंदू राष्ट्रवादी आणि सावरकर यांची भूमिका नव्हती का?"

विद्यार्थी काय म्हणतात?

"बुधवारी कामानिमित्तानं हॉस्टेलमधून विद्यापीठाच्या दिशेनं जात होतो. त्याचवेळी विद्यापीठाच्या गेटच्या दिशेनं 30 ते 35 मुलं त्वेषानं जात होती. ते सगळे जय श्रीरामचा नारा देत होते. त्यांच्या हातात कट्टा, पिस्तूल आणि धारदार हत्यारं होती. विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी विद्यापीठाच्या प्रॉक्टर यांना धक्काबुकी केली. पोलिसांनी वातावरण शांत केलं. मात्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी या हल्लेखोरांच्या अटकेची मागणी केली तेव्हा पोलिसांनी मुलांवर अश्रुधूर सोडला. त्यांच्यावर लाठीमारही केला," असं मोहम्मद तबीश यांनी सांगितलं. मोहम्मद अलीगढ विद्यापीठात तत्वज्ञानाचे विद्यार्थी आहेत.

प्रतिमा मथळा अलीगढात विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला.

अलीगढ विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी इथल्या वातावरणाबद्दल सांगितलं. हिंदू-मुस्लीम विद्यार्थ्यांदरम्यानचं वातावरण अतिशय सलोख्याचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

"विद्यापीठातून उत्तीर्ण होणारा पहिला विद्यार्थी हिंदू धर्मीय होता. त्यांचं नाव ईश्वरी प्रसाद आहे. मी गेली 20 वर्षं विद्यापीठात शिकतो आहे. धार्मिक कारणांवरून विद्यापीठात हिंसा भडकल्याचं मला कधीही आठवत नाही. एकमेकांच्या धर्माचा आदर केला जातो. उन्हाळ्याच्या सुट्टीत हिंदू धर्मीय मुलं मुस्लीम मित्रांच्या घरी जातात. मुसलमान मुलं हिंदू धर्मीय मुलांच्या घरी जातात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विद्यापीठात प्रवेश करायचा आहे. विद्यापीठाला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विद्यापीठात घुसून युनियनच्या कामकाजात अडथळा आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे," असं अलीगढ विद्यापीठात राज्यशास्त्राचं शिक्षण घेणाऱ्या मोहिबुल हक यांनी सांगितलं.

भाजप खासदार महेश गिरी यांचा विरोध का?

"अलीगढ विद्यापीठात जिन्नांच्या फोटोचा मी निषेध करतो. पाकिस्तानमध्ये लाला लजपतराय यांच्या मूर्तीची 1947 मध्ये मोडतोड करण्यात आली होती. फादर ऑफ लाहौर सर गंगाराम यांच्या मूर्तीची लाहौरमध्ये विटंबना करण्यात आली. कराची हायकोर्टात महात्मा गांधी यांच्या मूर्तीची तोडफोड होऊ नये म्हणून मूर्ती इंडियन हायकमिशनमध्ये स्थलांतरित करण्यात आली. मग जिन्ना यांचा फोटो भारतातल्या विद्यापीठात लावण्याची गरजच काय? वाद निर्माण करण्यासाठीच हे सगळं केलं जात आहे," असं भाजप खासदार महेश गिरी यांनी सांगितलं.

लाठीमाराबाबत पोलिसांचं म्हणणं काय?

"पोलिसांनी हलका लाठीमार केला. काही लोकांनी विद्यार्थ्यांना भडकावून पोलिसांवर दगडफेक केली. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होईल अशी भीती वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटली. म्हणून त्यांनी हलका लाठीमार करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. फोटो आणि व्हीडिओच्या आधारे पोलीस पुढील कारवाई करतील," असं अलीगढचे एसएसपी अजय कुमार साहनी यांनी बीबीसीचे प्रतिनिधी समीरात्मज मिश्र यांना सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)