जामीन मिळाला तरी भुजबळांची ताबडतोब सुटका नाही

छगन भुजबळ Image copyright Chagan Bhujbal

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना काही वेळा पूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. महाराष्ट्र सदन बांधताना पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपांवरून 14 मार्च 2016 पासून भुजबळ मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये होते.

छगन भुजबळ सध्या केईएममध्ये उपचार घेत आहेत. तिथून डिस्चार्ज मिळाल्यावर ते आर्थर रोड जेलमध्ये जातील. तिथे सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांची तुरूंगातून सुटका होईल.

"छगन भुजबळ यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोर्टानं जामीन मंजूर केला असला तरी आमच्याकडे अद्याप कोर्टाची कोणतीच ऑर्डर आलेली नाही. ती येईपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू राहतील आणि ऑर्डर आल्यावर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल," असं केईएमच्या प्रभारी डीन डॉ. धनगौरी शेणवी यांनी स्पष्ट केलं.

Image copyright BBC/Prashant Nanaware
प्रतिमा मथळा केईएम रुग्णालय

भुजबळ यांना केईएम रूग्णालयातील नवीन इमारतीत दुसऱ्या मजल्यावर रूम नं. 43 मध्ये ठेवण्यात आलं आहे.

गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयानं यावरचा निर्णय राखून ठेवला होता. मात्र शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी भुजबळांना जामीन मंजूर करण्यात आला.

71 वर्षांचे भुजबळ गेल्या 2 वर्षांपासून जेलमध्ये बंद आहेत. या प्रकरणी तपासही पूर्ण झाला असल्यानं त्यांच्या तब्येतीचा विचार करता त्यांना जामीन देण्यात यावा, अशी मागणी भुजबळ यांच्या वकिलांकडून करण्यात आली होती. तसंच, सर्वोच्च न्यायालयानं PMLA कायद्याचं 45(1) हे कलम नुकतंच रद्दही केलं होतं, त्या आधारावरही त्यांच्याकडून जामिनाची मागणी करण्यात आली होती.

भुजबळांच्या अटकेनंतर मोठी राजकीय खळबळही माजली होती. त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना देखील अटक करण्यात आली होती. आता छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर नाशिकमध्ये त्यांच्या समर्थकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.

Image copyright BBC/Praveen Thakare

भुजबळांना जामीन मिळाल्यावर या प्रकरणी तक्रार केलेल्या अंजली दमानिया यांनी ट्वीट करत आपलं मत मांडलं. भुजबळांना जामीन मिळाला असला तरी त्यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही. त्यांच्यावर लवकरच आरोप निश्चित होतील आणि ते पुन्हा तुरुंगात जातील असा दावा त्यांनी केला.

आम आदमी पार्टीच्या नेत्या प्रीती मेनन शर्मा यांनी दावा केलाय की भुजबळांना दोषी ठरवता येईल, एवढे पुरावे आहेत.

राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय की भुजबळांना जामीन यापूर्वीच मिळायला हवा होता.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की भगवान के घर में देर होती है, अंधेर नहीं.

"छगन भुजबळ आता लवकरच सक्रिय राजकारणात परत येतील अशी मी आशा व्यक्त करतो," असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलंय. त्यानंतर त्यांनी ट्वीटही केलं.

हेही वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)