#5मोठ्याबातम्या : नाशिक जिल्ह्यात नरबळीचा प्रयत्न?

नरबळीचा प्रयत्न? Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नरबळीचा प्रयत्न?

देशातली वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवरील आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या.

1. नाशिक जिल्ह्यात नरबळीचा प्रयत्न?

त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या पाचकुंडल्याची वाडी या गावात नरबळीचा प्रकार झाल्याच्या संशयावरून खळबळ उडाली आहे, असं वृत्त 'महाराष्ट्र टाईम्स'नं दिलं आहे.

चार महिन्यांच्या एका मुलीचं अज्ञात लोकांनी अपहरण करून नंतर तिला जवळच्याच जंगलात सोडून दिलं होतं. ही लहान मुलगी सापडली तेव्हा तिच्या जवळ हळद-कुंकू आणि इतर पूजा साहित्य सापडल्यानं नरबळी देण्याच्या उद्देशानं तिचं अपहरण झालं होतं असा संशय बळावला आहे.

मुलगी बेशुद्धावस्थेत सापडली होती. तिला उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून पुन्हा पालकांकडे सोपवण्यात आलं.

Image copyright GETTY IMAGES/SAJJAD HUSSAIN

2. दलित भोजनावरून भाजप खासदाराचा पक्षावर निशाणा

उत्तर प्रदेशातल्या भाजप खासदार सावित्रीबाई फुले यांनी भाजप नेत्यांनी दलितांच्या घरी जाऊन जेवण्यावरून पक्षावर निशाणा साधला आहे, असं वृत्त 'टा'नं दिलं आहे.

"दलितांच्या घरी जाऊन, त्यांच्याबरोबर जेवून मग त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत भाजप नेते दलितांचा अपमान करत आहेत" असा आरोप त्यांनी केला आहे.

गेल्या महिन्यात सावित्रीबाई फुलेंनी SC/ST समुदायाला मिळणारं आरक्षण धोक्यात आहे, असं म्हणत आपल्या पक्षावर टीका केली होती.

उत्तर प्रदेश सरकारमधले भाजपचे मंत्री सुरेश राणा यांच्यावर सध्या याच संदर्भात टीका होत आहे. एका दलित कुटुंबाच्या घरी जेवायला गेलेल्या राणा यांनी स्वतःचं अन्न आणि पाणी बाहेरून मागवलं होतं असा आरोप केला जात आहे.

Image copyright PANKAJA MUNDE/FACEBOOK
प्रतिमा मथळा पंकजा मुंडेंच्या निर्णयाला स्थगिती.

3. पंकजा मुंडेंच्या निर्णयाला स्थगिती

बीड जिल्हा परिषदेच्या सहा सदस्यांच्या अपात्रतेला स्थगिती देण्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं स्थगिती दिली आहे.

याबरोबरच या सहाही सदस्यांना आता विधानपरिषद निवडणुकांमध्ये मतदान करता येणार नाही. 'एबीपी माझा'नं आपल्या वृत्तात म्हटलं आहे की ग्रामविकास मंत्र्यांनी कुठलीही सुनावणी न घेता जिल्हाधिकाऱ्यांच्या त्यांना अपात्र ठरवण्याचा निर्णयावर स्थगिती आणली हे अयोग्य आहे, असं मत न्यायालयानं दिलं आहे.

बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संबंधित सहा सदस्यांनी पक्षादेश डावलून भाजप उमेदवाराला मतदान केल्यानंतर त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवलं होतं.

या संदर्भातल्या अपिलाचा निर्णय येईपर्यंत पंकजा मुंडे यांनी या सदस्यांची अपात्रता स्थगित केली होती. भाजपकडून विधान परिषदेच्या निवडणूकीत सुरेश धस यांना तर राष्ट्रवादीनं भाजपमधून आलेले आणि पंकजा मुंडेंचे एकेकाळचे निकटवर्ती रमेश कराड यांना उमेदवारी दिला आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा आहे.

प्रतिमा मथळा अलीगढ विद्यापीठ.

4. अलिगढ शहरात इंटरनेट सेवा बंद

मोहम्मद अली जिन्ना यांच्या फोटोवरून अलीगढ मुस्लीम विद्यापीठातला वाद अजूनही सुरूच आहे. शुक्रवारी दुपारी 2 वाजेपासून मध्यरात्रीपर्यंत अलीगढ शहरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती अशी बातमी 'हिंदुस्तान टा'नं दिली आहे.

विद्यार्थ्यांनी दोन दिवस लेक्चर्सवर बहिष्कार टाकला आहे. विद्यापीठाच्या बब-ए-सईद गेटबाहेर विद्यार्थ्यांनी धरणं आंदोलन केलं.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही जिन्नांचा फोटो विद्यापीठातून काढून टाकावा असं मत व्यक्त केलं. जिन्नांच्या फोटोवरून अलीगढ विद्यापीठ स्टुडंट्स युनियन आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात खडाजंगी सुरू आहे.

5. गडचिरोली एन्काउंटरचा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट सादर

गडचिरोलीत एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेल्या 20 नक्षलवाद्यांच्या पोस्ट मॉर्टम अहवालानुसार 12 नक्षलवादी गोळी लागून आणि 8 नक्षलवादी वाहून गेल्यानं मरण पावल्याचं सिद्ध झालं आहे, असं वृत्त 'इंडियन 'नं दिलं आहे.

या 20 नक्षलवाद्यांमध्ये 15 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे. यातल्या काही नक्षलवाद्यांना अनेक गोळ्या लागून फुफ्फुसं, हृदय आणि मेंदूत गंभीर जखमा झाल्याचं दिसून आलं आहे.

गोळ्या लागून मेलेल्या नक्षलवाद्यांचा प्रचंड रक्तस्राव झाला होता आणि त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते असंही अहवालातून समोर आलं आहे.

या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांपैकी ओळख न पटलेल्या 20 मृतांचे मृतदेह बुधवारी दहन करण्यात आले. 17 मृतदेहांची ओळख पटवून ते त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)