ग्राऊंड रिपोर्ट : आग्य्रात एकाच कुटुंबातील तिघींना वादळानं हिरावून नेलं

धम्बी सिंह
प्रतिमा मथळा धम्बी सिंह

संपूर्ण उत्तर भारतात बुधवारी संध्याकाळी आलेल्या मोठ्या वादळानंतर आग्रा आणि परिसराचा नकाशा साफ बदलून गेला आहे. जवळपास 132 किमी प्रती तास वेगानं वाहणारे वारे आणि त्यासोबत उडालेली धूळ यामुळे इथल्या प्रदेशाचं खूप नुकसान झालं.

आग्रा येथून जवळपास 40 किलोमीटर लांब असलेल्या खैरागड तालुक्यातल्या डुंगरवाला गावात स्मशान शांतता पसरली आहे. या गावातल्या एकाच कुटुंबातल्या आजी आणि त्यांच्या दोन नाती या घर अंगावर कोसळल्यामुळे मृत्युमुखी पडल्या.

हा तोच प्रदेश, जिथे बुधवारच्या वादळानंतर नुकसान झाल्यावर तब्बल दोन डझनहून अधिक लोकांनी प्राण गमावले.

डुंगरवाला गावातल्या या कुटुंबात या तिघींच्या व्यतिरिक्त इतर कोणी नसल्यानं गावकऱ्यांनीच त्यांचे अंत्यसंस्कार केले. लहान मुलांच्या बागडण्यानं हसतं-खेळतं असलेलं हे घर काही क्षणांतच जमीनदोस्त झालं.

इथूनच दूर बढेरा नावाच्या गावातही वादळामुळे नुकसान झालं. या गावातलं जवळपास प्रत्येक कच्चं घर कोसळलेलं दिसतं आहे. गेल्या दोन दिवसांपासून गावात वीजही नसल्यानं पाण्याची समस्याही सुरू झाली आहे.

इथे माझी भेट धम्बी सिंह यांच्याशी झाली. धम्बी वादळाच्या तडाख्यामुळे जखमी झाले होते. त्यांच्या वडिलांचा घर कोसळून त्या ढिगाऱ्याखाली अडकल्यानं मृत्यू झाला.

बीबीसीसोबत बोलताना धम्बी सिंह यांनी सांगितलं की, "सुरुवातीला आम्ही सगळे घराबाहेरच बसलो होतो. वेगानं वारे वाहायला लागल्यावर आम्ही घरात येऊन बसलो. त्यानंतर हवा खूप वेगानं वाहू लागली. वेगानं वारे वाहत असतानाच घराचं छतच आमच्यावर कोसळलं. त्यात माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. माझ्या आणि माझ्या भाच्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. कालच वडिलांवर आम्ही अंत्यसंस्कार केले."

याच गावातल्या सुरेंद्र सिंह यांनी मुलगा आणि भाचा या वादळात गमावला आहे. तर, त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

त्यांचं घर आता केवळ एक ढिगारा होऊन राहिलं आहे. जखमी पत्नी आणि मुलगा यांना त्यांनी आग्रा मधल्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असून त्यांच्या उपचारासाठी गाव ते हॉस्पिटल अशा चकरा मारत आहेत.

आग्रा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (ग्रामीण) अखिलेश भदोरिया यांनी वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी नुकताच या खैरागड भागाचा दौरा केला.

ग्रामीण भागातल्या नागरिकांना या वादळाची पूर्वसूचना देण्यात आली होती. पण, ग्रामीण भागातली घरं काँक्रीटची नसल्यानं इथे जिवितहानी आणि मालमत्तेचं नुकसान जास्त झाल्याची माहिती भदोरिया यांनी दिली.

वादळामुळे इथल्या नागरिकांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. इथे जमलेल्या तरुणांच्या एका समूहानं त्यांनी लोकांना कसं वाचवलं याचं वर्णन केलं.

जोरदार वादळी वारे वाहत असल्यानं लोक ढिगाऱ्यांखाली तब्बल दोन तासांपर्यंत अडकून राहिले. त्यानंतरही बऱ्याच जणांना वाचवण्यात आलं. पण, यात काहींचा मृत्यूही झाला.

खैरागढ तालुक्यात मृतांचा आकडा अधिक असून दोन डझनहून अधिक लोकांचा इथे मृत्यू झाला आहे. शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत. तर, जनावरांचाही मोठ्या संख्येनं मृत्यू झाल्याची माहिती अधीक्षक भदोरिया यांनी दिली.

दरम्यान, पुढील 72 तासात इथे पुन्हा वादळ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे. तसंच, पुन्हा वादळ झाल्यास त्याची क्षमता ही आधीच्या वादळापेक्षा जास्त असेल, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)