पां. वा. काणे : महाराष्ट्राच्या दुसरे 'भारतरत्न' मानकरी विस्मृतीत गेलेत का?

डॉ. पांडुरंग वामन काणे. Image copyright Bhandarkar Oriental Research Institute
प्रतिमा मथळा डॉ. पांडुरंग वामन काणे.

आजपर्यंत महाराष्ट्रातून मोजक्याच मान्यवरांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानानं गौरवलं गेलं आहे. 1958 साली महाराष्ट्रातून महर्षी कर्वे या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले. महाराष्ट्राला दुसरं भारतरत्न मिळालं 1963 साली महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांच्या रूपानं.

संस्कृत, धर्मशास्त्र, भारतीय विद्या (म्हणजे इंडोलॉजी), हिंदू तसंच मुस्लीम कायदा, याबरोबरच फ्रेंच आणि जर्मन भाषेचा अभ्यास असलेल्या पां. वा. काणे यांचा जन्म 7 मे 1880 मध्ये चिपळूणमधल्या पेढे परशुराम इथं झाला. दापोलीत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईचा रस्ता धरला.

'हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र' या आपल्या ग्रंथासाठी काणेंना अनेक सन्मान मिळाले. पण फक्त एक अभ्यासक म्हणून त्यांची ओळख मर्यादित नव्हती. चिपळूणच्या सरकारी शाळेपासून ते भारतरत्न पुरस्कारापर्यंतच्या डॉ. काणेंच्या प्रवासावर एक नजर टाकूया.

1) शिक्षणक्षेत्रात भरीव कामगिरी

M.Aनंतर काणेंनी कायद्याकडे वळत LLMसुद्धा पूर्ण केलं. स्वतः उच्चशिक्षित असलेल्या काणेंनी शिक्षक म्हणूनही मोठं काम केलं. रत्नागिरीच्या सरकारी शाळेपासून सुरूवात करत डॉ. काणेंनी शिकवण्यासाठी मुंबई गाठली. मुंबईत सरकारी शाळेत शिक्षक म्हणून काम केल्यानंतर काही काळात त्यांनी एल्फिन्स्टन आणि विल्सन यांसारख्या महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं.

Image copyright marathi vishwakosh
प्रतिमा मथळा डॉ. काणेंना महामहोपाध्याय ही पदवी ब्रिटिश सरकारने दिली.

शैक्षणिक जीवनात भाऊ दाजी पारितोषिक, दक्षिणा फेलोशिप, झाला वेदान्त पारितोषिक, मंडलिक सुवर्णपदक यांसारखे अनेक सन्मान त्यांनी मिळवले.

मुंबईच्याच गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये सुद्धा त्यांनी शिकवलं होतं. भारतातल्या सर्वांत जुन्या विद्यापीठांपैकी एक अशा मुंबई विद्यापीठाच्या उपकुलगुरूपदाचाही कार्यभार त्यांनी 1947 ते 1949दरम्यान सांभाळला.

2) वकिली आणि संशोधन

"शिक्षण पूर्ण केल्यानंतर काणेंनी मुंबईतच वकिली सुरू केली. मुंबईत असताना काणे गिरगावात राहत असत. ट्रामनं प्रवास करण्याचा तो काळ होता. ते कोर्टात वकिली करत आणि एशियाटिक सोसायटीच्या लायब्ररीत आपला इतर अभ्यास करत असत," त्यांच्या कार्याबद्दल बोलताना संस्कृतचे अभ्यासक डॉ. गणेश उमाकांत थिटे यांनी सांगितलं.

Image copyright BBC/Sharad Badhe
प्रतिमा मथळा डॉ. काणेंनी एशियाटिक सोसायटीत संशोधनाचं काम केलं.

'हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र' हा काणेंनी लिहिलेला ग्रंथ आजही प्राचीन भारतीय कायदेव्यवस्था आणि नियमावलीबाबत प्रमाण मानला जातो.

"कायदा या अर्थानं 'धर्म' हा शब्द इथे आलेला आहे. प्राचीन तसंच मध्ययुगीन भारतात धार्मिक आणि नागरी कायदेव्यवस्था कशी होती याबाबतचा ज्ञानकोषच एकप्रकारे डॉ. काणेंनी तयार केला होता. आजही या विषयाच्या अभ्यासासाठी या ग्रंथाला पर्याय नाही," असंही डॉ. थिटेंनी सांगितलं.

"पाच खंडांत लिहिलेला हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र हा ग्रंथ 1962 मध्ये लिहून पूर्ण झाला होता. पण सगळे खंड लिहून झाल्यानंतर डॉ. काणेंनी पुन्हा पहिल्या खंडाची सुधारित आवृत्ती काढण्याचं काम हातात घेतलं. इतकी त्यांची कामाप्रती निष्ठा होती," भांडारकर प्राच्यविद्या परिषदेचे रजिस्ट्रार प्राध्यापक श्रीनंद बापट यांनी बीबीसी मराठीशी बोलताना हे सांगितलं. काणेंचा हा ग्रंथ भांडारकर संस्थेनेच प्रकाशित केला होता.

3) समाजसुधारणा

फक्त शिक्षण आणि संशोधनच नव्हे तर समाजसुधारणा आणि पुरोगामी विचारांचा पुरस्कार हे ही डॉ. काणेंचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.

हिंदू आणि मुस्लीम कायद्यांचा सखोल अभ्यास, तसंच भारतीय कायदे आणि रुढींचा अभ्यास असलेल्या डॉ. काणेंनी तत्कालीन अनिष्ट चालींविरुद्ध आवाज उठवला होता.

Image copyright Bhandarkar Oriental Research Institute
प्रतिमा मथळा डॉ. पांडुरंग वामन काणे.

केशवपन म्हणजे विधवांना केस कापून टाकण्याची सक्ती करणं, अस्पृश्यता यांसारख्या रुढींना त्यांनी तीव्र विरोध केला. एका केस न काढलेल्या विधवेला पंढरपुरात विठ्ठलाची पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी तिचं वकीलपत्र घेतलं होतं.

आंतरजातीय विवाह, विधवाविवाह तसंच घटस्फोटाचा अधिकार याचाही त्यांनी पुरस्कार केला. पण वकिली आणि शिक्षणक्षेत्रात सक्रीय असणाऱ्या काणेंनी प्रत्यक्ष राजकारणात सहभाग घेतला नाही. 1953 ते 1959 या काळात त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती. राष्ट्रपतींद्वारे नेमण्यात येणाऱ्या 12 सदस्यांमध्ये त्यांचा सहभाग होता.

4) भारतीय विद्यांचा अभ्यास आणि प्रसार

भारतीय विद्या किंवा इंडोलॉजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाखेचा ( ज्यात भारतीय इतिहास, वाङमय, तत्त्वज्ञान आणि संस्कृती यांचा अभ्यास केला जातो ) डॉ. काणे यांचा अभ्यास होता. ओरिएंटल सायन्सेस म्हणजे पौर्वात्य विद्यांबद्दल भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्येही त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं.

Image copyright BHANDARKAR ORIENTAL RESEARCH INSTITUTE
प्रतिमा मथळा भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटने डॉ. काणेंचा ग्रंथ प्रकाशित केला.

1948 साली पॅरिस, 1951 साली इस्तंबूल आणि 1954 साली केंब्रिजमध्ये भरलेल्या प्राच्यविद्या परिषदांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. तसंच वॉल्टेअर इथं 1953 साली भरलेल्या भारतीय इतिहास परिषदेचेही ते अध्यक्ष होते. 1959 साली त्यांची भारतविद्येचे म्हणजे इंडोलॉजीचे राष्ट्रीय प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली.

ज्या एशियाटिक सोसायटी आणि भांडारकर संस्थेच्या सहाय्यानं त्यांनी आपलं संशोधन आणि लिखाण केलं त्या संस्थांमध्ये ते नंतर पदाधिकारीही होते. तसंच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.

5) पुरस्कार आणि ग्रंथसंपदा

काणेंनी संस्कृत साहित्य आणि इतर अनेक विषयांवर विपुल लेखन केलं. कालिदासाच्या धार्मिक आणि तत्वज्ञानविषयाक कल्पना, विदर्भ आणि महाराष्ट्र, हिंदू कायद्याचा वैदिक मूलाधार यांसारख्या अनेक विषयांवर त्यांनी लेखन केलं होतं. एशियाटिक सोसायटीनं संशोधन क्षेत्रात विशेष कामगिरीसाठी 'काणे सुवर्णपदक' द्यायला सुरूवात केली आहे.

संस्कृत आणि इतर भारतीय विषयांच्या अभ्यासासाठी ब्रिटिश सरकारनं डॉ. पां. वा. काणेंचा 1942 साली महामहोपाध्याय ही पदवी देऊन गौरव केला. अलाहाबाद आणि पुणे विद्यापीठानंही 1942 आणि 1960 साली त्यांना डी. लिट् पदवी देऊन सन्मानित केलं.

Image copyright KNOWINDIA.GOV.IN
प्रतिमा मथळा 1963 साली डॉ. काणेंना भारतरत्न पुरस्कार मिळाला.

हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र या त्यांच्या ग्रंथाच्या चौथ्या खंडाला 1956 साली साहित्य अकादमी पारितोषिक मिळालं होतं.

केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही त्यांच्या कार्याचा गौरव केला गेला. 1951मध्ये 'लंडन स्कूल ऑफ ओरिएंटल स्टडीज' या संस्थेनं त्यांना आपली फेलोशिप बहाल केली. 1958 साली त्यांना संस्कृत भाषेचे विद्वान म्हणून राष्ट्रपतींचं प्रशस्तिपत्रही देण्यात आलं.

1963 साली त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवलं गेलं.

हेही वाचलंत का?

हे पाहिलं आहे का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
सर सी. व्ही रामन : ज्यांनी उलगडलं प्रकाशाचं अंतरंग
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
नोबेल पुरस्कारांबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)