सोलापूरकरांनो, उद्या कदाचित भर उन्हातही तुमची सावली दिसणार नाही

तुमची सावली नाहीशी झाली तर? Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा तुमची सावली नाहीशी झाली तर?

'सावली' या शब्दाचे तसे अनेक भावार्थ आहेत. या शब्दावरून मराठीत अनेक वाक्प्रचार, म्हणी आणि कविता सापडतील. त्याचं कारण एकच ते म्हणजे सावलीचं मानवी आयुष्यातलं महत्त्वं. चांगलं-वाईट अशा दोन्ही प्रकारचं.

पण, हीच सावली तुमच्या आमच्या प्रत्यक्ष आयुष्यात वर्षातून किमान एकदा तरी साथ सोडते. या काही दिवसांमध्ये हे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवता येईल! आपली सावली काही क्षणांसाठी चक्क गायब होणार आहे.

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या दिवशी ही सावलीहीन अवस्था पाहायला मिळेल.

सावली का आणि कशी पडते?

याबद्दल औरंगाबादच्या एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ व विज्ञान संस्थेचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितलं, "सूर्यकिरणं जेव्हा एखाद्या वस्तूवर पडतात, तेव्हा त्या वस्तूची सावली जमिनीवर पडते. पृथ्वीचा आस 3.5 अंशानं कललेला असल्यानं हे घडतं. उत्तर गोलार्धातल्या लोकांना डिसेंबरपर्यंत दक्षिणायनाच्या काळात आपली सावली उत्तरेला लांब पडत असल्याचं लक्षात येतं. मग जसं जसं उत्तरायण येतं तसतसं ही सावली लहान लहान होत जाते."

या प्रवासात जेव्हा सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर येतो, तेंव्हा प्रकाश किरणं थेट डोक्यावरून जमिनीवर पायाखाली पडतात, म्हणजे आपली सावली पडत नाही; म्हणजेच सावली गायब होते. या भौगोलिक घटनेला आपण म्हणतो 'शून्य सावली दिवस.'

Image copyright Shrinivas Aundhkar
प्रतिमा मथळा हेलीओस मीटर

महाराष्ट्रात शून्य सावली दिवस मे आणि जुलै महिन्यात येतो, पण जुलैमध्ये पावसाळा असल्यानं आपल्याला फक्त मे महिन्यातच तो अनुभवता येतो.

औंधकर पुढे सांगतात, "सूर्याच्या संक्रमणाप्रमाणे त्या त्या ठिकाणचा शून्य सावली दिवस ठरलेला असतो, त्यात सहसा बदल होत नाही."

सूर्याच्या या वर्षभरातल्या संक्रमणाचा अभ्यास करण्यासाठी 'हेलीओस मीटर' नावाचं उपकरण श्रीनिवास औंधकर यांनी विकसित केले आहे. या द्वारे आपण जगभरातल्या कोणत्याही ठिकाणी असलो तरी आपली दक्षिणायन किंवा उत्तरायण काळात पडणारी सावली कशी असेल हे सहजपणे समजून घेऊ शकतो, असा त्यांचा दावा आहे.

शून्य सावलीचे वेळापत्रक

कोल्हापूर ६ मे दु . १२.३०
रत्नागिरी ७ मे दु . १२.३३
सोलापूर १० मे दु. १२.३१
पुणे १३/१४ मे दु. १२.३१
मुंबई १५ मे दु. १२.३५
औरंगाबाद १८ मे दु. १२.२५
नाशिक १९ मे दु. १२.३१
यवतमाळ २२ मे दु. १२.१४
जळगाव २५ मे दु. १२.२५
नागपूर २६ मे. दु. १२.१०

या बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही मराठी विज्ञान परिषदचे विनय आर. आर. यांच्याशीही संवाद साधला.

त्यांनी याबद्दल एक रंजक गोष्ट सांगितली, "उष्णकटिबंधीय पट्ट्यात संपूर्ण वर्षभरात कुठे ना कुठे 'शून्य सावली दिवस' असतोच. याचं गणित मांडायला गेलं तर असं की, त्या त्या ठिकाणाचे जे अक्षांश असतात, त्या ठिकाणी त्या अंशाच्या लंबरूपात सूर्य आला की तिथं सावली पडत नाही. उदा. कर्कवृत्त साडे-तेवीस अक्षांशावर आहे, म्हणजे जेव्हा सूर्य साडे-तेवीस अंशावर लंबरूप येईल, तेव्हा तिथं सावली पडणार नाही."

Image copyright ज्योतिर्विद्या परिसंस्था, पुणे

"कर्कवृत्तावर २२ जूनला आणि मकरवृत्तावर २३ डिसेंबरला शून्य सावली दिवस असतो. विषुववृत्तावर 23 सप्टेंबर आणि 21/22 मार्चला शून्य सावली दिवस असतो, यांनाच विषुवदिन म्हणतात.

सूर्याच्या भ्रमणानुसार त्या त्या दिवशी, त्या त्या ठिकाणी 'सावली गायब होते'. शून्य सावली दिवशी एकच 'शून्य सावली क्षण' असतो, भर मध्यान्ही! तो हुकवू नका."

आता यामागचं शास्त्र समजून घेऊ. शून्य सावली किंवा सावली नाहीशी होणे हे पूर्णपणे सूर्याचा पृथ्वीशी होणारा कोन यावर अवलंबून आहे.

वर्षातून 2 वेळा होते सावली गायब

कर्कवृत्त भारताच्या मध्यभागातून (पूर्व-पश्चिम) गेले आहे. त्यामुळे कर्कवृत्ताच्या खालच्या भागात म्हणजे कन्याकुमारीपासून साधारण उज्जैनपर्यंत क्रमाक्रमानं सावली गायब होणार आहे.

Image copyright ASI - POEC
प्रतिमा मथळा कर्कवृत्त

पृथ्वीचा उष्णकटिबंधीय भाग (tropical region) म्हणजे कर्कवृत्त ते मकरवृत्त सोडला तर कुठेही सूर्य अगदी माथ्यावर, म्हणजे ९० अंशावर येत नाही, त्यामुळे सावलीरहित अवस्था फक्त याच पट्ट्यात पाहता येते.

तसंही, सूर्य अगदी माथ्यावर कधीच नसतो, तो थोडा उत्तरेला किंवा दक्षिणेला असतो. पृथ्वीचा आस साडे-तेवीस अंशांनी कललेला असल्यामुळे हे घडतं.

ज्या दिवशी सूर्य त्या त्या ठिकाणी ख-बिंदूला (Zenith) पोचतो तेव्हा सावली हरवते. त्या संपूर्ण अक्षांशावर त्या दिवशी 'शून्य सावली दिवस' असतो. कर्कवृत्त ते मकरवृत्त या पट्ट्यात प्रत्येक ठिकाणी वर्षातून दोन वेळा ही घटना घडते.

Image copyright Shrinivas Aundhkar

हे पाहणं सुद्धा रोमांचकारी असतं. याचा प्रयोग तुम्ही घरच्या घरी करू शकता.

सोपं आहे, उन्हात एका काचेवर एखादी बांगडी किंवा कुठलीही पोकळ वस्तू ठेवा. जेव्हा सूर्य नव्वद अंशाला पोचेल तेव्हा फक्त त्या बांगडीचीच गोलाकार सावली तुम्हाला दिसेल.

महाराष्ट्रात खगोलशास्त्राशी संबंधित काही संस्था या दिवशी खास कार्यक्रम आयोजित करतात. थोडंस गुगल केलंत तर तुम्हाला याबद्दलची माहिती सहज मिळेल. तशीच याची माहिती देणारं अॅपही सध्या उपलब्ध आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)