पाकिस्तानविरुद्धच्या त्या मॅचमध्ये सचिननं फक्त आइसक्रिमच खाल्लं!

Image copyright devendra prabhudesai
प्रतिमा मथळा कसा जिंकला सचिन?

1998मध्ये सचिनच्या मनासारखं काही घडत नव्हतं. कप्तानपदावरून त्याची हकालपट्टी झाली आहे हे त्याला साधं कळवण्याची तसदीही निवड समितीनं घेतली नाही.

आणि अशावेळी समोर होती ऑस्ट्रेलियाविरुद्धची सीरिज. शेन वॉर्न तेव्हा जगभरातल्या अव्वल बॅट्समनना स्पिनच्या जाळ्यात टिपत होता. सचिन विरुद्ध वॉर्न असं त्या सीरिजकडे बघितलं जात होतं.

सचिननंही त्याला वॉर्नविरुद्धची सीरिज असं बघितलं आणि वॉर्नला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

सचिननं पहिल्या चेन्नई टेस्टमध्ये 191 बॉलमध्ये 155 रन केलेआणि वॉर्नला पुरतं झोपवलं.

भारतीय टीमचे तेव्हाचे मीडिया मॅनेजर असलेल्या देवेंद्र प्रभुदेसाई यांच्या 'विनिंग लाईक सचिन' पुस्तकात या दौऱ्याच्या आठवणी सांगितल्या आहेत.

'सचिन प्रत्येक दौऱ्याची तयारी वेगळी करायचा. कप्तानीचा कटू अनुभव त्याने मागे टाकला आणि तो वॉर्नला भिडला. मोठ्या संकटाला थेट भिडा. लहान गोष्टींचा निकाल आपोआप लागेल अशी सचिनची विचार करण्याची पद्धत होती'

प्रभुदेसाई यांनी म्हटल्याप्रमाणे अशी होती सचिनची तयारीची पद्धत.

Image copyright devendra prabhudesai
प्रतिमा मथळा 'विनिंग इट लाईक सचिन'

सचिन तेंडुलकरच्या कित्येक इनिंग थेट मैदानातून पाहिलेले क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनीही सचिनच्या मॅच पूर्वीच्या तयारीचा अनुभव अनेकदा घेतला आहे.

त्यांना आठवते ती दक्षिण आफ्रिकेतल्या 2003च्या वर्ल्ड कपमधली पाकिस्तानविरुद्धची मॅच. पाकिस्तान विरुद्ध हरू नका अशी ताकीदच फॅन्सनी टीमला दिलेली असते.

पाकिस्ताननं 274 रन्सचं आव्हान समोर ठेवलेलं असताना सचिनने 75 बॉलमध्ये 98 रन करत पाकिस्तानला संधीच दिली नाही.

पाकिस्तानच्या ताफ्यात तेव्हा वसिम अक्रम, वकार युनूस, शोएब अख्तर आणि अब्दुल रझाक असे बोलर होते.

'सचिनने त्या मॅचमध्ये लंच ब्रेकला फक्त एक आईसक्रीम खाल्लं. मॅच त्याच्यामध्ये भिनलेली होती. एकूणच त्या वर्ल्ड कपमध्ये सचिनने एकदाही नेट प्रॅक्टिस केली नाही.

त्याचा भर थ्रो प्रॅक्टिसवर होता. त्याला बॅट बॉलला लागल्यावर होणारा आवाज ऐकायचा होता.' सुनंदन यांना आता वर्ल्ड कप आठवायला लागला.

सुनंदन यांच्या म्हणण्यानुसार, 'सचिननं बॅटिंग बरोबरच सरावावर प्रेम केलं. सरावात सातत्यानं कल्पकता आणली म्हणून तो प्रदीर्घ खेळू शकला.'

या वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमला फायनलमध्ये पोहोचवण्यात सचिनचा वाटा मोठा होता. 11 मॅचमध्ये 61च्या सरासरीनं 673 रन करत बॅटिंगमध्ये तो अव्वल होता.

सचिनची कारकीर्द आणि तयारी यांचे असे कितीतरी किस्से विनिंग लाईक सचिनमध्ये आहेत. त्यातून लोकांनी घ्यायचा बोधही आहे. मॅनेजमेंट आणि स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून ते लिहिलंय.

प्रतिमा मथळा बॅटिंग इतकंच सचिनने सरावावर प्रेम केलं

सचिन 24 वर्षं का खेळू शकला?

नैसर्गिक गुणवत्तेला मेहनतीची जोड, खेळात सर्वोत्तम राहाण्याचा घेतलेला ध्यास, सातत्याने स्वत:मध्ये सुधारणा करण्याचा अट्टाहास, संकटांना संधींमध्ये बदलण्याची मानसिकता, मॅचसाठी तयारी करतानाची खासियत.

सचिनचं सगळंच वेगळं होतं.

'सचिन दर दिवशी स्वत:मध्ये काहीतरी नवीन शोधायचा. स्वत:ला रिइन्व्हेंट करायचा. म्हणून हे शक्य झालं. तो दृढनिश्चयी खेळाडू होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कव्हर ड्राईव्हचा फटका खेळणार नाही असं त्यानं ठरवलं. त्याप्रमाणे 200 रनच्या इनिंगमध्ये एकदाही त्यानं हा फटका लगावला नाही. तरीही रन केले. स्वत:वर किती नियंत्रण?' देवेंद्र प्रभूदेसाई यांनी आपलं निरीक्षण मांडलं.

तर सुनंदन यांनी सचिनच्या कुटुंबीयांनाही प्रदीर्घ कारकीर्दीचं श्रेय दिलं आहे.

'रात गयी बात गयी हे एकूणच तेंडुलकर कुटुंबीयांचं सूत्र होतं. त्यांनी सचिनला दरवेळी पुढच्या मॅचवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला. झालेल्या मॅचमध्ये सचिनने हजार रन केले तरी त्यात अडकू दिलं नाही. त्यामुळे सचिनची नजर कायम समोर राहिली.' सुनंदन यांनी आपलं मत मांडलं.

सचिन बरोबर मुंबई रणजी टीममध्ये एकत्र खेळलेले अमोल मुझुमदारही सचिनची तयारी आणि क्रिकेटची समज यावर न थकता बोलू शकतात. त्यांच्या मते सचिन एक क्रांती आहे.

'सचिन पिचवर असेल तर त्याला खेळताना बघून निम्म्या गोष्टी समजतात. बॉल वळायला लागलाय, विकेट टणक आहे की ओली त्यांना बोलरच्याही आधी समजतं. तिथेच बॅट्समन म्हणून त्यांची महानता सिद्ध होते.' अमोल यांनी सांगितलं.

सचिनचे रेकॉर्ड त्याच्याविषयी खूप काही बोलतात. पण, सचिनला जवळून पाहिलेल्या लोकांकडून त्याच्या खेळाचे आणि व्यक्तिमत्वाचे नवनवीन पैलू उलगडतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)