#5मोठ्याबातम्या : बूट लपवल्यावरून वाद, नवरदेवाचं डोकं फोडलं अन् लग्न मोडलं

लग्नाच्या आधी वधुपक्षाने नवरदेवाचा बूट चोरला अन् गोंधळ उडाला. Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा लग्नाच्या आधी वधुपक्षाने नवरदेवाचा बूट चोरला अन् गोंधळ उडाला.

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. बूट लपवल्यामुळं लग्न मोडलं

लग्नाच्या वेळी नवरीच्या भावाने नवरदेवाचे बूट लपवल्यामुळे लग्नात गोंधळ उडाला. त्याचं रूपांतर भांडणात झालं. या भांडणाच्या वेळी झालेल्या मारहाणीत सासऱ्यानं नवरदेवाचं डोकं फोडलं आणि नवरदेवानं मुलीला तिथेच तलाक दिला.

एखाद्या 80च्या दशकातल्या हिंदी चित्रपटाचं कथानक वाटावं, अशी ही घटना बीड जिल्ह्यातील कुंभेफळ इथे घडली.

झी 24 तासनं दिलेल्या बातमीनुसार, तुळजापूर इथे काम करणाऱ्या सुलतान शेखचं लग्न नबी सिकंदर शेख हिच्याशी होणार होतं. लग्नाच्या आधी वधुपक्षाने नवरदेवाचा बूट चोरला अन् गोंधळ उडाला. पण हा वाद समोपचारनं मिटवण्यात आला. त्यानंतर त्यांचं लग्न लावण्यात आलं.

जेवण करत असताना याच गोष्टीवरून वाद पुन्हा पेटला आणि मारहाण सुरू झाली. सासऱ्यानं नवरदेवाच्या डोक्यात चक्क लाकूड मारलं.

नवरदेवाच्या डोक्याला स्थानिक सरकारी रुग्णालयात सहा टाके लागले. मग काय? त्यानंतर लगेच हे लग्न मोडलं.

2. 'मोदींचं वर्तन पंतप्रधानपदाला शोभत नाही'

आपल्या विरोधकांवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फार खालच्या पातळीवर घसरले आहेत. त्यांची वागणूक पंतप्रधानपदाला अनुसरून नाही, अशी टीका माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते मनमोहन सिंग यांनी कर्नाटकमध्ये केली.

Image copyright Getty Images

टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार सिंग म्हणाले, "पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीनं त्या पदाचा मान राखणं आवश्यक आहे. पंतप्रधान असलेल्या व्यक्तीनं आतापर्यंत कधीच या पदाचा वापर दुसऱ्यावर टीका करण्यासाठी केला नाही. त्यांनी आपल्या पदाला शोभेल असं वागलं पाहिजे. "

मोदींच्या आर्थिक धोरणांमुळे देश डबघाईला आला असल्याची टीकाही सिंग यांनी केली.

3. 'पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडेंना धोबीपछाड'

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आपले चुलत भाऊ आणि राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांना धोबीपछाड दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Image copyright PANKAJA MUNDE/FACEBOOK

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या सुरेश धस यांना भाजपतर्फे उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर स्थानिक नेते आणि गोपीनाथ मुंडेंचे खंदे समर्थक राहिलेल्या रमेश कराड यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला अन् राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिली.

पण ऐनवेळी कराड यांनी विधान परिषदेच्या उमेदवारीचा अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादीवर नामुष्कीची वेळ आली. राष्ट्रवादीकडे दुसरा उमेदवार नसल्यामुळं पक्षाने आता अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पाठिंबा जाहीर केल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे.

पंकजा मुंडेंनी हा 'मास्टरस्ट्रोक' खेळला असल्याचं एबीपीनं म्हटलं आहे.

4. भाजपचे एक तृतीयांशहून अधिक उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

कर्नाटक निवडणुकीत भाजपने उभे केलेले 37 टक्के उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचं निरीक्षण असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सनं (ADR) मांडलं आहे.

विधानसभेसाठी अर्ज दाखल केलेल्या 2,560 उमेदवारांच्या शपथपत्रांचा अभ्यास करून ADR ने ही माहिती जाहीर केली आहे, असं वृत्त द वायरनं दिलं आहे.

Image copyright BJP

भाजपने उभे केलेल्या 224 उमेदवारांपैकी 83 उमेदवार (37%), काँग्रेसने उभे केलेल्या 220 उमेदवारांपैकी 59 उमेदवार (27%) आणि जनता दलाने उभे केलेल्या 199 उमेदवारांपैकी 41 (21%) उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत, असं ADRच्या अहवालात म्हटलं आहे.

5. कठुआ बलात्कार-खून प्रकरणाची सुनावणी पठाणकोटमध्ये होणार

कठुआ बलात्कार आणि खून प्रकरणाची सुनावणी जम्मू-काश्मीरबाहेर व्हावी, अशी याचिका पीडितेच्या कुटुंबीयांना आणि वकिलांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी करत, हा खटला आता पंजाबमधील पठाणकोटमध्ये चालणार, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार या प्रकरणाची CBI चौकशी होणार नसल्याचंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

जम्मूजवळच्या कठुआमध्ये जानेवारीत आठ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. एका आठवड्यानंतर तिचा मृतदेह सापडला.

या प्रकरणाची चार्जशीट दाखल करण्यावरून कोर्टाबाहेर निदर्शनं झाली होती. आणि घटनेची तीव्रता लक्षात आल्यानंतर ती राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरली होती.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)