सावरकरांनी खरंच भारत-पाक फाळणीची बीजं पेरली होती का?

सावरकर आणि जिन्ना
प्रतिमा मथळा सावरकर आणि जिन्ना

'1923मध्ये विनायक दामोदर सावरकरांनी 'हिंदुत्व' ही संकल्पना मांडली होती, त्यामुळे सावरकर हेच द्विराष्ट्रवादाच्या संकल्पनेचे जनक आहेत,' असं विधान काँग्रेसचे निलंबित नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी केल्यामुळे नवा वाद पेटला आहे.

'पाकिस्तान-भारत संबंध : पुढील वाटचाल' या विषयावर लाहोरमधल्या फॉर्मन कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

उत्तर प्रदेशातल्या अलिगढ मुस्लीम विद्यापीठातून मोहम्मद अली जिन्ना यांचा फोटो हटवण्याची मागणी भाजपने केली असतानाच अय्यर यांनी हे विधान केलं आहे. त्यामुळे फाळणीचा वाद नव्याने उफाळून आला आहे.

मणिशंकर अय्यर यांनी याआधी देखील सावरकरांवर टीका केली होती. अंदमान इथल्या तुरुंगात सावरकरांनी भिंतीवर लिहिलेलं काव्य देखील मिटवण्याचा अय्यर यांनी प्रयत्न केला होता. त्यावेळी ते केंद्रात मंत्री होते.

पण अय्यर यांचं ताजं विधान तथ्यांवर आधारित आहे का? हिंदू आणि मुस्लिमांसाठी दोन राष्ट्रं असावीत, असं म्हणणारे खरंच सावरकर पहिले नेते होते का?

1923

सावरकरांनी 1923 साली अंदमानात पोर्ट ब्लेअर इथे तुरुंगात असताना 'Essentials of Hindutva' हा ग्रंथ लिहिला. या पुस्तकात त्यांनी हिंदू, हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्र या विषयांवर विचार मांडले आहेत. याच पुस्ताकाचा उल्लेख अय्यर यांनी केला आहे.

या पुस्तकात सावरकरांनी थेट दोन राष्ट्रांचा (द्विराष्ट्र) उल्लेख केला नाही, यावर इतिहासकारांचं एकमत आहे, पण त्यांच्या विधानांचा काय अर्थ लावावा, यावरून मतभेद आहेत.

"सावरकरांनी आपल्या पुस्तकात कुठेच द्विराष्ट्रवाद हा शब्दप्रयोग केला नाही. पण हिंदू आणि मुस्लीम हे दोन वेगळे समुदाय वेगळ्या राष्ट्राप्रमाणेच राहतात अशी त्यांची एकूण मांडणी होती. सावरकरांनी हिंदुराष्ट्राची संकल्पना मांडली आणि त्यातूनच द्विराष्ट्राचा सिद्धांत पुढं आला," असं इतिहासकार राम पुनियानी म्हणतात.

जर सावरकरांनी द्विराष्ट्रवाद थेट मांडला नव्हता, तर मग त्यांना त्यासाठी जबाबदार धरणं योग्य आहे का, असं विचारल्यावर पुनियानी म्हणतात, "हिंदू महासभा केवळ हिंदूंच्या हिताची मागणी पुढे रेटत असल्यामुळे मुस्लीम लीग केवळ मुस्लीम हिताचीच चर्चा करू लागली. त्यातून हा वाद जन्माला आला."

पण सावरकरांच्या विधानांचा चुकीचा अर्थ लावण्यात येत आहे, असं काही जाणकारांचं मत आहे.

"मणिशंकर अय्यर ऐतिहासिक तथ्यांना चुकीच्या पद्धतीने मांडत आहेत. सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत कधीच मांडला नाही. हिंदुत्वाची संकल्पना त्यांनी पूर्ण विचाराअंती मांडली आहे," असं मत इंडिया टुडेचे डेप्युटी एडिटर उदय माहूरकर यांनी मांडलं आहे.

1930

सावरकरांनी हे पुस्तक लिहिलं त्यानंतर 7 वर्षांनी म्हणजे 1930 साली अलाहाबादमध्ये झालेल्या मुस्लीम लीगच्या अधिवेशनात मागणी करण्यात आली की पंजाब, अफगाण, काश्मीर, सिंध आणि बलुचिस्तान या प्रांतांना स्वायत्तता देण्यात यावी. त्यावेळी पाकिस्तान हा शब्द वापरण्यात आला नव्हता.

Image copyright Getty Images

1933

चौधरी रेहमत अली यांनी सर्वप्रथम पाकिस्तान ही संकल्पना मांडली, असं इतिहासकार शेषराव मोर सांगतात. 1933मध्ये चौधरी रेहमत अली यांनी 'नाऊ ऑर नेव्हर' नावानं एक पत्रक काढलं होतं. पाकिस्तानच्या राष्ट्रीय चळवळीचा संस्थापक अशी सही रेहमत अली यांनी या पत्रकावर केली आहे. 'हिंदू आणि मुस्लिमांचं वेगळं राष्ट्रीयत्व असल्यामुळं पाकिस्तानला राष्ट्र म्हणून मान्यता मिळावी,' असं त्यांनी या पत्रकात म्हटलं आहे.

चौधरी रेहमत अली यांच्याआधी 18 डिसेंबर 1887 रोजी सर सय्यद अहमद खान यांनी लखनौ येथे एक भाषण दिलं होतं. या भाषणात त्यांनी 'दोन राष्ट्रं' उल्लेख केला होता, असंही मोरे सांगतात. सावरकरांनी हिंदुत्वाची संकल्पना मांडली, त्याच्या 36 वर्षं आधी हे भाषण सर सय्यद अहमद खान यांनी केलं होतं.

1937

हिंदू महासभेच्या 1937 सालच्या अधिवेशनात सावरकर द्विराष्ट्राविषयी स्पष्टपणे बोलले होते. पण सावरकरांचे अनुयायी म्हणतात की सावरकर केवळ वस्तुस्थिती सांगत होते.

"भारत एक राष्ट्र आहे, पण मुस्लीम याच भूमीत वेगळं राष्ट्र मानून राहतात, अशी जाणीव सावरकरांनी करून दिली होती," असं अभिनव भारतचे अध्यक्ष मिलिंद जोशीराव म्हणतात. सावरकर अखंड भारताच्या बाजूने होते, असा दावाही ते करतात.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा 'जिन्ना हे द्विराष्ट्रवादी होते पण ते फाळणीवादी नव्हते'

वादाला फुटलं तोंड

भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीची बिजं सावरकरांनी पेरली या अय्यर यांच्या विधानानंतर भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस आणि पाकिस्तानमध्ये टेलेपथी आहे, असा आरोप भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केला.

त्याला उत्तर देताना काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटलंय की अय्यर यांना काँग्रेसने निलंबित केलं असून त्यांच्या विधानांना महत्त्व देऊ नये.

याच पार्श्वभूमीवर आम्ही वाचकांची याबाबत काय मतं आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

यावर अनेक वाचकांनी आपली मतं बीबीसी न्यूज मराठीच्या ट्विटर आणि फेसबुक अकाउंट्सवर मांडली.

द्विराष्ट्रवादाच्या सिद्धातांची बिजं सर्वप्रथम सय्यद अहमद खान यांच्या अलिगढ विचारसरणीतून पुढे येतात, त्यामुळे अय्यरांच्या बालिश बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे, असं संजय राजपूत लिहितात.

Image copyright Facebook

तर संजय राजपूत यांच्या या प्रतिक्रियेवर कृष्णा पडवळ म्हणतात यांनी मणिशंकर अय्यर यांची बालिश बुद्धी नसून त्यांनी जाणूनबुजून हे वक्तव्य केलं आहे.

सावरकर आणि जिन्ना या एकाच विचारधारेच्या व्यक्ती आहेत, असं कौस्तुभ पवार यांना वाटतं. जरी या दोघांनी पूर्व आयुष्यात स्वातंत्र लढ्यासाठी योगदान दिलं असलं तरी द्विराष्ट्र सिद्धांतासाठी सारखेच निंदनीय आहेत, असं अजित तदावी सांगतात.

Image copyright Facebook

खरा इतिहास वाचल्याशिवाय प्रतिक्रिया देणार नाही, असं प्रामाणिकपणे नरेंद्र छाजेड यांनी लिहिलं आहे.

Image copyright Facebook

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)