#5मोठ्या बातम्या : ...तर येत्या काळात पाण्यासाठी युद्धच होईल - सुप्रीम कोर्ट

पुढचं युद्ध पाण्यासाठी होणार? Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पुढचं युद्ध पाण्यासाठी होणार?

आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :

1. '...तर पाण्यासाठी युद्धच होईल'

राजधानी दिल्लीतील भूजलाच्या पातळीत लक्षणीय घट होत असल्याने सुप्रीम कोर्टानं मंगळवारी यावर चिंता व्यक्त केली.

लोकसत्ता च्या बातमीनुसार, दिल्लीतील भूजल उपसासंदर्भात दाखल झालेल्या एका याचिकेवर मंगळवारी न्या. मदन लोकूर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान दिल्लीतल्या भूजल पातळीसंदर्भातल्या एका अहवालावरून कोर्टानं संबंधित यंत्रणांना फटकारलं आहे.

"राष्ट्रपती भवनाच्या परिसरातील भूजल पातळीदेखील खालावली आहे. आपण काय करतोय? राष्ट्रपतींनाही पाणी देण्यासाठी सक्षम वाटत नाही. बिर्ला मंदिरालाही पाणी देता येत नाही. कुणीही पाण्याशिवाय कसं जगू शकतं? सद्यस्थितीत पाण्यापेक्षा गंभीर समस्या नाही आणि परिस्थिती खरंच गंभीर आहे," असं सुप्रीम कोर्टा म्हणाले.

भूजल उपसा असाच सुरू राहिला तर आगामी काळात पाण्यासाठी युद्ध होईल, अशी भीती सुप्रीम कोर्टानं व्यक्त केली आहे.

2. ... तर मी 2019मध्ये पंतप्रधान होईल : राहुल गांधी

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरल्यास मी पंतप्रधान होऊ शकतो, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले आहेत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, भारतीय जनता पक्षाविरोधात देशातील अनेक विरोधी पक्ष एकत्र येत असताना राहुल यांनी हे मत मांडलं आहे.

तसंच, 2019 मध्ये भाजपची सत्ता येणार नाही आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असंही भाकीतही त्यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.

3. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती : अमित शहा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकांसाठीही हालचाली सुरू केल्याचे संकेत दिले आहेत.

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, 2019च्या लोकसभा निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढवेल, असं अमित शहा यांनी माध्यमांना मंगळवारी सांगितलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा भाजप अध्यक्ष अमित शहा

"तेलुगू देसम पार्टी (TDP) स्वत:हून आघाडीतून बाहेर पडले. ओडिशात भाजप आणि बिजू जनता दल यांच्यात लढत होईल. तृणमूल काँग्रेस अस्तित्वासाठी भाजप कार्यकर्त्यांवरच हल्ले करत आहे. पण लोकसभा निवडणुकीत ते आम्हाला रोखू शकत नाही," असंही शहा म्हणाल्याचं वृत्त महाराष्ट्र टाईम्सने दिलं आहे.

4. महिला-बालकल्याण विभागात 6.25 कोटींचा गैरव्यवहार

महिला आणि बालविकास विभागातील अधिकाऱ्यांच्या मेहरबानीमुळे विभागात 6.15 कोटींचा गैरव्यवहार झाला असल्याचं सकाळच्या एक्स बातमीतून समोर आलं आहे.

संस्थेत मुलांचे खोटे प्रवेश दाखवून बालकाश्रम चालविणाऱ्या खास मर्जीतील संस्थाचालकांवर अनुदान वाटपातील 6 कोटी 25 लाख रुपयांचा गैरव्यवहार बालविकास संस्थाचालक आणि कर्मचारी संघटनेनं समोर आणला आहे.

या अंतर्गत वर्षाला 60-70 हजार मुलांचे प्रवेश अपेक्षित असताना 2017-18 मध्ये केवळ 14 हजार प्रवेश झाले. यासाठी जवळपास 23 कोटी 33 हजारांची तरतूद करण्यात आली होती. एकट्या बीड जिल्ह्याला 125 मुलांसाठी तब्बल एक कोटी 75 लाख रुपये वितरित करण्यात आले, असं या वृत्तात म्हटलं आहे.

टक्केवारीच्या लालसेने लबाडांच्या घशात कोट्यवधी रुपये घालणाऱ्या भ्रष्ट उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्या मालमत्तेची सक्तवसुली संचलनालयामार्फत चौकशी करावी, अशी मागणी बालविकास संस्थाचालक व कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी जोशी यांनी केली आहे.

5. माल्ल्या 10 हजार कोटींचा खटला हरला

ब्रिटनमध्ये भारतीय बँकांनी उद्योगपती विजय माल्ल्यांविरोधात 10 हजार कोटींचा खटला दाखल केला होता. ब्लूमबर्ग या संस्थेच्या वृत्तानुसार मल्ल्या तो हरले आहेत.

महाराष्ट्र टाईम्सनं दिलेल्या बातमीनुसार, जाणूनबुजून बंद पाडण्यात आलेल्या किंगफिशर एअरलाईन्स कंपनीनं 1.4 अब्ज डॉलरचं कर्ज घेतलं होतं.

प्रतिमा मथळा विजय माल्ल्या

त्यामुळे हे कर्ज वसूल करण्यासाठी भारतीय न्यायालयांनी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तुम्ही करू शकता, असे आदेश लंडन न्यायालयाने IDBI बँकसहित कर्ज देणाऱ्या बॅंकांना दिले आहेत.

तसंच माल्ल्याची जगभरातली संपत्ती गोठवण्याचा आदेशही न्यायालयानं जैसे थे ठेवला आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)