#5मोठ्याबातम्या - काश्मिरी तरुणांनो, तुम्हाला आझादी कधीच मिळणार नाही : लष्करप्रमुख बिपिन रावत

लष्करप्रमुख बिपिन रावत Image copyright PIB
प्रतिमा मथळा लष्करप्रमुख बिपिन रावत

आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :

1. 'तुम्ही आमच्याशी लढू शकत नाही'

"आझादी कधीच मिळणार नाही, तुम्ही सैन्याशी लढू शकत नाही. हे काश्मीरी युवकांनी मनावर बिंबवायला हवं," असं भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी काश्मीरच्या तरुणांना सांगितलं आहे.

'द इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, "बंदुकी उगारून संघर्ष करून काश्मिरी तरुणांना आझादीचं स्वप्न दाखवणं म्हणजे त्यांची दिशाभूल करणं आहे."

"आमच्याशी लढताना किती लोक मरण पावले ही संख्या माझ्यासाठी महत्त्वाची नाही, कारण हे सत्र असंच सुरू राहणार आहे. तिकडे नवीन लोकांची भरती सुरू आहे. पण हे सर्वकाही निष्फळ आहे, यातून काहीही निष्पन्न होणार नाही," असं ते म्हणाले.

"काश्मीरमधल्या संघर्षामुळे आम्हाला आनंद मिळतो, असं नाही. पण तुम्ही जर आमच्याशी लढणार असाल तर आम्ही संपूर्ण सैन्यानिशी तुमचा सामना करू," असं रावत म्हणाले.

दरम्यान, रमजानच्या काळात आणि पुढच्या महिन्यापासून अमरनाथ यात्रा सुरू होत असल्यानं जम्मू-काश्मीरमध्ये संघर्षविराम घोषित करायला हवा, अशी मागणी राज्यातल्या सर्व पक्षांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

2. पंकज भुजबळ उद्धव ठाकरेंना भेटले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी बुधवारी 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

"तब्येतीची काळजी घ्या, कुटुंबीयांसोबत राहा, महिनाभरानंतर भेटून बोलू," अशा शब्दांत उद्धव यांनी भुजबळ यांच्याविषयी आपुलकी व्यक्त केल्याचं महाराष्ट्र टाइम्सच्या बातमीत म्हटलं गेलंय.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा उद्धव ठाकरे

तुरुंगात असतानाही आधीचं वितुष्ट बाजूला ठेवत शिवसेनेनं भुजबळ यांची बाजू घेतली होती. त्याला प्रतिसाद म्हणूनच बुधवारची भेटगाठ होती. तसंच आवश्यकता भासल्यास घरवापसीचा हा एक नवा मार्ग असावा यासाठी भुजबळ प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे.

3. मुख्यमंत्र्यांसाठी नवीन हेलिकॉप्टर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर नवीन हेलिकॉप्टर खरेदी करण्याचं सरकारनं ठरवलं आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

सिर्कोस्की कंपनीच्या या नव्या हेलिकॉप्टरकरिता 127 कोटी रुपयांची तरतूद करणारा निर्णय शासनाने बुधवारी जाहीर केला आहे.

Image copyright PUNIT PARANJPE/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा देवेंद्र फडणवीस

विशेष म्हणजे यापूर्वी सरकारकडे सिर्कोस्की कंपनीचेच हेलिकॉप्टर होते. पण किमान तीन अपघातानंतर नवे हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी ज्या निविदा आल्या, त्यात किंमत आणि तंत्रज्ञान यांचे निकष सिर्कोस्की कंपनीनेच पूर्ण केले. म्हणून आता पुन्हा त्याच कंपनीकडून नवीन हेलिकॉप्टर खेरदी करण्यात येणार आहे.

4. 'माझ्यापुढे सगळ्यांच्या कॉलर खाली'

साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या एका कार्यक्रमासाठी शरद पवार आले होते. तेव्हा यांनी राष्ट्रवादीत अंतर्गत गटबाजीबाबत विचारलं असता शरद पवार यांनी "काही पेच-बीच होत नाहीत. मी असल्यावर सगळं ठीक होतं, उतारा वगैरे काढायची वेळच येत नाही," असं उत्तर दिलं.

पण लोकमतच्या वृत्तानुसार तिथेच न थांबत पवारांनी स्थानिक खासदार उदयनराजे भोसले यांना चिमटा काढला.

"तुम्ही बघा त्यावेळेस सगळे सरळ असतात. अशी (वर) असते ती कॉलर अशी (खाली) होते," असा टोमणा मारताना पवारांनी कॉलरला हात लावून कॉलर खाली करून दाखवली.

5. मोदी 9वे सर्वांत शक्तिशाली व्यक्ती

फोर्ब्सच्या 10 शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत मोदी 9व्या क्रमांकावर असल्याची बातमी दिव्य मराठीनं दिली आहे.

मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय भ्रष्टाचार संपवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल होतं, असं फोर्ब्सनं म्हटलं आहे. तसंच लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या देशात मोदी सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत, असंही फोर्ब्सनं म्हटलं आहे.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा नरेंद्र मोदी

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मागे टाकत यंदा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग या यादीत प्रथमच पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)