सोनम कपूर-अहुजा : लग्नानंतर नवऱ्याचं आडनाव लावणं योग्य?

सोनम कपूर, बॉलीवूड, फेमिनिझम Image copyright Twitter

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. हे पाहताना आपणच वऱ्हाडी असल्यासारखं वाटतं. सोनम कपूरनं आपल्या नावासोबत पतीचं अहुजा हे आडनाव जोडण्याचा निर्णय इन्स्टाग्राम आणि ट्वीटरच्या माध्यमातून जाहीर केल्यावर तर मला हा तुमच्या माझ्या आयुष्यातला मुद्दा असल्यासारखं वाटतंय.

सोनमनं नवऱ्याचं आडनाव लावणं योग्य वाटतं? मुलीनं लग्नानंतर नवऱ्याचं आडनाव लावावं की वडिलांचं आडनाव कायम ठेवावं? तूर्तास तरी हेच दोन पर्याय आहेत ना!

मुलीला स्वत:चं किंवा आईचं आडनाव तर नाहीयेच. मुलीची ओळख वडील किंवा नवरा यांच्या आडनावाचेच होत असते.

भारतात हिंदू धर्मीय कुटुंबीयांमध्ये तरी लग्नानंतर मुलीनं नवऱ्याचं आडनाव लावण्याची पद्धत रुढ आहे. अनेक कुटुंबांमध्ये मुलीचं नावदेखील बदललं जातं. काही कुटुंबांमध्ये मुलीचं नाव तसंच राहतं मात्र आडनाव बदलतं.

उत्तरपूर्व आणि दक्षिण भारतीय राज्यं सोडली तर देशात बहुतांश ठिकाणी मुलीचं आडनाव सर्रास बदललं जातं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा लग्नानंतर महिलांचं नाव तसंच आडनाव बदलणं भारतात सर्रास घडतं.

साचेबद्ध गोष्टी बाजूला सारून शिल्पा शेट्टीनं कुंद्रा, ऐश्वर्या रायनं बच्चन तर करिना कपूरनं खान- या तिघींनी आपल्या मूळ आडनावापुढे नवऱ्याचं आडनाव लावण्यामागे काहीतरी विचार नक्कीच असेल.

बच्चन किंवा खान नावामागे असलेला महिमा मिळवण्यासाठी असं केलंय का आपली मूळ पूर्णत: मिटवून टाकायची नसल्यानं त्यांनी असं केलं?

गेल्या काही वर्षांमध्ये लग्नानंतर नाव बदलणं मुलींसाठी कमीपणाचं मानलं जातं. त्यांची ओळखच पुसून टाकण्याचा हा प्रकार असल्याचं मानलं जातं.

लग्नाच्या नात्यानं बांधल्या जाणाऱ्या दोन व्यक्तींनी आपलं व्यक्तिमत्व जसं आहे तसं राखणं अपेक्षित असतं. मुलाचं नाव बदलत नाही तर मुलीचंही नाव बदलायला नको.

बॉलीवूडमधील शबाना आझमी, विद्या बालन, किरण राव यांनी लग्नानंतर आपलं आडनाव बदललेलं नाही. लग्नानंतर मुलीचं नाव बदलण्याचा प्रकार जुना आहे आणि हे केवळ भारतापुरतं मर्यादित नाही.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सोनमने नवऱ्याचं नाव लावण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

इतिहासकारांच्या मते, 14व्या शतकात लग्नानंतर मुलीचं आडनाव बदलण्याची परंपरा सुरू झाली. लग्नानंतर महिला आपलं आडनाव गमावते. लग्नानंतर ती पतीची होऊन जाते. पुरुष आणि स्त्री एक होतात. महिलेच्या नावातलं पतीचा उल्लेख त्याचं प्रतीक आहे.

महिलांच्या अधिकारांविषयी जागरुकता निर्माण झाली तसं यामध्ये बदल घडू लागला. अनेक महिलांनी पतीचं नाव जोडण्यास नकार दिला.

काही देशांमध्ये यासंदर्भात कायदेही तयार करण्यात आले.

1970 आणि 1980च्या दशकात ग्रीसमध्ये कायदा तयार करण्यात आला. त्यानुसार महिलांना लग्नानंतर आईवडिलांनी दिलेलं नाव-आडनाव लावणं सक्तीचं करण्यात आलं. ग्रीसमध्ये लग्नानंतर महिलेनं नवऱ्याचं आडनाव जोडणं बेकायदेशीर आहे.

मुलं झाल्यानंतर त्यांना आईचं आडनाव मिळणार का वडिलांचं याबाबतही कायद्यात स्पष्ट उल्लेख आहे. आईवडिलांनी एकत्र येऊन हा निर्णय घ्यायचा आहे.

महिलांच्या दृष्टिकोनातून विचार झाल्याचं ग्रीसमधलं हे एकमेव उदाहरण नाही. याच काळात ग्रीसमध्ये शिक्षण तसंच अन्य रोजगार संधींमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क देण्यात आलं.

याच धर्तीवर इटलीमध्ये 1975 मध्ये कायद्यात बदल करण्यात आला. यानुसार महिला लग्नानंतर आपलं मूळ आडनाव कायम ठेवू शकतात. त्यांना तो अधिकार कायद्यानं मिळवून दिला.

बेल्जियममध्येही लग्नानंतर महिलेचं आडनाव बदलत नाही. 2014 वर्षाआधी मुलाला आपल्या वडिलांचं आडनाव मिळेल असा कायदा होता. मात्र त्यात बदल करण्यात आला. मुलाला आई किंवा वडिलांचं कोणाचंही आडनाव मिळू शकतं.

नेदरलँड्समध्ये तर लग्नानंतर पुरुषही आपलं नाव बदलून पत्नीचं आडनाव लावू शकतो. मुलांना आई किंवा वडील कोणाचंही आडनाव ठेवण्याची मुभा आहे.

आडनाव कोणाचं हा मुद्दा सातत्यानं ऐरणीवर येतो. हॉलीवूड अभिनेत्री केट विन्स्लेट हिने पतीचं आडनाव लावण्यास तयार नसल्याचं 2013 मध्ये म्हटलं होतं. ते तिचं तिसरं लग्न होतं. मला माझं आडनाव आवडतं असं केटनं सांगितलं. तिने ते बदललं नाही आणि यापुढेही बदलणार नाही.

केट यांचं पहिलं लग्न 1998मध्ये झालं होतं. त्यावेळीही तिने आपल्या पतीचं आडनाव लावण्यास नकार दिला होता.

भारतात महिलेनं नवऱ्याचं आडनाव न लावणं, स्वत:चं मूळ नाव न बदलणं बरोबरीचं प्रतीक असू शकतं. पण एक गोष्ट विसरून चालणार नाही. अजूनही आपल्याकडे लग्नानंतर मुलीला नवऱ्याच्या घरी जावं लागतं.

नवरा बायकोच्या घरी जाऊन राहत असेल तर त्याला अनेकदा टीकेला, उपहासाला सामोरं जावं लागतं. तो थट्टा-चेष्टेचा विषय होतो. बायकोच्या घरी राहिलं तर नवऱ्याच्या पौरुषत्वावर परिणाम झाल्यासारखं त्याला वागवलं जातं.

तर मग बरोबरी किती आणि केवढी असावी?

लग्नानंतर महिलेनं स्वत:चं नाव न बदलणं किंवा मूळ नावापुढे नवऱ्याचं नाव जोडणं ही तर एक सुरुवात आहे. पुढे काय होणार किंवा काय बदलायला हवं हे ठरवणं आपल्याच हाती आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)