#5मोठ्याबातम्या - 'लोकमान्य टिळक दहशतवादाचे जनक' : राजस्थानच्या पुस्तकात उल्लेख

बाळ गंगाधर टिळक Image copyright PIB
प्रतिमा मथळा बाळ गंगाधर टिळक

आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :

1. 'बाळ गंगाधर टिळक हे दहशतवादाचे जनक'

राजस्थान माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या इयत्ता आठवीचं समाजशास्त्राचं रेफरन्स बुक हाती घेतलं आणि त्यातलं पान 267 पाहिलं तर 'अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील राष्ट्रीय चळवळ' हा धडा सापडतो. त्यात एक ओळ आहे - "टिळकांनी देशाला चळवळीचा मार्ग दाखवला. त्यामुळे ते दहशतवादाचे जनक (फादर ऑफ टेररिझम) ठरतात." ("Tilak demonstrated a path towards national movement, therefore, he is called as the father of terrorism.")

हिंदुस्तान टाइम्सने ही बातमी दिली आहे.

या बातमीनुसार, त्याच परिच्छेमध्ये पुढे आहे, "ब्रिटिश अधिकाऱ्यांना विनवणी करून स्वातंत्र्य मिळणार नाही, असं त्यांना वाटायचं. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराज आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशात जनजागृतीचा प्रयत्न केला. त्यांनी जनतेमध्ये स्वातंत्र्याचा संदेश पोहोचवला. त्यामुळे ब्रिटीश अधिकाऱ्यांना टिळक खुपत होते," असा उल्लेख धड्यात करण्यात आला आहे.

मथुरेतल्या एका प्रकाशनानं हे पुस्तक छापलं आहे. राजस्थानधल्या शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मते, या इंग्रजी रेफरन्स बुकमध्ये अनेक ठिकाणी शब्दांची निवड चुकली आहे. तर रेफरन्स बुक छापणाऱ्या प्रकाशनानं 'आम्ही राजस्थानमधील शिक्षण मंडळाच्या नियमानुसारच पुस्तके छापली आहेत,' असं म्हटलं आहे.

2. 8.75 लाखाचं वीज बिल आलेल्या भाजी विक्रेत्याची आत्महत्या

औरंगाबाद शहरातल्या एका भाजी विक्रेत्याला 8 लाख 75 हजार रुपयांचं वीज बिल आल्यानंतर त्यांनं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

लोकसत्तानं दिलेल्या बातमीनुसार, मृत जगन्नाथ शेळके औरंगाबाद शहरातल्या गारखेडा भागात राहत होते. एका 10 X 10च्या खोलीत त्यांनी आपल्या पत्नी आणि बारावीत शिकणाऱ्या मुलाबरोबरचा संसार थाटला होता. दोन्ही मुलींची लग्नही झाली आहेत.

या खोलीत एक पंखा आणि 2 ट्युबलाईट इतकीच उपकरणं. त्यातच महावितरणकडून त्यांना 8 लाख 75 हजार रुपयांचं बिल पाठवण्यात आलं.

एवढं मोठं बिल पाहून ते तणावाखाली गेले आणि गुरुवारी पहाटे साडे चारच्या सुमारास "मी माझे जीवन स्वतः संपविले आहे. मला रिडिंग मीटर खूप खूपच दिले आहे," अशी चिट्ठी लिहीत त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

शहराच्या पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे, मात्र नातेवाईकांनी महावितरण विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

3. 'ब्रिटिशही म्हणायचे आझादी मिळणार नाही'

भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी काश्मीरची आझादीची मागणी कधीच पूर्ण होऊ शकत नाही, असं एका मुलाखतीत म्हटलं होतं.

त्याला विभक्तवादी हुरियत कॉन्फरन्सचे नेते मीरवाईज उमर फारूख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे - "ब्रिटिशांनी 100 वर्षांपेक्षा जास्त वर्षं भारतावर राज्य केलं. हजारो भारतीयांची हत्या केली. जालियनवाला बाग हत्याकांड केलं."

"आजच्या भारतीय सैन्याप्रमाणे त्या वेळच्या ब्रिटिश फौजांनी भारतावर नियंत्रण ठेवण्यासाठी शक्य असेल ते सर्व केलं. पण अखेरीस त्यांना लोकांच्या इच्छेसमोर झुकावं लागलं," असं ते म्हणाल्याची बातमी लोकसत्तानं दिली आहे.

4. 'डिजिटल मीडियाच्या नियमनाची वेळ आलीये'

पुढील तीन वर्षांत भारतात जवळपास 96 कोटी लोक इंटरनेटचा वापर करत असतील. त्यामुळे डिजिटल मीडियाचं नियमन करण्याची वेळ आली आहे, असं मत केंद्रीय माहिती आणि दूरसंचार मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा स्मृती इराणी

द इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, 15व्या एशियन मीडिया समिटमध्ये बोलताना त्या म्हणाल्या, "डिजिटल क्षेत्राशी संबंधित कायदे कडक करण्याची वेळ आली आहे, जेणेकरून या क्षेत्रावर कुणा एकाचं वर्चस्व राहणार नाही."

काही दिवसांपूर्वी इराणी यांनी फेक न्यूजला आळा घालण्यासाठी आता टीव्ही आणि वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांवर कारवाई केली जाईल, असा आदेश काढला होता. मात्र विरोध आणि वाद लक्षात घेता हा निर्णय 24 तासांत माघारी घेण्यात आला होता.

5. आधारबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टात राखून

आधार कार्डच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणी सुप्रीम कोर्टात पूर्ण झाली असून कोर्टने आपला निर्णय राखून ठेवला आहे. विविध माध्यमांनी याविषयीची बातमी दिली आहे.

खासगीपणाचा हक्क आणि माहितीची सुरक्षितता या सारख्या मुद्द्यांमुळे सरकारने आधारला सक्तीचं करू नये, अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिकांची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू होती.

प्रतिमा मथळा आधार कार्ड

दिव्य मराठीच्या जानेवारीत सुरू झालेली ही मॅरथॉन सुनावणी 38 दिवस सलग सुरू होती. इतके दिवस तोंडी सुनावणी चाललेली ही दुसराच खटला आहे. पहिल्या क्रमांकावर 1970मधील केशवानंद भारती प्रकरण असून तो खटल्याची सुनावणी सलग पाच महिने सुरू होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)