...आणि जोतिबा फुले 'महात्मा' झाले

महात्मा फुले Image copyright Government Of Maharashtra
प्रतिमा मथळा महात्मा जोतीराव फुले यांच्यासोबत त्यांचा मुलगा यशवंत

ते साल होतं 1888. जोतिबा फुलेंनी वयाची 61 वर्षं नुकतीच पूर्ण केली होती. सहा महिन्यांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा सौम्य झटकाही येऊन गेला होता. 40 वर्षांपूर्वी जोतिबांनी पाया घातलेल्या शिक्षणाच्या कामाचा प्रसारही जोमाने होत होता. त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक चळवळीचा प्रभाव महाराष्ट्रभर जाणवू लागला होता.

अशातच सत्यशोधक चळवळीतल्या त्यांच्या खंद्या सहकाऱ्यांनी जोतिबांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक सोहळा आयोजित करायचं ठरवलं. त्यासाठी भायखळ्याच्या मांडवी कोळीवाड्यातलं रघुनाथ महाराज सभागृह निश्चित करण्यात आलं.

हा सोहळा आयोजित करण्यासाठी सत्यशोधक चळवळीचे नेते नारायण मेघाजी लोखंडे, रावबहाद्दूर वंडेकर यांनी पुढाकार घेतला होता. सोबत दामोदर सावळाराम यंदे, तेलुगू नेते स्वामी रामय्या व्यंकय्या आय्यावारू, मोरो विठ्ठल वाळवेकर असे फुलेंचे सहकारीही होते.

नारायण मेघाजी लोखंडे हे जोतिबांच्या विचाराने प्रेरित होऊन 'दीनबंधू' नावाचं समाज प्रबोधन नियतकालिक चालवत होते. या लोखंडे यानांच भारतातल्या कामगार चळवळीचे जनक म्हटलं जातं. जोतिबांचे विचार आणि कार्य ही त्यांच्या कामाची प्रेरणा होती.

नारायण लोखंडे यांच्यावर पत्रकार मनोहर कदम यांनी संशोधनपर पुस्तकाचं लेखन केलंय. ते लिहितात- 'लोखंडे आणि वंडेकर या दोन पुढाऱ्यांच्या सह्यांनी सभेची आमंत्रणं गेल्यानं सभेला हॉलमध्ये जागा पुरली नाही. मुंबईतील प्रतिष्ठित नागरिक, दुकानदार, कारखानदार आणि मजूर असे दोन-अडीच हजार लोक जमले होते.'

Image copyright Akshar Prakashan
प्रतिमा मथळा नारायण मेघाजी लोखंडे यांच्या चरित्राचे मुखपृष्ठ

त्या काळी अशा प्रकारचा सत्कार सोहळा होणं ही पहिलीच घटना होती. कारण तोपर्यंत आपापल्या तथाकथित उच्च जाती आणि धर्मातील विद्वानांचा सत्कार करण्याचीच प्रथा प्रचलित होती.

सोहळ्याला सर्व जाती-धर्मांचे लोक

पण फुलेंच्या बाबतीत अपवाद असा होता की त्यांनी जातीभेदावर प्रहार करणारं काम केलं. तरीही अनेक जाती-धर्मातील लोक त्यांच्या चळवळीत जोडले गेले होते. ही चळवळ खऱ्याअर्थी समानतेची होती म्हणूनच अशा पहिल्या वहिल्या सत्कार सोहळ्यात सर्व जाती-धर्मातील लोक उपस्थित राहिले, असं लेखक आणि सामाजिक-राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

लेखक धनंजय कीर यांनी जोतिबा फुलेंवर लिहिलेल्या चरित्रात या सत्कार सोहळ्याविषयी विस्तृत वर्णन लिहिलंय. 'गावोगावच्या कार्यकर्त्यांना आमंत्रण देण्यात आले. आपल्या अलौकिक नेत्याच्या सत्काराचा दिवस त्यांनी 11 मे 1888 हा ठरविला. मुंबईतील काही प्रतिष्ठित व्यक्तींनाही आमंत्रण देण्यात आले. सयाजीराव महाराज यांनाही आमंत्रण देण्यात आले होते. जोतीरावांना हिंदुस्थानचे 'बुकर टी. वॉशिंग्टन' अशी पदवी द्यावी असा निरोप दामोदर सावळाराम यंदे यांच्याकरवी सयाजीरावांनी पाठविला होता.'

ब्रिटिश सरकारकडून किंवा धर्मशास्त्र्यांकडून सत्कारमूर्तींना रावसाहेब, रावबहाद्दूर, महोपाध्याय अशा प्रकारच्या पद्व्या दिल्या जात. त्यामुळे सत्कार सोहळ्यात जोतिबांना काय पद्वी द्यावी याविषयी त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये विचारविनिमय झाला असावा. समाजातल्या तळागाळातील लोकांसाठी लढणारा लोकनेता म्हणून फुल्यांची ओळख होती. त्यांनी समाजासाठी केलेला असीम त्याग, मानवी हक्कांचा लढा, ग्रंथांचं लेखन आणि समतेबद्दलचा नवा विचार यासाठी 'महात्मा' हीच पद्वी त्यांच्या सहकाऱ्यांना अधिक जवळची वाटली.

फुलेंविषयी त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये नेमक्या काय भावना होत्या याविषयी सांगताना सत्यशोधक विचारवंत प्राध्यापक प्रतिमा परदेशी सांगतात- "फुले यांच्या सत्यशोधक नेतृत्वाखाली ज्ञानाचं सामूहिकीकरण झाल्याचं दिसतं.''

"1 जानेवारी 1848 साली मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्यापासून, स्त्री आणि शूद्रातिशूद्रांसाठी शिक्षण, स्त्रियांचे हक्क जातीभेदावर प्रहार, दुष्काळ निवारणाचं काम, शेतकऱ्यांच्या शोषणाविरोधात भूमिका आणि अनेक ग्रंथांचं लेखन हे फुल्यांचं योगदान सर्वपरिचित आहे. फुल्यांनी केवळ भूमिका घेतली नाही, तर त्यांनी प्रत्यक्षात काम उभं केलं हे त्यांचे सहकारी जाणून होते. विशेष म्हणजे या सहकाऱ्यांमध्ये गोवंडे, भिडे, देशमुख असे ब्राम्हण सत्यशोधकही होते.''

Image copyright Government of Maharashta
प्रतिमा मथळा छायाचित्रात उजवीकडे सावित्रीबाई फुले तर डावीकडे त्यांच्या सहकारी शिक्षिका फातिमा शेख

त्यामुळेच जनतेसाठी फुल्यांचा सर्वोच्च सन्मान करण्याचं सत्यशोधकांच्या मनात होतं. म्हणून जोतिबा फुलेंना 'महात्मा' ही उपाधी अर्पण करण्यात आली.

लोखंडे आणि वंडेकर यांनी फुलेंना महात्मा म्हणून गौरवणे किती योग्य आहे, हे आपल्या भाषणात मांडलं. या कार्यक्रमाच्या सविस्तर बातम्या त्यावेळी वर्तमानपत्रात झळकल्या होत्या. फुलेंच्या चरित्रात त्याचा उल्लेख आढळतो.

जोतिबा गहिवरले

आपल्या सहकाऱ्यांनी आणि अनुयायांनी केलेल्या या अनोख्या सत्काराला उत्तर देताना जोतिबा फुले गहिवरले होते.

जोतिबा फुले भाषणात म्हणाले, ''माझ्या कनिष्ठ आणि दलित बंधूंच्या बाबतीत जे माझे कर्तव्य होते ते मी केले, त्यासाठी मी झगडलो, लढलो. माझ्या अनुयायांनी सत्यशोधक समाजाच्या कार्याचा आणि संदेशाचा अदम्य उत्साहाने, नेटाने आणि चिकाटीने खेड्यापाड्यांतून प्रसार करावा.''

या ऐतिहासिक सोहळ्याचं वैशिष्ट्य सांगताना प्रा. हरी नरके म्हणतात, ''नेत्यांनी एकत्र येऊन अशा प्रकारचा सत्कार करणं ही त्याकाळी अभूतपूर्व घटना होती. बंडखोरीची भूमिका घेणाऱ्या, इतकंच नाही तर कृतिशील पाऊल उचलणाऱ्या एका समाजसुधारकाचा सत्कार करणं तत्कालीन समाजात तितकं सोपं नव्हतं. नेत्यांचीच नाही तर सामान्य जनतेचीही तीच भावना होती.'' प्रा. हरि नरके यांनी महात्मा फुले समग्र वाङ्मयची सुधारित आवृत्ती संपादित केली आहे.

''तर सत्यशोधक समाजाच्या चळवळीचा प्रभाव महाराष्ट्रात सर्वत्र जाणवत होता. सत्यशोधक समाजाचं यश म्हणजे वर्ग, जात आणि लिंगभाव याचा चळवळीत अडसर नव्हता. सत्यशोधक समाजात जशा वेगवेगळ्या जातीचे सक्रिय सभासद होते, तसेच कामगार, लेखक-पत्रकार, उद्योजक, कॉन्ट्रॅक्टर, डॉक्टर, वकील यासारखे व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर होते. सर्वात महत्वाचं म्हणजे स्त्रीनेतृत्व पुढे येत होतं. सावित्रीबाई, ताराबाई शिंदे, पहिल्या संपादिका तानुबाई बिरजे, शिक्षिका फातिमा शेख ही उदाहरणं आपल्यासमोर आहेत.''

या सत्कार सोहळ्यात महात्मा फुलेंसोबत सत्यशोधकचे बाळाजी पाटील ओतुरकर यांचाही सत्कार झाला.

महात्मा फुलेंनी 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक चळवळीने जवळपास तीस वर्षात चांगलाच जम बसवला. या समाजाचे मराठी, कुणबी, ब्राम्हण, प्रभू, गवळी, शिंपी, कुंभार, लिंगायत, वंजारी, भंडारी यासारख्या अनेक जातींमधून तसेच तेलुगू भाषिक सभासद होते. जुन्नरचे बाळाजी पाटील हे देखील त्यांपैकी एक सभासद.

ओतुरचा गाजलेला खटला

बाळाजी पाटील यांनी सत्यशोधक समाजाच्या नियमाप्रमाणे आपल्या मुलाचं लग्न लावलं होतं. ब्राम्हण पुरोहिताशिवाय हे लग्न होण्याला ब्राम्हणांचा विरोध होता. ओतुरच्या ब्राम्हणांनी सभा भरवली आणि हे ब्राम्हण पुरोहितांच्या हक्कावर गदा आहे, असं म्हणत न्यायालयात खटला दाखल केला. मुंबई न्यायालयात हा वाद पोहचला तेव्हा बाळाजी पाटीलांसोबत जोतिबा फुले वकील आणि युरोपियन बॅरिस्टरशी बोलण्यासाठी पुढाकार घेत होते. या सगळ्या प्रक्रियेत ब्राम्हण पुरोहित आणि सत्यशोधक कार्यकर्ते यांनी एकमेकांना आव्हान दिलं होतं.

लेखक धनंजय कीर लिहितात, ''ओतुरच्या या अभियोगाची महाराष्ट्रभर चाललेली चर्चा, त्यासंबंधी प्रसिद्ध झालेली वर्णने यावरून त्या काळी केवढी खळबळ उडाली होती हे दिसून येते. तसे जोतीरावांच्या प्रभावाचीही कल्पना येते. जुन्नर तालुका हा या हिंदी मार्टिन ल्यूथरचा बालेकिल्ला होता. व्यक्तिस्वातंत्र्यासाठी त्याने ब्राह्मणशाहीवर चढाई केली होती. युद्ध जाहीर केल्याशिवाय ती लढाई जुंपली होती.''

हा सत्कारसोहळा झाला तेव्हा सत्यशोधक कार्यकर्ते ओतुरचा खटला जिंकले नव्हते. पण या खटल्यामुळे महात्मा फुलेंच्या सहकाऱ्यांचं मनोबल वाढलं होतं.

पुढे दोन महिन्यांतच फुलेंना अर्धांगवायूचा झटका आला. त्या आजारपणातही ते 'सार्वजनिक सत्यधर्म' या पुस्तकाचं लेखन करत होते. पुढे वर्षभरात खटल्याचा निकाल सत्यशोधक कार्यकर्त्यांच्या बाजूने लागला.

महात्मा उपाधी मिळाल्यानंतर साधारण दोन वर्षांनी 28 नोव्हेंबर 1890साली महात्मा जोतिबा फुले यांचं पुण्यात निधन झालं.

(संदर्भ- महात्मा फुले समग्र वाङ्मय, धनंजय कीर लिखित 'महात्मा फुले यांचे चरित्र', मनोहर कदम लिखित 'कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे')

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)