हिमांशू रॉय आणि 'ती' चार प्रकरणं

हिमांशू रॉय Image copyright STR

मुंबईचा पोलीस अशी ओळख असलेल्या हिमांशू रॉय यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या आणि किचकट प्रकरणांचा छडा लावला. तर काही प्रकरणं तडीस जाऊ शकली नाहीत. यांपैकी काही आव्हानात्मक प्रकरणं अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत.

1. शक्ती मिलमधले बलात्कारी

एका मासिकात काम करणाऱ्या 22 वर्षीय महिला पत्रकारावर 22 ऑगस्ट 2013च्या दिवशी मुंबईतल्या शक्ती मिलच्या कंपाउंडमध्ये सहा गर्दुल्ल्यांनी बलात्कार केला. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर आठच महिन्यांत ही घटना घडली होती. त्यामुळे लोकांचा रोष टोकाला गेला होता.

गर्दुल्ल्यांनी या महिला पत्रकाराबरोबर असलेल्या एका तरुण पत्रकाराला मारहाणही केली होती.

हिमांशू रॉय यांनी या संवेदनशील प्रकरणात मोलाची भूमिका बजावली होती. या प्रकरणातल्या आरोपींना अक्षरश: 24 तासांमध्ये अटक करण्यात आली होती. पीडित मुलीसह असलेल्या तरुणाच्या मदतीने पोलिसांनी या आरोपींची स्केचेस काढून घेतली. ही स्केचेस आसपासच्या भागांमध्ये दाखवून आरोपींचा छडा लावला होता.

या प्रकरणी तिघा जणांना फाशीची शिक्षा, एकाला जन्मठेप तर दोघा अल्पवयीन दोषींची तीन वर्षांसाठी सुधारगृहात रवानगी करण्यात आली.

Image copyright INDRANIL MUKHERJEE

2. आझाद मैदान दंगल प्रकरणी अपयश?

11 ऑगस्ट 2012ची संध्याकाळ मुंबईच्या चाकरमान्यांसाठी नित्याचीच होती. संध्याकाळची लोकल पकडण्यासाठी सगळे CST स्टेशनकडे जात होते. शनिवार असल्यामुळे गर्दी कमी होती.

तेवढ्यात लोक सैरावैरा पळू लागले. रेल्वे स्टेशनच्या शेजारीच असलेल्या आझाद मैदानात दंगल उसळली होती. आसाम आणि म्यानमारच्या रखाईन प्रांतात सुरू असलेल्या दंगलींचा विरोध करण्यासाठी रझा अकादमीने निदर्शनं आयोजित केली होती. त्याचं पर्यावसन दंगलीत झालं होतं.

या दंगलीदरम्यान आझाद मैदानाबाहेर असलेल्या 'अमर जवान ज्योती' स्मारकाची नासधूस झाली. तसंच या दंगलीत तीन जणांचा मृत्यूही झाला होता.

पोलिसांनी या दंगेखोरांविरोधात 302 कलम म्हणजेच हत्येचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी पोलिसांमधल्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 302 कलम लावण्याला विरोध केला.

"त्यावेळी रॉय साहेबांनी हे कलम लावण्यामागचं कारण आम्हाला विचारलं होतं. यलो गेट पोलीस स्टेशनच्या वायरलेसची गाडी दंगेखोरांनी फोडली होती. त्या गाडीतल्या पोलिसांच्या हातातली AK-56 रायफल दंगेखोरांपैकी एकानं हाती घेऊन गोळीबार केल्याचं CCTV फुटेजमध्ये दिसत होतं. त्यामुळे आम्ही हे कलम लावत असल्याचं सांगितल्यावर रॉय यांनी आमची पाठराखण केली होती," माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश महाले सांगतात.

Image copyright STRDEL

विशेष म्हणजे नंतर आलेल्या अहवालात एका दंगेखोराचा मृत्यू हा त्याच AK-56मधील गोळी लागून झाल्याचंही स्पष्ट झालं.

या प्रकरणात आरोपपत्र दाखल होण्याचं काम रात्री अडीच वाजेपर्यंत चाललं होतं. तरी दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता हिमांशू रॉय पुन्हा कार्यालयात हजर झाले होते, असंही महाले सांगतात.

पण या प्रकरणी अजूनही कुणी दोषी ठरलं नाही. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांना अपयश आल्याचं अनेकांचं मत आहे. "स्टेजवरून प्रक्षोभक भाषणं झाली होती. त्यानंतरच दंगल भडकली. भाषण करणाऱ्यांचे चेहरे पोलिसांना माहिती होते. तरीही या प्रकरणात कुणावरही आरोप सिद्ध होऊ शकले नाहीयेत हे पोलिसांचं अपयशच आहे," असं महाराष्ट्र टाइम्समध्ये तेव्हा रिपोर्टिंग करणारे दिनेश कानजी म्हणतात.

3. कुणी केला क्रिकेटचा घात?

क्रिकेटमध्ये होणाऱ्या मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंगची कीड IPLलाही लागल्याचं 2013मध्ये समोर आलं. दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईत श्रीशांत, अजित चंडेला आणि अंकित चव्हाण या तीन खेळाडूंना अटक केली.

त्याच वेळी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत विंदू दारासिंग आणि चेन्नई सुपरकिंग्जचा गुरुनाथ मैय्यप्पन या दोन 'हाय प्रोफाईल' व्यक्तींना अटक झाली. या दोघांनी बुकींशी संधान साधल्याचा ठपका त्यांच्यावर होता.

Image copyright STR

"आम्ही पूर्ण तयारीनिशी क्राईम ब्रांचच्या इमारतीखाली उभे होतो. रॉय यांनी आम्हाला बोलावलं होतं. रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी त्यांनी आम्हाला वर बोलावलं आणि या दोघांना अटक झाल्याचं सांगितलं," लोकसत्ताचे प्रतिनिधी सुहास बिऱ्हाडे सांगतात.

या प्रकरणाचं वार्तांकन करणाऱ्या प्रीती गुप्ता म्हणतात, "या संपूर्ण प्रकरणात पुरावे गोळा करणं, ते पुरावे कोर्टात सिद्ध होतील, याची काळजी घेणं, या सगळ्या गोष्टी रॉय यांनी पार पाडल्या."

सुप्रीम कोर्टाने ऑक्टोबर 2013मध्ये मुकुल मुद्गल समिती स्थापन केली. या समितीने फेब्रुवारी 2014मध्ये अहवाल सादर केला. कोर्टाने मार्च 2014मध्ये BCCIचे अध्यक्ष आणि मुख्य आरोपी गुरुनाथ मैय्यपनचे सासरे एन श्रीनिवासन यांना अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचे आदेश दिले.

तसंच चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांवर बंदी घालण्यात आली.

4. जेव्हा क्राईम रिपोर्टचा मर्डर होतो...

घाटकोपरमध्ये राहणाऱ्या आईला भेटून 11 जून 2011च्या दिवशी जे. डे नावाचे पत्रकार आपल्या पवईतल्या घरी चालले होते. दुपारी तीनच्या सुमारास त्यांची गोळी मारून हत्या करण्यात आली.

मिड-डेमध्ये क्राईम रिपोर्टर असलेल्या ज्योतिर्मय डे यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या केली होती. या हत्येनंतर मुंबईच्या पोलीस-गुन्हे आणि पत्रकारितेच्या जगतात खळबळ उडाली होती.

या प्रकरणाचे धागे गुन्हेगारी जगताशी जोडले असल्याने हे प्रकरण प्रचंड संवेदनशील होतं. त्या वेळी हिमांशू रॉय मुंबई पोलिसांत सह-आयुक्त (गुन्हे) या पदावर होते.

"सहआयुक्त पदावरील व्यक्ती स्वत: तपास करायला जात नाही. पण अटक केलेल्या महत्त्वाच्या आरोपींची चौकशी करणं वगैरे काम हिमांशू रॉय यांनी स्वत: जातीने केलं होतं," असं त्यावेळी वार्तांकन करणाऱ्या प्रीती गुप्ता सांगतात.

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विविध क्षेत्रांतून दबाव येत होता. पत्रकारांचे मोर्चे निघाले होते, मंत्रालयातून विचारणा होत होती. पण हिमांशू रॉय नेहमी शांत असायचे, असं त्यांच्याबरोबर या प्रकरणात काम केलेले रमेश महाले सांगतात.

"ते दर दिवशी सकाळी आमची बैठक घ्यायचे. त्या बैठकीत आम्ही त्यांना गेल्या 24 तासांमध्ये केलेल्या तपासाची इत्यंभूत माहिती द्यायचो. बऱ्याचदा ते त्याबाबत समाधानी असायचे. काही वेळा आम्हाला तपासाची दिशा दाखवायचे. अखेर 15व्या दिवशी आम्ही ते प्रकरण सोडवलं," महाले पुढे सांगतात.

Image copyright INDRANIL MUKHERJEE

आर. आर. पाटील त्या वेळी गृहमंत्री होते आणि हे प्रकरण जे सोडवतील, त्यांना 10 लाख रुपयांचं इनामही त्यांनी जाहीर केलं होतं. रविवारी आरोपींना अटक झाल्यावर रॉय साहेबांनी ताबडतोब सोमवारी त्याबाबतची नोट बनवून मंत्रालयात पाठवली आणि मंगळवारपर्यंत इनामाबाबतचा आदेश निघाला होता, अशी आठवण महाले सांगतात.

अनेक वर्षं क्राईम रिपोर्टिंग करणारे लोकसत्ताचे निशांत सरवणकर सांगतात की, "या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाईपर्यंत रॉय बऱ्याचदा क्राईम ब्रांचच्या कार्यालयातच असायचे."

हे प्रकरण पत्रकारांशी निगडित असल्याने रॉय यांनी काही पत्रकारांचीही चौकशी केली होती. पोलिसांनी जिग्ना वोरा नावाच्या महिला पत्रकाराला आरोपी बनवलं, पण आरोप सिद्ध करू शकले नाहीत. त्यांची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली.

जे. डे यांच्या हत्या प्रकरणी छोटा राजनला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. राजन यांच्या टोळीतले इतर 9 जणंही दोषी ठरले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)