'मी 17 वर्षं शिक्षक होतो पण मला लिहिता, वाचता येत नव्हतं'

शिक्षक Image copyright Alamy

जॉन कोरकोरान यांचं बालपण न्यू मेक्सिकोमध्ये गेलं. 1940-1950चा तो काळ. सहा भावंडांपैकी ते एक. ते शाळेत गेले, विद्यापीठात गेले. 1960च्या दशकात ते शिक्षक झाले. 17 वर्षें शिक्षकाची नोकरी केली. पण, एक गुपित त्यांनी मनाशी दडवून ठेवलं होतं. कोणतं होतं ते गुपित?

माझ्या बालपणी मला माझे आई-वडील कायम सांगायचे की माझा जन्म जिंकण्यासाठीच आहे. मी माझ्या आयुष्याची पहिली सहा वर्षँ यावर विश्वासही ठेवला.

मी उशिरा बोलायला शिकलो, पण तरीही आपल्याला आपल्या बहिणींसारखं वाचता यावं असं स्वप्न उराशी धरून मी शाळेत जायला लागलो. शाळेच्या पहिल्या वर्षी गोष्टी सोप्या होत्या. आम्ही सरळ रेषेत उभं रहावं, खाली बसावं, शांत बसावं आणि बाथरूमला वेळेत जावं अशा माफक अपेक्षा आमच्याकडून होत्या.

मग दुसऱ्या इयत्तेत गेल्यावर आम्हाला वाचायला शिकायचं होतं. पण माझ्यासाठी हे म्हणजे अगदी चिनी वर्तमानपत्र उघडून पाहण्यासारखंच होतं. त्या ओळींचा अर्थ काय हे काही केल्या मला समजायचं नाही. सहा-सात, आठ वर्षांच्या मला आपल्यासमोरचा हा पेच कुणाला समजावूनही सांगता यायचा नाही.

मला आठवतं, मी रोज रात्री प्रार्थना करत असे, हे देवा, उद्या सकाळी उठताच मला वाचायला यायला लागू देत. कधी कधी तर मी दिवा लावून हातात एखादं पुस्तक घेऊन आपल्याला वाचता येण्याचं वरदान मिळालं आहे का हे पाहायचो. पण तो चमत्कार कधीच झाला नाही.

शाळेत असताना मला ढ मुलांच्या रांगेत बसावं लागायचं. त्या मुलांनाही वाचता यायचं नाही. मला हे कळायचं नाही की मी त्या रांगेत कसा बसायला लागलो. मला हेही कळायचं नाही की, तिथून बाहेर कसं पडायचं आणि मला हे सुद्धा कळायचं नाही की मी नेमकं काय विचारू?

Image copyright John Corcoran

आमचे शिक्षक त्या रांगेला 'ढ मुलांची रांग' कधीच म्हणले नाहीत. तसा आमचा कधीच छळ झाला नाही, पण इतर मुलं तिला 'ढ' मुलांची रांग म्हणायचे. एकदा तुम्ही त्या रांगेत बसायला लागलात की तुम्हीही स्वतःला 'ढ' समजू लागता.

पालक-शिक्षकांच्या बैठकीत शिक्षक कायम माझ्या पालकांना सांगायचे, "तो हुशार आहे, येईल त्याला सगळं हळूहळू." मला असंच म्हणत तिसऱ्या इयत्तेत ढकलण्यात आलं.

"तो हुशार आहे, येईल त्याला सगळं हळूहळू, म्हणत मला चौथ्या इयत्तेत ढकलण्यात आलं.

"तो हुशार आहे, येईल त्याला सगळं हळूहळू," म्हणत मला पाचव्या इयत्तेतही ढकलण्यात आलं.

पण मला काहीच जमत नव्हतं.

पाचवीत जाईपर्यंत आपल्याला वाचता येईल याची अपेक्षाच मी सोडून दिली होती. मी रोज सकाळी उठून, आवरून, जणू काही मी युद्धाला जातो आहे अशा तऱ्हेत शाळेत जायचो. मला वर्गाचा तिटकारा होता. तिथे अतिशय त्रासदायक आणि गुंतागुंतीचं वातावरण होतं. त्यातून तरण्यासाठी मला मार्ग शोधावे लागत होते.

इयत्ता सातवीत मला शाळेतला बराच वेळ मुख्याध्यापकांच्या कार्यालयात बसावं लागत असे. मी भांडणं करायला लागलो होतो, उद्धट झालो होतो, विदुषकी चाळे करायला लागलो होतो, मी विध्वंसक झालो होतो आणि मला शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं.

पण माझं हे असं वागणं माझं मलाच पटत नव्हतं, मी असा नव्हतो- मला असं व्हायचं नव्हतं. मला वेगळं कुणीतरी व्हायचं होतं, माझी प्रगती व्हावी अशीच माझी इच्छा होती, मला चांगला विद्यार्थी व्हायचं होतं, पण मला ते काही केल्या जमत नव्हतं.

आठवीत गेलो आणि मला स्वतःला आणि माझ्या कुटुंबाला लज्जास्पद वाटण्याचा कंटाळा आला होता. मी ठरवलं की इथून पुढे चांगलं वागायचं. उच्च माध्यमिक शाळेत जर आपण नीट वागलो तर यातून मार्ग काढता येईल. म्हणून मी एक आज्ञाधारक विद्यार्थी होण्याचं ठरवलं, जेणेकरून मला ही व्यवस्था यशस्वीपणे पार करता येईल.

Image copyright John Corcoran

मला खेळाडू व्हायचं होतं- माझ्याकडे तशी कौशल्यही होती. मला गणितही यायचं. मी शाळेत जाऊन गणिताचे पाढे शिकायच्या आधीच मला पैसे मोजता यायचे आणि पैशांची बेरीज वजाबाकीही यायची.

माझ्याकडे लोकांशी जुळवून घेण्याची कौशल्यंही होती. माझी महाविद्यालयीन मुलांबरोबर मैत्री होती. मी 'व्हॅलेडिक्टोरियन' मुलीला, म्हणजे जिने सर्वात जास्त गुण मिळवले होते आणि दीक्षांत समारंभात जी भाषण देणार होती, तिला मी डेटवर घेऊन गेलो होतो. मी 'होमकमिंग किंग' होतो, माझा गृहपाठ बाकीचे लोक, मुख्यतः मुलीच करायच्या.

मला माझं नाव आणि काही लक्षात राहतील असे शब्द लिहिता यायचे, पण मला संपूर्ण वाक्य लिहिता यायचं नाही. मी उच्च माध्यमिक शाळेत होतो पण मला दुसरी-तिसरीतल्या मुलाइतकंच वाचता यायचं. मला वाचता येत नाही हे मी कधीच कुणालाही सांगितलं नाही.

परीक्षेत मी दुसऱ्याच्या उत्तरपत्रिकेत डोकवायचो किंवा माझी उत्तरपत्रिका मी कुणाकडे तरी देऊन त्यात उत्तरं लिहून घ्यायचो. ही अगदी साधी आणि बाळबोध फसवणूक होती. पण मला जेव्हा खेळासाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीच्या आधारावर महाविद्यालयात प्रवेश मिळाला तेव्हा मात्र गोष्टी वेगळ्याच होत्या.

"अरे बापरे, हे सगळं माझ्या आवाक्याबाहेरचं आहे, मी यातून कसा तरणार आहे?,' असा प्रश्न मला पडायचा.

माझ्या अनेक मित्रांकडे जुन्या प्रश्नपत्रिका होत्या. लबाडी करण्याचा हा एक मार्ग होता. मी शक्यतो वर्गात एखाद्या मित्राबरोबर बसायचो, असा कुणीतरी जो मला मदत करेल. काही शिक्षक असे होते की जे वर्षानुवर्षं एकच प्रश्नपत्रिका वापरत असत. पण मला जिवावर उदार होऊन अधिक नाविन्यपूर्ण मार्गांचा अवलंब करावा लागला.

एका परीक्षेत शिक्षकांनी फळ्यावर 4 प्रश्न लिहिले. मी वर्गात शेवटी, खिडकीजवळ मोठ्या मुलांच्या मागे बसलो होतो.

माझ्याकडे माझी निळी वही होती आणि मी अथक प्रयत्नांती ते चार प्रश्न त्या वहीत उतरवले. ते प्रश्न काय होते याचा मला अजिबात अंदाज नव्हता.

माझा एक मित्र खिडकीबाहेरच उभा असेल अशी मी व्यवस्था केली होती. तो शाळेतला हुशार पण लाजाळू मुलगा होता. त्याने मला मेरी नावाच्या मुलीशी त्याची गाठ घालून द्यायला सांगितलं होतं. त्याला तिच्या बरोबर 'स्प्रिंग फॉर्मल डान्स'ला जायचं होतं.

मी माझी निळी वही खिडकीतून त्याला दिली आणि त्याने त्या चारही प्रश्नांची उत्तरं त्यात लिहिली.

माझ्या शर्टखाली आणखी एक निळी परीक्षेची वही होती. मी ती काढून त्यात लिहितो आहे असं नाटक केलं.

माझ्या मित्राकडे असलेली ती निळी वही त्याला माझ्याकडे परत देता येऊ दे आणि त्यातली सगळी उत्तरं बरोबर असू दे अशी मी प्रार्थना करत होतो.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
अमरावतीच्या मंगरूळ चव्हाळा या गावात प्रश्नचिन्ह’ ही फासेपारधी समाजाच्या मुलांची शाळा आहे.

मी फारच उतावळा झालो होतो. मला काहीही करून परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं होतं. मी मोठ्याच अडचणीत आलो असतो.

आणखी एक परीक्षा होती ज्यात मी कसा उत्तीर्ण होणार हे मला कळत नव्हतं.

एका मध्यरात्री मी आमच्या प्राध्यापकांच्या कार्यालयापाशी गेलो, ते नव्हते. एका सुरीने मी दार उघडलं आणि चोरासारखा आत शिरलो. मी आता हद्द पार केली होती. आता मी फक्त फसवणूक करणारा विद्यार्थी राहिलो नव्हतो, गुन्हेगार झालो होतो.

मी आत शिरलो आणि प्रश्नपत्रिका शोधू लागलो. प्रश्नपत्रिका त्याच कार्यालयात असायला हवी होती पण मला ती सापडत नव्हती. तिथे एक फाईलचं कपाट होतं- ती त्याच कपाटात असणार होती.

मी सलग दोन-तीन रात्री हेच केलं- प्रश्नपत्रिका शोधण्याचं, पण मला काही ती सापडली नाही. एका रात्री 1 वाजण्याच्या सुमारास मी माझ्या तीन मित्रांना घेऊन त्या कार्यालयात गेलो. आम्ही चार खणांचं ते फाईलचं कपाट उचलून एका गाडीत ठेवलं आणि महाविद्यालयाच्या आवारातून पसार झालो.

तिथं एका कुलूप तोडणाऱ्या माणसाची व्यवस्था मी केली होती. मी माझा सूट आणि टाय घातला. लॉस अँजलीसला निघालेल्या एका व्यापाऱ्याचं मी सोंग घेतलं होतं आणि त्या कुलूप तोडणाऱ्याला असं भासवलं होतं की ते कुलूप तोडून तो माझी नोकरी वाचवतो आहे.

त्यानं ते कपाट उघडलं, मला एक किल्ली दिली, त्यात असेल्या प्रश्नपत्रिकेच्या 40 प्रती पाहून माझा जीव भांड्यात पडला- कपाटाच्या वरच्या खणात बहुपर्यायी प्रश्नपत्रिका सापडली. मी त्यातली एक प्रत माझ्या बरोबर माझ्या खोलीत आणली जिथे एका 'चतुर' वर्गमित्राने त्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरं असणारी एक 'चीट शीट' तयार केली.

आम्ही ते कपाट पुन्हा त्याच्या जागी नेलं आणि पहाटे सुमारे 5 वाजता माझ्या खोलीकडे जाता जाता विचार करत होतो 'एक अशक्यप्राय मोहीम फत्ते झाली!'- माझ्या चातुर्याबद्दल मला आनंद वाटत होता.

पण नंतर मी पायऱ्या चढून वर आलो आणि बिछान्यात पडलो तोच एखाद्या लहान बाळासारखं रडू लागलो.

मी कुणाची मदत का मागितली नाही? कारण मला वाचायला शिकवणारं कुणी असेल यावर माझा विश्वासच नव्हता. हे माझं, मी जपलेलं गुपित होतं.

माझ्या शिक्षकांनी आणि पालकांनी मला सांगितलं होतं की पदवी मिळालेल्यांना चांगल्या नोकऱ्या मिळतात, त्यांचं राहणीमान चांगलं होतं आणि म्हणूनच माझा यावर पूर्ण भरवसा होता. पदवीचा तो एक कागद मिळवायचा एवढाच माझ्या प्रेरणेचा स्रोत होता. नकळत किंवा प्रार्थनेने किंवा चमत्काराने तरी मला वाचता येऊ लागेल.

मी पदवी परीक्षा उत्तीर्ण झालो. मी पदवीधर झालो तेव्हा शिक्षकांचा तुटवडा होता आणि म्ह्णून मला नोकरी देऊ केली गेली. ही सर्वात अतार्किक गोष्ट होती- सिंहाच्या गुहेतून बाहेर येऊन आता मी पुन्हा त्याच सिंहाला चिथवण्यासाठी पुन्हा आत जाणार होतो.

Image copyright John Corcoran

मी शिक्षक का झालो? भूतकाळ पाहता मी हे करणं वेडेपणाचं होतं. पण मी पकडला न जाता उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालय पार केलं होतं. म्हणूनच शिक्षक बनणं हे सोयीचं सोंग होतं. वाचता येत नाही अशी शंका कुणी शिक्षकावर घेणार नाही.

मी निरनिराळ्या गोष्टी शिकवल्या. मी क्रीडा प्रशिक्षकही होतो. मी सामाजिक शास्त्र शिकवलं. मी टायपिंग शिकवलं- मला मजकूर जसाचा तसा उतरवून घेता यायचा.

मला किती भीती वाटायची हे मला अजूनही आठवतं. मला हजेरीही घेता यायची नाही- मला नावं ऐकता यावीत म्हणून मला विद्यार्थ्यांना त्यांच्या नावांचा उच्चार करायला सांगायला लागत असे. मला मदत करण्यासाठी मी 2 ते 3 असे विद्यार्थी हेरून ठेवत असे ज्याचं लेखन आणि वाचन उत्तम होतं. हे विद्यार्थी मला शिकवण्यात मदत करत असत. त्यांना अजिबात शंका आली नाही. शिक्षकावर कुणी शंका घेतं का!

सर्वांत भेडसावणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे प्राध्यापकांची बैठक. ती आठवड्यातून एकदा व्हायची आणि जर शिक्षक एखाद्या गोष्टीवर विचारमंथन करत असले तर मुख्याध्यापक कुणाला तरी त्या कल्पना फळ्यावर उतरवण्यास सांगत. मला सतत अशी भीती वाटायची की मला बोलावलं जाईल, प्रत्येक आठवडा अशाच भीतीत जायचा, पण माझाकडे त्यातून एक पळवाट होती.

जर त्यांनी मला बोलावलं असतं तर मी माझ्या खुर्चीवरून उठून दोन पावलं चालून, माझ्या छातीवर हात धरून, जमिनीवर पडणार होतो, याच अपेक्षेत की ते 911शी संपर्क साधतील. पकडलं जाऊ नये यासाठी वाटेल ते करायला मी तयार होतो आणि मी कधीच पकडला गेलो नाही.

कधीकधी मला मी चांगला शिक्षक आहे असं वाटायचं- कारण मी कष्ट करत होतो आणि मी जे करतोय त्याची मला किंमत होती- पण मी नव्हतो. हे सगळं अयोग्य होतं. माझी जागा वर्गात कधीच नव्हती, मी उल्लंघन करत होतो. मी तिथे असणं अपेक्षित नव्हतं आणि मी जे करत होतो त्याचा मला भयंकर त्रास होत होता, पण मी फसलो होतो आणि मी ते कुणालाच सांगू शकत नव्हतो.

मी शिक्षक असतानाच माझं लग्न झालं. लग्न एक पवित्र बंधन आहे, दुसऱ्याप्रती खरं वागण्याची ती वचनबद्धता आहे. इथे मी पहिल्यांदा विचार केला, "मी या व्यक्तीवर विश्वास ठेवून तिला सांगणार आहे."

मी आरशासमोर सराव केला: "कॅथी, मला वाचता येत नाही. कॅथी, मला वाचता येत नाही."

एका संध्याकाळी आम्ही बसलेले असताना मी म्हणालो, "कॅथी, मला वाचता येत नाही."

पण मी नेमकं काय म्हणतोय हे तिच्या लक्षात आलं नाही.

प्रेम आंधळं आणि बहिरं असतं.

आम्ही लग्न केलं आणि आम्हाला मुलगी झाली आणि काही वर्षांनी तिला खरं काय ते समजलं.

प्रतिमा मथळा जॉन कारकोरान, त्यांच्या नातीसह

मी माझ्या तीन वर्षांच्या मुलीला वाचून दाखवत होतो. आम्ही तिच्यासाठी रोज वाचायचो, पण मी खरंतर वाचत नव्हतोच, मी कहाण्या तयार करून सांगत होतो- गोल्डीलॉक्स आणि तीन अस्वलं यांसारख्या गोष्टी. मी त्या अधिक नाट्यमय करत होतो इतकंच.

पण हे पुस्तक नवीन होतं, 'रम्पलस्टिलट्स्कीन', आणि माझी मुलगी मला म्हणाली, "तुम्ही आईसारखं वाचत नाही आहात."

माझ्या बायकोने मला लहान मुलांच्या पुस्तकातून वाचताना पाहिलं आणि तेव्हा तिला खरं काय ते लख्ख कळलं. मी तिला कायम माझ्यासाठी लिहायला सांगायचो, शाळेच्या काही गोष्टी लिहिण्यात मला मदत करायला सांगायचो आणि तिला अखेर हे किती गंभीर आहे ते समजलं.

पण कुणीच काहीच बोललं नाही, कोणताच वाद झाला नाही, ती मला मदत करतच राहिली.

याने फारसा दिलासा मिळाला नाही कारण खोलवर मनात, मी खोटारडा आणि मूर्ख असल्याची भावना निर्माण झाली होती. मी दगाबाज होतो. मी माझ्या विद्यार्थ्यांना सत्याचा शोध घ्यायला शिकवत होतो आणि मीच सर्वात मोठा खोटारडा माणूस होतो. मला वाचता यायला लागल्यावरच मला खरा दिलासा मिळाला.

मी 1961 ते 1978 उच्च माध्यमिक शाळेत शिकवलं. शाळा सोडल्यानंतर आठ वर्षांनी काहीतरी बदललं.

Image copyright John Corcoran
प्रतिमा मथळा बार्बारा बुश यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घेतली.

मी 47-48 वर्षांचा असताना मी बार्बरा बुश- अमेरिकेच्या सेकंड लेडी म्हणजेच अमेरिकेच्या तत्कालीन उप-राष्ट्र्याध्यक्ष्यांच्या पत्नी, यांना टी.व्ही वर पाहिलं- त्या प्रौढ शिक्षणाबद्दल बोलत होत्या. ते त्यांचं ध्येय होतं. यापूर्वी मी कधीच कुणाला प्रौढ शिक्षणाबद्दल बोलताना ऐकलं नव्हतं, मला असं वाटायचं की ज्या परिस्थितीत मी होतो त्या परिस्थितीत मी एकटाच होतो.

मी अगदी हतबल झालो होतो. मला कुणालातरी हे सांगायचं होतं आणि मला मदत हवी होती. एके दिवशी मी किराण्याच्या दुकानात रांगेत उभा असताना तिथे असलेल्या दोन महिलांना मी त्यांच्या मोठ्या भावाबद्दल तो वाचनालयात जात आहे असं बोलताना ऐकलं. तो वाचयला शिकत होता आणि याबद्दल त्यांना अतीव आनंद होत होता. मला यावर विश्वासच बसत नव्हता.

एका शुक्रवारी मी माझा सूट घालून त्या वाचनालयात तिथल्या साक्षरता अभियानाच्या संचालकांना भेटायला गेलो आणि मी त्यांना सांगितलं की मला वाचता येत नाही.

माझ्या प्रौढ आयुष्यात ही फक्त दुसरी व्यक्ती होती जिला मी हे सांगितलं होतं.

मला एक स्वयंसेवी शिक्षिका मिळाल्या- त्या ६५ वर्षांच्या होत्या. त्या शिक्षिका नव्हत्या. त्यांना वाचनाचा छंद होता आणि आयुष्यात प्रत्येकाला वाचता यावं असं त्यांना वाटत असे.

माझ्या मनात असलेल्या अनेक विचारांना वाक्यांमध्ये मला मांडता यावं यासाठी अगदी सुरुवातीला त्यांनी मला लिहायला लावलं. मी सुरुवातीला माझ्या भावनांबद्दल एक कविता लिहिली. कविता लिहिताना तुम्हाला पूर्ण वाक्य काय असेल याची काळजी नसते आणि तुम्हाला पूर्ण वाक्य लिहावी लागतही नाहीत.

Image copyright John Corcoran
प्रतिमा मथळा कुटुंबियांसह

इयत्ता सहावीत असलेल्या विद्यार्थ्याला वाचता येईल इतपत त्यांनी मला वाचायला शिकवलं. मला असं वाटायला लागलं की माझा मृत्यू झाला आहे आणि स्वर्गात गेलो आहे. मी साक्षर आहे याची जाणीव व्हायला मला 7 वर्षं लागली. मला वाचायला यायला लागल्यावर मला खूप रडू आलं. मनात अतीव तणाव आणि दुःख साचून राहिलं होतं- पण याने माझ्या मनावरची मोठीच जखम भरून निघाली. ज्या प्रौढांना वाचता येत नाही त्यांचं बालपण भावनिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या आणि अध्यात्मिकदृष्ट्या खुंटलेलं असतं. आम्ही अजूनही लहानच असतो.

माझी कहाणी माझ्या शिक्षिकेला मी सांगावी आणि यातून अनेकांना प्रेरणा मिळावी यासाठी मला प्रोत्साहन मिळत होतं, पण मी म्हणालो,

"नाही. अजिबात नाही. मी या समाजात 17 वर्षं जगलो आहे, माझी बायको, माझी मुलं, माझे आई-वडील सगळेच इथे आहेत, माझी बहिण जी एक व्यावसायिक आहे ती सुद्धा इथेच आहे. मी ही गोष्ट सांगणार नाही."

पण नंतर मी ही गोष्ट सांगायचं ठरवलं. हे एक लाजीरवाणं गुपित होतं आणि म्हणूनच हा मोठा निर्णय होता.

हे सोपं नव्हतं. पण एकदा ठरवल्यावर मी ही कहाणी सबंध अमेरिकेला सांगितली. ज्याला ऐकायची इच्छा होती त्या प्रत्येकाला मी हे सांगितलं. हे गुपित मी अनेक वर्षं दडवून ठेवलं आणि अखेर ते साऱ्या जगासमोर आणलं.

मी लॅरी किंग, एबीसी न्यूज मॅगझिन च्या 20/20 या कार्यक्रमात आणि ओप्रा सारख्या कार्यक्रमात होतो.

लोकांसाठी वाचता न येणाऱ्या शिक्षकाची कथा ऐकणं हे अस्वस्थ करणारं होतं. काही लोकांना वाटलं की हे अशक्य आहे आणि मी खोटं काहीतरी सांगत होतो.

पण मला लोकांना सांगायचं आहे की आशा सोडू नका, मार्ग निघतो. आपण 'मूर्ख' नाही, आपण वाचायला शिकू शकतो, कधीच वेळ गेलेली नसते.

दुर्दैवाने आपण अजूनही आपल्या मुलांना शाळेत प्राथमिक वाचन- लेखन न शिकवताच पुढे ढकलत आहोत. पण शिक्षकांना दोष देण्यापेक्षा आपल्या मुलांना नीट लिहिता-वाचता येत आहे ना याकडे आपण लक्ष दिलं तर हे अपयशाचं चक्र आपण मोडू शकतो.

48 वर्षं मी अंधारात होतो. पण अखेर माझ्या मानेवरचं भूत उतरलं!

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)