कर्नाटकाचा किंग कोण? या रणधुमाळीत हे 7 मुद्दे चर्चेत राहिले

कर्नाटकचा कौल आज मतपेटीत बंद होणार आहे. Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कर्नाटकचा कौल आज मतपेटीत बंद होणार आहे.

तुम्ही मतदान करून बोटावरची शाई दाखवा आणि आम्ही फ्री इंटरनेट, फ्री कॉफी आणि फ्री डोसा देऊ. अशा ऑफर्स बेंगळुरूच्या काही कॅफेंमध्ये मतदानाच्या दिवशी मतदार राजाला देऊ करण्यात आल्या होत्या.

दक्षिणेत पाय रोवण्यासाठी उत्सुक भाजप आणि दक्षिणेतून उत्तरेकडे स्थिरावण्यासाठी आतूर काँग्रेस यांच्यासह स्थानिक पक्षांबाबतचा कौल मतदार राजा आज देईल.

अखेर कुणी कुणास मत दिलं, कुणाला बहुमत मिळालं, आणि कुणाचे मतभेद झाले, याचं चित्र 15 मे रोजी स्पष्ट होईल. पाहा कर्नाटकचा निकालांचे LIVE अपडेट्स इथे

यानिमित्ताने प्रचाराच्या रणधुमाळीतील बहुचर्चित सात महत्त्वाच्या गोष्टी.

1. लॉस्ट इन ट्रान्सलेशन

विंध्येच्या दक्षिणेत असलेल्या चार राज्यांमधल्या भाषा थोड्या वेगळ्या आहेत. म्हणून उत्तर भारतीयांकडून हिंदी भाषेची सक्ती होत असल्याचा आरोप या राज्यांमध्ये सातत्याने होत आला आहे. अशातच भाजप आणि काँग्रेसचे स्टार प्रचारक हिंदी भाषिक असल्याने वाद, थोडा अनुवाद आणि त्यावरून निर्माण होणारे वाद आलेच.

किमान दोन जाहीर सभांमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहांच्या हिंदी भाषणाचा चुकीचा कन्नड अपवाद होत असल्याचं त्यांनी स्वतः लक्षात आणून दिलं. "उगाच का खोटं बोलता? जेवढं मी बोलतोय, फक्त तेवढंच ट्रान्सलेट करा," असं त्यांना एका महिला कार्यकर्तीला बजावून सांगावं लागलं.

भाषेच्या याच प्रश्नाचा मान राखत यंदा काही राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही आपल्या कव्हरेजमध्ये कन्नड भाषेचा उपयोग केला. ट्विटरने सुद्धा आपले खास हॅशटॅग्स इंग्लिशव्यतिरिक्त कन्नडमधून दिले.

2. 'विश्वेश... विश्वरया... विश्वशरय्याजी...'

केवळ भाषाच नाही, अनेकदा दक्षिणेतल्या शहरांची, लोकांची नावं घेताना परप्रातीयांचा घोळ होतो. असंच एकदा झालं ते अमित शहांसोबत.

एका पत्रकार परिषदेत बोलताना भाजप अध्यक्ष शहा म्हणाले, "भ्रष्टाचारासाठी कुठली स्पर्धा असती तर येडियुरप्पा सरकार त्यात प्रथम आलं असतं."

भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असलेले बी. एस. येडियुरप्पा बाजूलाच बसले होते आणि त्यांनी लगेच शहांना 'अहो काय बोललात?' म्हणत चूक लक्षात आणून दिली. ती लगेच दुरुस्त करत मग शहा म्हणाले, "भ्रष्टाचारासाठी कुठली स्पर्धा असती तर त्यात सिद्धरामय्या सरकार प्रथम आलं असतं."

एका सभेत बोलताना राहुल गांधीही कर्नाटकमधून आलेल्या "महान लोकांची मोठमोठी नावं" घेताना घसरले. "टिपू सुलतानजी, कृष्णराजा वोडेयारजी, विश्वेश... विश्वरया... विश्वशरय्याजी..." असं ते म्हणाले. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचं नाव उच्चारू शकले नाही म्हणून भाजपने त्यांची चांगलीच टर उडवली.

3. कर्नाटकने अधिभार का द्यावा?

दक्षिणेत एक भव्यदिव्य राज्य असलेलं कर्नाटक राज्य देशाला मोठ्या प्रमाणात आर्थिक, तांत्रिक आणि मनुष्यबळाचं योगदान देतं. माहिती तंत्रज्ञान, कापड उद्योग, सोन्याच्या खाणी आणि उत्पादन क्षेत्रातल्या प्रगतीमळे हे राज्य सकल उत्पादनाच्या आकडेवारीत देशांत पाचव्या क्रमांकावर आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सिद्धरामय्या

'द न्यूज मिनिट' या दक्षिणेतल्या एका प्रसिद्ध न्यूज वेबसाईटवर लिहिलेल्या एका ब्लॉगमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणतात, "कर्नाटक जो एक रुपया केंद्र सरकारकडे जमा करतं, त्याबदल्यात केंद्र सरकारकडून आमच्या राज्याला केवळ 47 पैशांची मदत मिळते. त्याउलट उत्तर प्रदेशला त्यांच्या एक रुपयाच्या योगदानाच्या बदल्यात 1.79 रुपयांची मदत केंद्र सरकार करतं."

"जर दक्षिणेतली राज्यं जास्त विकास करत आहेत, तर त्यासाठी आम्हाला बक्षिस का नाही मिळत? उलट उत्तरेतल्या राज्यांसाठी आमच्यावर अधिभार का लादला जातोय?" असा सवाल ते उपस्थित करतात.

4. लिंगायत कुणाला मतदान करणार?

निवडणुका म्हटलं की मूलभूत गरजा, सामाजिक विकास, बेरोजगारीसारखे मुद्दे आलेच. पण धर्म, जात आणि आरक्षणासारखे विषयही या निवडणुकीत बेंगळुरूच्या बेलांदूर तळ्यातल्या पाण्यासारखे पेटले.

निवडणुका घोषित व्हायच्या काही आठवड्यांपूर्वी काँग्रेसप्रणीत सिद्धरामय्या सरकारने लिंगायत समुदायाला वेगळा धर्म म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव मंजूर केला.

Image copyright Gopichand Tandle
प्रतिमा मथळा लिंगायत समाजाला धर्म म्हणून मान्यता मिळाल्याने सत्तेची समीकरणं बदलणार आहेत.

12व्या शतकातले गुरू बसवेश्वराचे अनुयायी मानले जाणारे लिंगायत हिंदू प्रवर्गात मोडतात. कर्नाटकमध्ये एकूण 17 टक्के लोक लिंगायत समाजाचे आहेत. आणि त्यांची स्वतंत्र धर्माची मागणी ऐन निवडणुकांच्या आधी मान्य झाली. याचा आता कुणाला फायदा किती होतो, हे 15 मेला स्पष्ट होईल.

5. '...तर मी होणार पंतप्रधान'

कर्नाटक रणधुमाळीत 2019च्या लोकसभा निवडणुकांची चाहूलही लागलेली दिसली.

एका मुक्त फोरममध्ये लोकांशी संवाद साधताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, "नरेंद्र मोदी नक्कीच पुढचे पंतप्रधान होणार नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर मी स्पष्टपणे पाहू शकतो."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राहुल गांधींनी कर्नाटक प्रचारादरम्यान पंतप्रधान होऊ शकतो असं सूचक वक्तव्य केलं.

त्यावर "मग तुम्ही होणार का पंतप्रधान?" असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. "का नाही? जर युती जुळून आली आणि जर 2019मध्ये काँग्रेसला यश आलं तर मी पंतप्रधान होऊ शकतो."

6. 'पिंक' मतदान

या निवडणुकांमध्ये महिलांसाठी खास पिंक बूथ स्थापन करण्यात आल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी संजीव कुमार यांनी सांगितलं. "एकूण राज्यभरात 58 हजार मतदान केंद्र आहेत, ज्यांपैकी 600 पूर्णपणे महिलांसाठी असतील आणि महिलाच ते संचालित करतील," अशी माहिती त्यांनी दिली.

याशिवाय 10 बूथ विकलांगांसाठी तयार करण्यात आले आहेत, जे विकलांगांकडून चालवले जातील. आणि 28 मतदान केंद्रांना पारंपरिक पद्धतीने डिझाईन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

7. 'मतदान करा, कॉफी आणि डोसा मिळवा फ्री, फ्री, फ्री'

बेंगळुरूच्या सेकंड स्टेज कॅफेमध्ये उद्यापासून एक विशेष ऑफर असणार आहे - मतदान करून आलेल्या लोकांनी बोटावरची शाई दाखवायची आणि फ्री वायफायचा मनसोक्त आनंद घ्यायचा. ही योजना ते 2020 मध्ये होणाऱ्या बेंगळुरू महानगर पालिकेच्या निवडणुकांपर्यंत सुरू ठेवणार असल्याचं कॅफेमालकाने 'टाइम्स ऑफ इंडिया' वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.

Image copyright MANJUNATH KIRAN/Getty Images
प्रतिमा मथळा मतदारांना आकृष्ट करण्यासाठी फ्री डोश्याचं आमिष दाखवण्यात आलं आहे.

दुसरीकडे, शहरातल्या संपनगिरमानगर स्थित निर्सग ग्रँड प्योर कॅफेत पहिल्यांदाच मतदान करून आलेल्या तरुणांना बोटावरची शाई आणि मतदार पत्र दाखवल्यावर फ्री डोसा मिळणार आहे, तर इतर मतदारांना यशस्वी मतदानानंतर फ्री कॉफी मिळणार असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

हीच ऑफर शहरात 20 ठिकाणी असलेल्या वासुदेव अडिगा रेस्टॉरंटमध्येही असल्याचं या वृत्तातून कळतं. कुठल्याही ऑर्डरवर मतदारांना एक फ्री कॉफी मिळणार असल्याचं रेस्टॉरंट मालकांनी सांगितलं.


कर्नाटकच्या सत्तेचा पट

कर्नाटक विधानसभेत 224 जागा आहेत, त्यापैकी 222 जागांसाठी मतदान होत आहे. त्यापैकी 36 जागा SC तर 15 जागा ST उमेदवारांसाठी राखीव आहेत.

दोन जागांसाठी मतदान 28 मेला होणार असून त्याचा निकाल 31 मे रोजी लागेल. एका मतदारसंघात उमेदवाराचा मृत्यू झाल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. तर दुसऱ्या एका ठिकाणी जवळजवळ 10,000 मतदार ओळखपत्र बेवारस सापडल्याने राज्य निवडणूक आयोगाने राजराजेश्वरी मतदारसंघातलं मतदान 28 मे रोजी घेण्याची घोषणा मतदानाच्या काही तासांआधी केली आहे.


आम्ही कर्नाटकच्या रणधुमाळीवर केलेल्या बातम्या तुम्ही इथे वाचू शकता - कर्नाटकचा कानोसा

संकलन - गुलशनकुमार वनकर

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)