#5मोठ्याबातम्या : महाराष्ट्रात 10 महिन्यांत 13 हजारहून अधिक बालमृत्यू

गेल्या वर्षभरात झालेल्या एकूण बालमृत्यूंपैकी 65% बालकांचा मृत्यू हा जन्मल्यानंतर महिनाभरातच झाला आहे. Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा गेल्या वर्षभरात झालेल्या एकूण बालमृत्यूंपैकी 65% बालकांचा मृत्यू हा जन्मल्यानंतर महिनाभरातच झाला आहे.

आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :

1. महाराष्ट्रात वर्षभरात 13, 000 बालमृत्यू

महाराष्ट्रात एप्रिल 2017 ते फेब्रुवारी 2018 या काळामध्ये एकूण 13, 541 बालमृत्यू झाले आहेत. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

गेल्या वर्षभरात झालेल्या एकूण बालमृत्यूंपैकी 65% बालकांचा मृत्यू हा जन्मल्यानंतर महिनाभरातच झाला आहे. सर्वांत जास्त बालमृत्यू हे बाळाचं वजन कमी असणं आणि अपुरी वाढ झालेलं बाळ जन्माला येणं यामुळे झालेले आहेत.

याखालोखाल जन्माच्या वर्षभराच्या आतच 21% बालकांचा मृत्यू झाला आहे तर 1 ते 5 वर्षांदरम्यान 14% बालकं दगावली आहेत. बालमृत्यूच्या या आकडेवारीमध्ये मुलांचं प्रमाण 54% असून मुलींचे प्रमाण 46% आहे.

राज्य कुटुंब कल्याण विभागाकडून माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी ही माहिती माहिती अधिकारांतर्गत प्राप्त केली आहे.

2. न्यायाधीश जोसेफ यांची फेरशिफारस

सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीपदी उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांच्या पदोन्नतीची फेरशिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कोलेजियमने मोदी सरकारकडे केली आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा सर्वोच्च न्यायालय

गेल्या महिन्यात त्यांच्या नावाचा प्रस्ताव फेटाळणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारला कोलेजियमने दुसऱ्यांदा केलेली शिफारस स्वीकारणं बंधनकारक आहे.

मात्र, अंमलबजावणीची कालमर्यादा निश्चित नसल्यानं न्या. जोसेफ यांची नियुक्ती कधी करायची, हे मोदी सरकारलाच ठरवायचं आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे.

3. बलात्कार पीडितेला 10 लाखांपर्यंत मदत

सामूहिक बलात्कार पीडितेला कायदेशीर लढा देता यावा म्हणून सरकार आता 5 ते 10 लाख रुपयांची मदत देणार आहे. दिव्य मराठीनं ही बातमी दिली आहे.

घटनेचं स्वरूप आणि मदतीची रक्कम पुढीलप्रमाणे -

घटना मदत
मृत्यू 5 लाख ते 10 लाख
सामूहिक बलात्कार 5 लाख ते 10 लाख
बलात्कार 4 लाख ते 7 लाख
अनैसर्गिक अत्याचार 4 लाख ते 7 लाख
हल्ल्यामुळे गर्भपात 2 लाख ते 3 लाख
बलात्कारामुळे गरोदर 3 लाख ते 4 लाख
अॅसिड हल्ला/ जाळणे 7 लाख ते 8 लाख
50 % जखमी 5 लाख ते 8 लाख

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये 4 जून 2017ला एका तरुणीवर झालेला बलात्कार भारतीय जनता पक्षाचे आमदार कुलदीप सेंगर यांनीच केला, असं CBIने म्हटलं आहे. महाराष्ट्र टाइम्सने या संदर्भातली बातमी दिली आहे.

4. औरंगाबादजवळ अपघातात 9 जण जागीच ठार

औरंगाबाद- पैठण मार्गावर पाण्याचा टँकर आणि आपे रिक्शाची समोरासमेर धडक झाली. या अपघातात दोन चिमुकल्यांसह 9 जण जागीच ठार झाल्याची बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

भरधाव वेगानं येणाऱ्या पाण्याच्या टँकरनं समोरून येणाऱ्या आपे रिक्शाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की, रिक्षात बसलेले प्रावसी जागीच ठार झाले.

यात दोन महिला, तसेच 11 वर्षांची एक मुलगी आणि 4 वर्षांचा मुलगा ठार झाले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांना घाटी रुग्‍णालयात नेण्यात आलं आहे.

5. माझ्या जीवाला धोका

मला मारण्यासाठी काही जणांना सुपारी देण्यात आली आहे, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

Image copyright RAVEENDRAN/AFP/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा ममता बॅनर्जी

"मारेकऱ्यांनी अनेकदा कालिघाटमधल्या माझ्या घराशेजारील परिसराची रेकी केली आहे. हे मला माहिती आहे, कारण मी प्रशासनाचा एक भाग आहे. पोलिसांनी मला सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी अनेकदा विचारलं आहे पण मी नकार दिला."

"मी मृत्यूला घाबरत नाही. मी जर सुरक्षा यंत्रणेच्या गराड्यात राहण्यास सुरुवात केली तर माझं आणि जनतेतील अंतर वाढत जाईल," असं ममता म्हणाल्या आहेत.

एका खासगी माध्यम संस्थेला मुलाखत देताना ममता बोलत होत्या. आपण नसलो तरी आपला पक्ष व्यवस्थित काम करेन म्हणून मी काही माणसं नेमून ठेवली आहेत, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)