'कॅन्सरशी लढताना थकले की जगण्याचं आमिष हात घट्ट धरायचं '

  • शची मराठे
  • लेखिका
फोटो कॅप्शन,

शची मराठे

वय -23 वर्षें, फाईल नंबर xxxx आणि carcinoma grade 3 ब्रेस्ट कॅन्सर... ही माझी नवी आयडेंन्टीटी होती. हॉस्पिटलच्या बेडवर झोपून मी विचार करायचे... आता झाली की सवय आपल्याला भीतीची. चार किमोथेरपी झाल्या, मग सर्जरी झाली. आता अजून दोन किमो बाकी आहेत. मग रेडिएशन...

कॅन्सर आणि माझी तशी तोंडओळख होतीच. माझी आई मी 15 वर्षांची असताना ओव्हेरिएन कॅन्सरनं गेली, माझी सख्खी मामेबहिण ब्रेस्ट कॅन्सरनं दगावली. भीती वाटली ती फक्त ब्रेस्ट काढून टाकणार की काय? याचीच. पण माझा रोग आटोक्यात होता आणि माझं वय पहाता डॉ. बडवे आणि टीमनं ब्रेस्ट कन्झर्वेशनचा निर्णय घेतला.

मग एकामागोमाग किमो सुरू झाल्या. पहिली किमो झाल्यानंतर आठ-दहा दिवसातचं केस गळायला लागले. मला स्कार्फ बांधायची जाम हौस होती. ती आता पूर्ण होणार होती. नवा वीग आणला. तो घालून मी त्याच्यावर स्कार्फ बांधून युनिव्हर्सिटीला जायचे. लेक्चर्स अटेन्ड करायचे. पण सारखं वाटायचं की कोणाला कळलं तर...

पहिल्या किमोचा खूप त्रास झाला. किमो संपवून मी दुपारी घरी आले, त्यानंतर पुढचे 14 तास मला सतत उलट्या होत होत्या. मग पुढच्या किमोपासून उलट्या कमी कमी होत गेल्या. पण अन्न गिळायला त्रास व्हायचा. कोणतेही परफ्युम्स किंवा उदबत्तीचे वास सहन व्हायचे नाहीत.

त्यावरून माझं माझ्या बॉयफ्रेंडशी जाम भांडण व्हायचं. किमोच्या असंख्य साईड इफेक्टस् पैकी एक म्हणजे तुमच्या तोंडात लाळ तयार होण्याचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे जेवताना घेतलेला घास तोंडातच फिरत रहातो आणि तो गिळायला त्रास होतो. मग माऊथ अल्सर होतो. असं ते दुष्टचक्र चालूच रहातं.

म्हणून मग लिक्वीड किंवा सेमी लिक्विड अन्न खायला सुरवात गेली. त्यानं बराचं फरक पडला. चार किमोनंतर सर्जरी करायची ठरलं. सतराशे साठ टेस्ट झाल्या, बल्ड, एक्स से, सोनोग्राफी, हार्टसाठी 2D एको. आणि मग तो सर्जरीचा दिवस उजाडला. स्ट्रेचरवर बसून ऑपरेशन थिएटरपर्यंतचा आठ-दहा मिनिटांचा वेळ...

पण आत्तापर्यतचं सगळ आयुष्य डोळ्यासमोरून तरळून गेलं. सतत वाटत होतं की आपण काय जिवंत बाहेर येणार नाही. पण माझी भीती अनाठायी होती. जाग आली तेव्हा कळलं की ऑपरेशन संपलयं आणि मी जिवंत आहे. माझ्या डाव्या ब्रेस्टपासून निघून शरीरात पसरणाऱ्या दहा लिंफनोड्स काढून टाकल्या होत्या.

त्यामुळे ब्रेस्टमधला कॅन्सर शरीरात इतर ठिकाणी पसरण्यास अटकाव होणार होता. डाव्या काखेत स्टेपलरच्या पिना माराव्यात तशा दहा ते बारा पीना मारल्या होत्या. त्याला टाके म्हणतात हे ड्रेसिंगला आलेल्या नर्सनं सांगितलं. त्या टाक्यांच्या खाली पाहिलं तर त्वचेला भोक पाडून एक नळी आत घातली होती, दुषित रक्त जमा करण्यासाठी त्या नळीला खाली एक ड्रेनेज इव्हॅक्युएटर बसवला होता.

ती नळी आणि टाके नंतर काढून टाकणार असं सांगण्यात आलं आणि भीतीच्या वेदनेनं माझी झोप उडवली. हात खांद्याच्यावर नेता येत नव्हता. हात लांबवून कोणत्याही वस्तूपर्यंत पोहचता येत नव्हतं.

सर्जरीच्या दुसऱ्या दिवशी डॉक्टर येऊन व्यायाम सांगून, दाखवून गेले. तो व्यायाम दहा वेळा करून एकदा मोजायचा होता. आणि दिवसभरात असे दहा सेटस् करायचे होते. दोन्ही हात वर नेत कानाला चिकटून एकमेकांना जोडायचे. या व्यायामामुळे ऑपरेशन केलेला हात आखडणार नव्हता. व्यायाम करताना डाव्या काखेतले टाके तटतटायचे.

वेदनेची लहर शरीरभर सणसणत मेंदूत थडकायची, पाठ घामानं आणि डोळे पाण्यानं भिजायचे. संपूर्ण शरीरभर थरथर जाणवायची. मी डोळे मिटून घ्यायचे. बाबा दर तासाला या जीवघेण्या व्यायामाची आठवण करून द्याचये. आणि स्वतः मोजायचे.

डाव्या हाताची सर्जरी आणि उजव्या हातावर किमोथेरपीसाठी सतत सलाईन लावल्यानं त्या हाताखालची रक्तवाहिनी दुखावलेली... त्यामुळे व्यायाम करताना दोन्ही हातातल्या वेदनेचा दाह आता जीव घेतो की काय असचं वाटायचं... डोकं भणभणून जायचं.

दुःख, संताप, नैराश्य फेर धरून नाचताहेत या जाणिवेनं अस्वस्थ वाटायचं. वेदनेचं हे रुप मला दर तासाला हा व्यायाम करताना भंडावून, त्रस्त करून सोडत होतं. एकदा हात वर केल्यावर, काखेत बसणारा ताण, त्यातून पुन्हा पुन्हा, नव्यानं जन्म घेणारी वेदना नखशिखांत हादरवणारी होती.

पुढचे अनेक दिवस ही वेदना वस्तीला आल्यासारखी मला चिकटून होती. मी एक टकलू, अशक्त-रोगट आणि कुरुप मुलगी आहे असं सतत डोक्यात घण बसल्यासारखे विचार आदळत रहायचे. टाटा हॉस्पिटलमध्ये ब्रेस्ट ओपीडीला असलेल्या इतर पेशंट्स वयाने खूप मोठ्या होत्या.

लग्न झालेल्या, मूलं असलेल्या, अनेकजणी तर आज्यादेखील झालेल्या होत्या. त्यांच्याकडे पाहून वाटायचं अरे, आपलं यातलं काहीच नाही झालं, ना लग्न ना मूल...राहिलचं की सगळं...हळूहळू लोकांशी बोलायची भीती वाटायला लागली. कारण त्यांना कळेल, अरे, या मुलीला तर आयब्रोच नाहीत, ओ हिला तर पापणीचे केसपण नाहीत.

संताप, नैराश्य, भीती, आपण कोणाला आवडत नाही त्यामुळे आलेली असुरक्षितता... सगळे फेर धरून नाचायचे, डोकं सुन्न व्हायचं... मग मीही त्यांच्यात सामील व्हायचे.

हो, आहे मी कुरूप, फेर वेगवान व्हायचा, मी नाही आवडत कोणालाच... फेराचा वेग माझा ताबा घ्यायचा... माझे डोळे धुसर व्हायचे... डोकं गरगरायला लागायचं... या सगळ्यांनी माझा हात इतका घट्ट धरलेला असायचा की माझे प्रयत्न क्षीण व्हायचे.

मी लढणं सोडून द्यायचं असं almost ठरवत आणलं की फाटकन काहीतरी चमकून जायचं... जगण्यातलं काहीतरी आमिष दिसायचं... अरे, अजून अंदमानला जायचयं की... शुक्रवारी कोणता सिनेमा रिलिज होतोय? माझं मन विचारायचं, तो नवा बांधणीचा ड्रेस शिवून आलाय... तो कधी घालू... खूप दिवस झाले किर्ती कॉलेजचा वडापाव खाऊन... उद्या जायचं...

मग या सगळ्या आमिषांचा मिळून नवा फेर तयार व्हायचा... मला नकळत मी या आमिषांचा हात धरलेला असायचा, घट्ट... मी मान वळवून वळवून पहायचे, शोधायचा प्रयत्न करायचे... पण आधीच्या फेरातलं ते सगळे कुठे दिसायचेच नाहीत.

मग मी या नव्या फेराच्या विचारात गढून जायचे.

"मी सुंदर आहे... फेरा म्हणायचा, "yes, you are"

"माझ्यावर प्रेम करणारी कित्ती लोकं आहेत'... फेरा म्हणायचा - "हो तर… तू आम्हाला खूप आवडतेस."

मी म्हणायचे, "मला पण मी खूप्प्प्प आवडते..."

मग आम्ही सगळे एकदम म्हणायचो, "होईल की सगळं ठीक, आपण मिळून प्रयत्न करु"

मग मला खूप शांत वाटायचं. पण हा एक्ससाईज सतत करावा लागायचा. कधीकधी तर दिवसांतून खूप वेळा. ही आमिषं म्हणजे तुमचं जगण्यावरचं प्रेम असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी आमिषं असतात.

जी तुम्हाला हरू देतं नाहीत.. आज तेरा वर्षें झालीयेत या सगळ्याला... अजूनही वर्षांतून दोनदा फॉलो अपसाठी टाटाची पायरी चढते, तेव्हा तो नैराश्य, भीतीवाला फेरा दिसतो... पण मग आरशात पहाताना शरीरावरच्या सर्जरीच्या आणि रेडिएशन्सच्या खुणा दिसतात. त्या नुसत्या खुणा नाहीत तर मेडल्स आहेत, माझ्या कॅन्सरबरोबरच्या लढाईतली. ती मेडल्सचं पुन्हा लढण्याचं बळ देतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)