#5मोठ्याबातम्या - यंदा मॉन्सूनचं आगमन वेळेत होण्याची शक्यता

पाऊस Image copyright Getty Images

आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत पाच मोठ्या बातम्या :

1. मॉन्सूनचं आगमन वेळेत होण्याची शक्यता

मे महिन्याच्या अखेरीस पश्चिम हिंदी महासागरात मॉन्सूनच्या वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय होण्याचे दिलासादायक संकेत हवामानतज्ज्ञांनी दिले आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

हवामान अंदाजानुसार मान्सूनचं केरळमधलं आगमन मे अखेरीस म्हणजेच सर्वसाधारण वेळेच्या दरम्यान (1 जून) होण्याची शक्यता अधिक आहे.

स्कायमेट या खासगी संस्थेनं मान्सूनच्या केरळमधील आगमनाचा अंदाज शनिवारी जाहीर केला. या अंदाजानुसार 28 मे रोजी मान्सूनचं केरळमध्ये आगमन अपेक्षित असून त्यात 2 दिवस पुढे-मागे होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आलं आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटीओरोलॉजीतर्फे (आयआयटीएम) मे महिन्याच्या अखेरीस विषुववृत्त ओलांडून येणारा नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाह अरबी समुद्रात सक्रिय होत आहे. याच अंदाजानुसार 24-25मेच्या दरम्यान केरळमध्ये मान्सूनचं आगमन होऊ शकेल.

2. 'राहुल यांच्या पंतप्रधान होण्याच्या इच्छेत काही गैर नाही'

राहुल गांधी लोकांना आवडतात. तुम्ही स्वप्नं पाहता तर त्यांनी ती का पाहू नयेत, असं वक्तव्य भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

Image copyright AFP/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा शत्रुघ्न सिन्हा

"मोदी यांनी विरोधी पक्षाला पीपीपी म्हणजे पंजाब, पाँडीचेरी आणि परिवार असं बिरूद लावून फारच किरकोळ आणि मामुली स्तर गाठला आहे. मोदी यांनी राहुल गांधींवर केलेली टीका अयोग्य होती. आपण देशातल्या 130 कोटी जनतेचे पंतप्रधान म्हणून बोलतो याचे भान त्यांनी ठेवायला पाहिजे. पीपीपी या आद्याक्षरांच्या आधारे कोटी करणं म्हणजे शिशुवर्गात लघुरूपे शिकवतात की काय असे वाटणारे होते. देश म्हणजे शाळा नव्हे. अशा कोट्या करणं तुमच्या मनातली भीती दाखवते," असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं आहे.

3. प्राप्तीकर रद्द करणं गरजेचं - सुब्रह्मण्यम स्वामी

मध्यमवर्गाचा विकास आणि आर्थिक विकास साधण्यासाठी प्राप्तिकर रद्द करण्याची गरज आहे, असं मत भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी व्यक्त केलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं ही बातमी दिली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सुब्रमण्यम स्वामी

प्राप्तीकर म्हणजे मध्यमवर्गीय आणि नवउद्योजकांचा छळ आहे. भारतात प्राप्तिकर कोण भरतं? अगदी मोजक्या संख्येतले लोक भरतात. मग तुम्ही या मोजक्या संख्येतल्या लोकांवर प्राप्तिकराचं ओझं का टाकता? असा प्रश्न स्वामी यांनी विचारला आहे.

हैद्राबादमध्ये इंडियन एक्झिबिशन इंडस्ट्री आयोजित 8व्या सेमिनारमध्ये ते बालत होते.

4. 'त्या' पुस्तकावर बंदी आणावी - मुक्ता टिळक

लोकमान्य टिळकांचा उल्लेख दहशतवादाचे जनक असा करण्यात आलेल्या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी टिळक कुटुंबीयांनी केली आहे. द इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

Image copyright PIB
प्रतिमा मथळा लोकमान्य टिळक

"आयुष्यातल्या 64 वर्षांपैकी 50 वर्षं देशसेवेसाठी देणाऱ्या व्यक्तीचा असा उल्लेख करणं आमच्यासाठी हादरा देणारी गोष्ट होती. राजस्थानच्या शाळेतल्या मुलांच्या पुस्तकात लोकमान्य टिळकांना त्यांच्या नावानिशी बोलावण्यात आलं. हे आकलनाच्याही बाहेर आहे," असं पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी म्हटलं आहे.

"हा फक्त टिळकांचा अपमान नसून अख्ख्या देशाचा अपमान आहे. मी राजस्थान सरकारला पत्र लिहून पुस्तकावर बंदी घालण्याची विनंती केली आहे," असं टिळक पुढे म्हणाल्या.

दरम्यान टिळकांनी देशाला चळवळीचा मार्ग दाखवला. त्यामुळे ते फादर ऑफ टेररिझम ठरतात, असा उल्लेख राजस्थानमध्ये इयत्ता आठवीच्या एका रेफरन्स बुकमध्ये करण्यात आला आहे.

5. लता मंगेशकर यांचा 'स्वरमाऊली' सन्मानानं गौरव

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना शनिवारी मुंबईत त्यांच्या प्रभुकुंज निवासस्थानी 'स्वरमाऊली' सन्मानानं गौरवण्यात आलं. लोकसत्ता या दैनिकानं ही बातमी दिली आहे.

Image copyright GAUTAM RAJADHYAKSHA COLLECTION
प्रतिमा मथळा लता मंगेशकर गुरुवारी 87 वर्षांच्या झाल्या.

करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते हा सन्मान लता मंगेशकर यांना प्रदान करण्यात आला.

"या आधी जगद्गुरू शंकराचार्य यांनी मला 'स्वरभारती' सन्मानानं गौरवलं होतं. आता स्वरमाऊली या महत्त्वाच्या सन्मानासाठी माझी निवड केली आणि हा सन्मान प्रदान करण्यासाठी ते स्वत: मुंबईत आले. त्यासाठी मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते. त्यांच्याप्रती मी कृतज्ञ आहे," अशा भावना यावेळी लता मंगेशकर यांनी व्यक्त केल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)