#पाचमोठ्याबातम्या : ...म्हणून पर्रिकरांनी अमेरिकेतून पाठवला व्हीडिओ संदेश

मनोहर पर्रिकर Image copyright Reuters

विविध दैनिकं आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :

1. पर्रिकरांनी अमेरिकेतून पाठवला व्हीडिओ संदेश

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आपण सुखरुप असून आपल्यावरील उपचार यशस्वी होत असल्याचा व्हीडिओ ट्वीट केला आहे. स्वादुपिंडाच्या आजारानं त्रस्त असलेल्या मनोहर पर्रिकर यांच्यावर सध्या अमेरिकेत उपचार सुरू आहेत.

एबीपी माझाच्या बेवसाईटनं दिलेल्या बातमीनुसार या व्हीडिओत "माझ्यावर सुरू असलेले उपचार यशस्वी होत असून, मी काही आठवड्यांत तुमच्यासोबत असेन," असं गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर बोलताना दिसत आहेत.

रविवारी गोव्यात भाजपचं कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या संमेलनानिमित्त मनोहर पर्रिकर यांनी कार्यकर्त्यांना संदेश पाठवला होता.

2. घटस्फोटित महिला हिंसाचार प्रतिबंध कायद्याच्या कक्षेत

महिलांचा छळ रोखणारा घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा आता घटस्फोटित स्त्रियांनासुद्धा लागू होणार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे.

द हिंदू या दैनिकानं दिलेल्या बातमीनुसार न्या. रंजन गोगोई, आर. भानूमती आणि नवीन सिन्हा या न्यायाधीशांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे.

Image copyright Getty Images

आधी हा कायदा फक्त लग्न झालेल्या आणि नातेसंबंधात असलेल्या स्त्रियांना लागू होता. 2013 साली राजस्थान उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलं आहे.

3. महाराष्ट्र ATSकडून एकाला अटक

राज्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तींची हत्या करण्याचा कट आखणाऱ्या एका ३२ वर्षीय संशयिताला दहशतवादविरोधी पथकानं (ATS) अटक केली आहे. मिर्झा फैजल असं या संशयिताचं नाव असून त्यानं पाकिस्तानमध्ये हल्ल्याचे प्रशिक्षण घेतलं असल्याचं एटीएसच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

दिव्य मराठीनं दिलेल्या बातमीनुसार मुंबई उपनगरात ११ मे रोजी ही अटक करण्यात आली. दरम्यान, अटकेनंतर या संशयिताला स्थानिक कोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा त्याला २१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

4. अॅट्रॉसिटीबाबत वटहुकूम काढण्याचा विचार

दैनिक लोकमतनं दिलेल्या बातमीनुसार मोदी सरकार अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबात सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल निष्प्रभ करणारा वटहुकूम काढण्याचा विचार करत आहे. हा कायदा कोर्टाच्या कक्षेबाहेर ठेवण्यासाठी घटनात्मक कवचकुंडलं चढविण्याचाही सरकारचा विचार आहे.

Image copyright Getty Images

फिर्यादीची शहानिशा केल्याखेरीज गुन्हा नोंदवणे किंवा अटक करण्यास मज्जाव करणारा निर्णय मार्चमध्ये सुप्रीम कोर्टानं दिला होता. या निकालाच्या फेरविचारासाठी सरकारनं याचिका केली आहे.

त्याचा निर्णय होईपर्यंत निकालास स्थगिती द्यावी, ही दोन वेळा केलेली विनंती न्यायालयाने अमान्य केली. आता १६ मेच्या सुनावणीत काय होतं यावर सरकारची पुढील पावलं अवलंबून असतील.

5. उदयनराजेंचा राष्ट्रवादीला इशारा

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला आहे.

Image copyright Sai Sawant
प्रतिमा मथळा उदयनराजे भोसले

"अपक्ष उमेदवारीवरून एकाएकाची पुंगी वाजवू शकतो, लोकशाही आहे म्हणूनच गप्प आहे, राजेशाही असती तर एकाएका आमदाराला दाखवलं असतं," असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

झी 24 तासच्या वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानुसार "हिंमत असेल तर मैदानात या. अपक्ष उमेदवारी भरुन एकाएकाची पुंगी वाजवतो की नाही ते बघाच," असंही ते कराडमधल्या पत्रकार परिषदेत बोलले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)