वजुभाई वाला : कर्नाटकच्या राजकीय नाटकात हे ठरले 'मुख्य पात्र'

वाजुभाई वाला Image copyright RAJ BHAVAN KARNATAKA

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालांचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. भाजप हा विधानसभेतला सर्वांत मोठा पक्ष ठरणार असला, तरी ते बहुमताच्या 112 या जादुई आकड्यापासून लांबच आहे.

संख्याबळाचा विचार करता काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आणि JDS तिसऱ्या स्थानावर आहे.

या अशा त्रिशंकू अवस्थेतल्या विधानसभेत सत्तास्थापनेचा निर्णय राज्यपालांवर अवलंबून असेल. सत्तास्थापनेसाठी ते कोणाला आमंत्रित करतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.

राज्यपाल म्हणून ही जबाबदारी 80 वर्षांच्या वाजुभाई वाला यांच्या खांद्यांवर आहे.

कोण आहेत वाजुभाई वाला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा वाजुभाई वाला त्यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. त्याच प्रमाणे 2005-06 या काळात ते गुजरात भाजपचे प्रमुख होते.

13 वर्षांच्या मोदींच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात नऊ वर्षं वाला यांनीच अर्थमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. 18 वर्षं राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा अनोखा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.

गुजरातमध्ये केशुभाई पटेल यांच्याकडून नरेंद्र मोदी यांच्याकडे सत्तेचं हस्तांतरण झाल्यानंतरही आपली पत राखण्यात यशस्वी ठरलेल्या मोजक्या नेत्यांमध्ये वाजुभाई वाला यांचा समावेश आहे.

नरेंद्र मोदी यांनी 2001मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळी वाजुभाई वाला अर्थमंत्री होते. पण त्यांनी आपली जागा मोदींसाठी सोडली होती.

राजकोट हाच गडकोट!

वाजुभाई वाला राजकोटच्या एका व्यापारी कुटुंबात जन्माला आले. शाळेपासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये जात होते.

वाजुभाई 26 वर्षांचे असताना ते जनसंघात सहभागी झाले. त्यानंतर लवकरच केशुभाई पटेल यांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांचा समावेश झाला. ते काही काळ राजकोटचे महापौरही होते.

Image copyright RAJ BHAVAN KARNATAKA

1985मध्ये त्यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. याच मतदारसंघातून ते तब्बल सात वेळा निवडून आले.

त्यांची ही सात टर्मची कारकीर्द अनेकदा वादांच्या भोवऱ्यातही सापडली. राजकोटमधल्या बड्या बिल्डरांसह असलेल्या त्यांच्या संपर्कामुळे त्यांची रिअल इस्टेट प्रॉपर्टी वाढत असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. पण या आरोपांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाला काहीच गालबोट लागलं नाही.

तसंच या आरोपांचा परिणाम त्यांच्या निवडून येण्याच्या क्षमतेवरही झाला नाही. राजकोट हाच त्यांचा भक्कम गडकोट राहिला.

मजेदार भाषणं आणि वादग्रस्त विधानं

विरोधकांच्या टोप्या उडवणारी खुसखुशीत शैलीतली भाषणं करण्यासाठी वाजुभाई वाला प्रसिद्ध आहेत. त्यांची भाषणं मतदारांवर हमखास प्रभाव टाकतात.

लोक जोडण्याची त्यांची हातोटीही वाखाणण्याजोगी आहे. राजकारणातल्या इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर त्यांचा लोकसंग्रहही दांडगा आहे.

लोकांच्या आनंदात, दु:खात सहभागी होणारं त्यांचं व्यक्तिमत्व त्यांच्या मतदारसंघात तरी लोकप्रिय आहे.

हे असं असलं, तरी काही वादग्रस्त विधानांमुळेही ते चर्चेत आलं होतं.

म्हैसूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी विधान केलं होतं की, मुलींनी फॅशनपासून दूर राहायला हवं. कॉलेज ही काही फॅशन करायची जागा नाही, असंही ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)