ऐश्वर्या आणि विवेक यांच्या लग्नाला का गेले नागराज मंजुळे?

विवेक आणि ऐश्वर्याचं लग्न Image copyright BBC/Vivek Tamaichikar
प्रतिमा मथळा विवेक आणि ऐश्वर्याचं लग्न नाट्यमय वळणाचं ठरलं.

शनिवार, दिनांक 12 मे. स्थळ- पिंपरी, पुणे. संध्याकाळी 7 वाजून 10 मिनिटांच्या मुहुर्तावर विवेक तमाईचिकर आणि ऐश्वर्या भाट यांचा शुभविवाह अगदी थाटामाटात पार पडला.

याच दोघांनी कंजारभाट समाजातल्या कौमार्य चाचणीच्या प्रथेला वाचा फोडली होती. म्हणूनच या दोघांचं लग्न अनेक नाट्यमय वळणांचं ठरलं. या लग्नसोहळ्याचे साक्षीदार नागराज मंजुळे यांच्यासारखे समाजातले अनेक नामवंत होते. पण लग्नसोहळ्याला उपस्थित राहिलेल्या कंजारभाट समाजातल्या कुटुंबांना वाळीत टाकलं जाण्याची भीती आहे.

या लग्नाची गोष्ट सुरु होते- 2015 सालापासून. विवेक आणि ऐश्वर्या यांचं लग्न विरोध, मनधरणी, घमासान चर्चा, संघर्ष आणि लोकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलं.

कंजारभाट या भटक्या-विमुक्त जमातीमधल्या विवेक आणि ऐश्वर्या यांच्या लग्नगाठी बांधल्या गेल्या. विवेक टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधून मास्टर्स करत होते, तर ऐश्वर्या कायद्याचं शिक्षण पूर्ण करत होत्या.

साखरपुडा होण्याआधी विवेक यांची अट होती की, कौमार्य चाचणी होऊ द्यायची नाही. कंजारभाट समाजात ते सोपं नव्हतं. कारण कौमार्य चाचणीची प्रथा पूर्वापार चालत आलेली.

कंजारभाट समाजाताली स्त्री 'व्यभिचारी' आहे की नाही, हे ठरवणारी कौमार्य चाचणी लग्नानंतर घेतली जाते. अरेंज मॅरेज करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही कौमार्य चाचणी द्यावी लागते.

"मी सुरुवातीपासून ही अट हट्टानं लावून धरली, ऐश्वर्याचाही पाठिंबा होताच. मी कळत्या वयापासून माझ्या समाजातल्या मुलींवर या चाचणीच्या नावानं झालेले अत्याचार पाहात होतो. आणि हेच मला मोडित काढायचं होतं," विवेक तमाईचिकर सांगतात.

नवं अभियान सुरू

गेल्या वर्षी (2017) सप्टेंबरमध्ये लग्नाची तारिख निश्चित झाली आणि मग गेली काही वर्ष अधूनमधून घोंगावणारं वादळ विवेक यांच्या समोर येऊन उभं ठाकलं. "कौमार्य चाचणी करायची नाही या अटीवर सहमत असणारे घरातले सर्वजण जातपंचायतीच्या दबावाला बळी पडू लागले. समाजातल्या अनेक क्रूर रूढी परंपरांना माझ्यासारख्या अनेक तरूणांचा विरोध होता. इथेच मी आणि ऐश्वर्यानं ही लढाई तरूणांच्या मदतीनं लढायचं ठरवलं."

ऐश्वर्या यांचाही सुरुवातीपासून कौमार्य चाचणीला विरोध होता. "मी वयात आले तेव्हा माझ्या आईनं मला कौमार्य चाचणीबद्दल सांगितलं होतं. पण आईला या प्रथेचा अभिमान वाटतं होता. मी मैत्रिणींशी मोकळेपणानं बोलायला लागले तेव्हा कौमार्य चाचणीला विरोध करायचा हे मनाशी पक्क ठरवलं होतं. ते कठीण होतं, पण विवेक आयुष्यात आल्यावर त्याची साथ मिळाली."

Image copyright BBC/Vivek Tamaichikar
प्रतिमा मथळा लग्नात बाऊंसरना बोलावण्यात आलं होतं.

"आणि आम्ही सर्वांनी मिळून नोव्हेंबरमध्ये 'Stop The V Ritual' अभियान सुरू केलं. इथूनच पुढे आमच्या मित्र-मैत्रिणींना, भावंडाना कंजारभाट जातपंचायतीकडून धमक्या येणं सुरू झालं."

कंजारभाट समाजाच्या अशाच एका लग्नामध्ये या अभियानाच्या कार्यकर्त्यांना पुण्यात मारहाण करण्यात आली. जातपंचायतीनं हे घडवून आणलं असा आरोप तरुणांनी केला होता.

पण लग्नाच्या या गोष्टीनं महत्त्वाचं वळण घेतलं, जेव्हा मीडियानं कौमार्य चाचणी आणि कंजारभाट समाजातल्या प्रथांविषयी चर्चा केली. "माझ्याविरोधात महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी विनयभंगाच्या तक्रारी दाखल करायला जातपंचायतींनी सांगितलं. हे झालं यावर्षीच्या फेब्रुवारीमध्ये. मार्चमध्ये पुण्यात आमच्याविरोधात महिलांचा मोर्चा काढला गेला."

लग्नाचा दिवस जवळ येत होता, तसतसा विवेक आणि ऐश्वर्याच्या कुटुंबावरील दबाव वाढत चालला होता, असं विवेक सांगतात.

ऐश्वर्या सांगतात,"माझ्याकडे विवेकविषयी बदनामी करत त्याच्या सोबतचं नातं तोडण्यासाठी नातेवाईक सतत दबाव टाकत होते."

एप्रिलमध्ये आमंत्रण पत्रिका छापून आली. त्यात म्हटलं होतं- 'कंजारभाट समाजात चालणाऱ्या कौमार्य परिक्षण आणि अनिष्ठ रूढी परंपरांविरोधात उभारलेल्या लढ्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी आपणा सर्वांची अमूल्य उपस्थिती प्रार्थनीय आहे.'

'लग्नाच्या दिवशी धमक्या'

"घरातल्यांना मानसिक त्रास होत होता, कारण समाजापासून दूर तुटलं जाण्याची भिती वाटत होती. धमक्या येऊ लागल्या होत्या. भाऊ-काका सगळे सोबत होते, पाठिंबा देत होते. ऐश्वर्याच्या आजोबांनी आणि नातेवाईकांनी मोठ्या मनानं परंपरेतला बदल स्वीकारला होता," विवेक सांगतात.

Image copyright vivek tamaichikar
प्रतिमा मथळा नागराज मंजुळे यांनी दोघांच्या धाडसाचं कौतुक केलं.

लग्नाचा दिवस उजाडला. लग्न होतं पुण्यातल्या पिपंरीमध्ये. याच पिंपरीमध्ये विवेकच्या ग्रुपमधल्या मित्रांना मारहाण झाली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलीस संरक्षण घेतलं होतं. "लग्नाच्या स्थळाकडे माझी वरात निघाली तो वाटेत गटागटानं संशयास्पद घोळके दिसत होते. त्याची आधीच कल्पना असल्यानं आम्ही लग्नात बाऊन्सर बोलवले होते. अगदी काही झालंच तर परिस्थिती आटोक्यात आणण्याची सगळी खबरदारी घेतली होती."

"आम्हा दोघांना धमकावणारे फोन लग्नाच्या दिवशी दिवसभर येत होते," असं ते सांगतात.

"तरीही ऐकमेकांवर विश्वास होता म्हणूनच आम्ही लग्नात कौमार्य चाचणी होऊ दिली नाही. ठामपणे विरोध केला." ऐश्वर्या यांना आता हायसं वाटतंय.

हे लग्न व्यवस्थित पार पडावं यासाठी पुढाकार घेतला होता तो अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं. या संघटनेच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर, कृष्णा चांदगुडे आणि नंदीनी जाधव यांनी लग्नाला हजेरी लावली होती. "तर लोकमतचे पत्रकार विलास बडेंनी मोठ्या भावासारखी जबाबदारी घेत लग्नातल्या विरोधी आवाजाला शांतपणे मिटवून टाकलं."

'दोघांचं कौतुक वाटतं'

पण लग्नात जेव्हा सैराट या लोकप्रिय सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची एंट्री झाली तसं वातावरणच पालटून गेलं. "नागराज यांना या लग्नसोहळ्यात जाहिरपणे काही बोलू द्यायचं नाही, यासाठी आमच्यावर दबाव वाढत होता. पण ते शक्यच नव्हतं. ते बोलले. त्यांनी आमचं कौतुक केलं."

केवळ सेलिब्रिटी म्हणून नागराज या लग्नाला उपस्थित राहिले नव्हते. बीबीसी मराठीशी बोलताना, या लग्नाला का गेलो याविषयी नागराज मंजुळे म्हणाले, "कौमार्य चाचणीसारख्या तर्कहीन आणि स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या रूढी-परंपरांना फाटा देऊन विवेकसारखे तरुण पुढचं पाऊल उचलत आहेत, त्यांना साथ देण्यासाठी मी लग्नाला उपस्थित राहिलो. खरंतर दोघांचं मला कौतुक वाटतं."

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : कंजारभाट समाजातील तरुणांचा कौमार्यचाचणीविरुद्ध एल्गार

"कौमार्य चाचणीचा जाच पुरुषी व्यवस्थेमुळे स्त्रियांवर लादला गेलाय. हाच चाचणीचा नियम जर पुरुषांना लावला गेला तर विचार करा? पुरुष काय करतील. कौमार्याचा तमाशा करत पुरुष शोषक होत आहेत, हे त्यांना कळायला हवं," असंही नागराज म्हणाले.

"जातीतील रूढी-परंपरा पुढे नेणाऱ्या लोकांनी जर संवेदनशीलपणे थांबून विचार करण्याची गरज आहे. यासाठी कोणाला दोष देऊन चालणार नाही."

नागराज मंजुळे हे अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे हितचिंतक आहेत आणि त्यांनी आपल्या अनेक सिनेमांमधून जातीभेदावर भाष्य केलं आहे.

लग्न तर झालं. पण जातीतल्या रूढी-परंपरांना विरोध करण्याची किंमत त्यांना मोजावी लागतेय. "माझ्या लग्नात कंजारभाट समाजातले जे लोक उपस्थित होते त्यांना समाजातून बहिष्कृत होण्याची भीती आहे. पूर्वी ज्यांना वाळीत म्हणजेच बहिष्कृत केलं जायचं त्यांच्या नावानं 'सर्क्युलर निघायचं. आता फक्त बोलून वाळीत टाकतात. माझ्या काही नातेवाईंकाना कार्यक्रमांना बोलावणं बंद केलंय," विवेक यांनी सांगितलं.

"पूर्वी कौमार्य चाचणीला कार्यक्रमाचं स्वरूप होतं. आमच्या या लढाईनंतर पंच मंडळी अतिशय गुप्तपणे या चाचणीचे कार्यक्रम करू लागले आहेत."

विवेक-ऐश्वर्याच्या लग्नाची गोष्ट इथं जरी संपली असली तरी कंजारभाट समाजातल्या एका नव्या बदलाला सुरुवात झाली आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)