#5मोठ्याबातम्या : आंध्र प्रदेशात बोट उलटून 40 जण बुडाल्याची भीती

बोट Image copyright BBC/Sangeetham Prabhakar

विविध दैनिकं आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :

1. आंध्रात बोट बुडून 40 लोकांचा मृत्यू

आंध्र प्रदेशातील गोदावरी नदीत मंगळवारी संध्याकाळी बोट बुडून 40 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी हिंदुस्तान टाइम्सने दिली आहे. बोटीमधील सर्व व्यक्ती आदिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे.

सुरुवातीला आलेल्या बातम्यांनुसार, ही बोट 50 जणांना घेऊन कोंडामडालू आदिवासी पाड्यातून राजमहुंद्री नदीच्या किनारी जात होती. सोसाट्याचा वारा आल्यामुळे ही बोट मंतूर नावाच्या खेड्याजवळ उलटली.

तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे तसेच पीडितांना शक्य ती सगळी मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिले आहेत.

2. PNBला ऐतिहासिक 13,416 कोटींचा तोटा

हिरे व्यापारी नीरव मोदीने केलेल्या 13 हजार कोटी रुपयांच्या कर्जघोटाळ्याचा पंजाब नॅशनल बँकेला (PNB) मोठा फटका बसला आहे. या बँकेने जाहीर केलेल्या जानेवारी ते मार्च 2018 या तिमाहीच्या आर्थिक अहवालानुसार बँकेला 13 हजार 417 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे, असं वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिलं आहे.

Image copyright Getty Images/INDRANIL MUKHERJEE
प्रतिमा मथळा पंजाब नॅशनल बँक

सार्वजनिक बँकांमधील चौथ्या क्रमांकाची बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने गेल्या आर्थिक वर्षात 261.90 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. मात्र चालू वर्षाच्या फेब्रुवारीत उघडकीस आलेल्या नीरव मोदी घोटाळ्यामुळे या बँकेचे गणित पार कोलमडले.

या घोटाळ्यामुळे बुडीत कर्जांपोटी बँकेला मार्चअखेर तब्बल 20 हजार 353 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे. ही तरतूद पूर्वीपेक्षा चारपटीने वाढली आहे

3.वारणसीत पुल कोसळल्याने 18 लोकांचा मृत्यू

बांधकाम सुरू असलेला एक पूल कोसळल्याने वाराणसीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या बातमीनुसार ही घटना मंगळवारी कँटॉनमेंट भागात संध्याकाळी घडली.

Image copyright AFP

मलब्याखाली आणखी लोक अडकल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. घटना घडल्यानंतर प्रशासन आणि पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

4. सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी आधार आवश्यक नाही

सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी आधार कार्डाची गरज नसल्याचं कार्मिक विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. द हिंदूने ही बातमी दिली आहे.

प्रतिमा मथळा आधार कार्ड

आधार कार्ड नसल्याने अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे जितेंद्र सिंह यांच्या घोषणेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आधार फक्त जिवंत असण्याचा एक दाखला आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला बँकेत जायची गरज भासायला नको म्हणून आधार कार्डाची सोय करण्यात आल्याचं वक्तव्य त्यांनी केलं.

5. महाराष्ट्राने गमावले दोन कलाकार

वारली चित्रकार जिव्या सोम्या म्हसे आणि ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर (वय 102) असे दोन कलाकार महाराष्ट्राने गमावले आहेत.

लोकमतने दिलेल्या बातमीनुसार, जिव्या म्हसे यांचे मंगळवारी पहाटे डहाणू तालुक्यातील गंजाड गावात कलमीपाडा येथे निधन झाले. ते 87 वर्षांचे होते.

घरात लग्नकार्य असलं की कुडाच्या भिंती सारवून त्यावर घरातील स्त्रियांनी आपले भावविश्व साकारायचं ही वारली समाजाची लाखो वर्षांची परंपरा होती. स्त्रीकेंद्रित असलेली जिव्या सोमा यांनी ही परंपरा मुक्त केली आणि जगासमोर आणली, असं लोकमतची ही बातमी सांगते.

वारली पेंटिग जागतिक पातळीवर पोहोचवणाऱ्या या कलाकाराला पद्मक्षी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

आधी लावणी मग नाट्यक्षेत्राकडे वळून नाव कमावणाऱ्या कलाकार यमुनाबाई वाईकर यांनी वाई येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांनासुद्धा 2012 साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

यमुनाबाईंनी 'भावबंधन', 'मानापमान' आदी नाटकांमध्ये काम केलं होतं. 'संशयकल्लोळ' नाटकातली त्यांची भूमिका खास गाजली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)