#5मोठ्याबातम्या : महाराष्ट्रात 36 हजार पदांसाठी मेगा भरती

मंत्रालय Image copyright BBC/Sharad Badhe

आज सकाळी विविध वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या खालीलप्रमाणे:

1. महाराष्ट्रात 36 हजार पदांसाठी मेगा भरती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध खात्यांतील 36 हजार पदं भरण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी निर्माण होणार असल्याची बातमी महाराष्ट्र टाइम्स ने दिली आहे.

महाराष्ट्रात विविध खात्यात 71 हजार पदं रिक्त असल्याचं फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातील चर्चेला उत्तर देताना सांगितलं होतं. ही पदं दोन टप्प्यात भरणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं होतं.

यंदा पहिल्या टप्प्यात 36 हजार तर दुसऱ्या टप्प्यात पुढच्या वर्षी 36 हजार पदं भरण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यातल्या पहिल्या टप्प्याला आज मंजुरी मिळाली आहे.

2. मुंबई देशातील सर्वांत स्वच्छ राजधानी

देशातील स्वच्छ राजधानीचा मान मुंबईला मिळाला असून घनकचरा व्यवस्थापनातील सर्वोत्कृष्ट महापालिकेचा पुरस्कार नवी मुंबई महापालिकेला जाहीर झाला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा निकाल लोकसत्ता ने बातमीतून दिला आहे.

त्यानुसार महाराष्ट्र देशातील दुसरं सर्वोत्कृष्ट राज्य ठरलं आहे, ज्यामधली विविध विभागांली 10 शहरंही स्वच्छ जाहीर करण्यात आली आहेत. यापैकी सहा शहरांना राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे.

केंद्र सरकारच्या 'स्वच्छ भारत अभियाना'अंतर्गत शहरी भागातील स्वच्छतेचं मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण 2018 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. ४ जानेवारी ते १० मार्च या कालावधीत देशातील चार हजार २०३ शहरांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं.

Image copyright BBC/Sharad Badhe

या स्पर्धेत झारखंड राज्याने सर्वोत्कृष्ट राज्याचे पहिले पारितोषिक मिळवलं तर महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे. देशातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहराचा मान इंदूर शहराने पटकावला आहे.

3. काश्मीरमध्ये रमजानमुळे युद्धविराम

रमजानच्या काळात काश्मिरातील कट्टरवाद्यांविरुद्ध कोणतीही मोहीम राबवू नये, असा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. टाइम्स ऑफ इंडिया ने ही बातमी दिली आहे. हिंसाचार थांबवून शांतता प्रस्थापित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

पण त्याच वेळी कट्टरवाद्यांनी हल्ला केला तर सैन्याला सामान्य जनतेचं रक्षण करण्यासाठी त्यांना प्रत्युत्तर द्यावं लागेल, असंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

एखादा कट्टरवादी लपून बसला असल्याची पक्की माहिती मिळाली तरीसुद्धा उचित कारवाई करण्यात येणार असल्याचं या आदेशात म्हटलं आहे.

4. न्याय्य प्रक्रियेशिवाय अटक नाही : सुप्रीम कोर्ट

संसद कोणत्याही व्यक्तीला मुलभूत हक्कांपासून वंचित ठेवू शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाने अॅट्रॉसिटी अॅक्टमधल्या बदलसंबंधीत सुनावणीदरम्यान म्हटलं आहे. "न्याय्य प्रक्रिय पार पाडल्याशिवाय कुणालाही अटक करण्यासाठी राज्यघटनेत परवानगी नाही," असं सुप्रीम कोर्टानं बुधवारी नमूद केलं.

Image copyright Getty Images

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार, सरकारने अॅट्रॉसिटी कायद्याच्या निर्णयाच्या विरोधात केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना न्या. उदय लळीत आणि न्या. ए. के. गोयल या न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

5. INS तारिणी टीमची सागरी परिक्रमा पूर्ण

भारतीय नौदलाच्या तारिणी बोटीतून जगपरिक्रमा यशस्वीपणे पूर्ण करून सहा महिला नौसैनिक भारतात परत येणार आहेत.

10 सप्टेंबर 2017 रोजी एका शीडाच्या बोटीतून त्या या मोहिमेवर निघाल्या होत्या. आणि आता नऊ महिन्याचा प्रवास पूर्ण करून येत्या 21 मेला त्या परतणार आहेत, असं वृत्त 'द हिंदू'ने दिलं आहे.

Image copyright Indian Navy
प्रतिमा मथळा 'INSV तारिणी' च्या टीमने गोव्याहून त्यांच्या मोहिमेची सुरुवात केली होती.

गोव्यातील मांडवी भागात त्यांच्या आगमनानंतर फ्लॅगिंग-इन कार्यक्रम होणार असल्याचं नौदलाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. या मोहिमेत सहभागी झालेल्या सहा महिलांचं स्वागत करण्यासाठी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)