पाहा व्हीडिओ : जेव्हा मुंबईच्या डबेवाल्यांनी केला इंग्लंडच्या राणीसोबत डान्स

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : प्रिन्स चार्ल्सच्या लग्नाला गेले होते मुंबईचे डब्बेवाले!

प्रिन्स हॅरी आणि हॉलिवूड अभिनेत्री मेगन यांचा शाही विवाहसोहळा 19 मे रोजी होणार आहे. या सोहळ्याविषयी उत्सुकता जगभरात आहे. मुंबईच्या डबेवाल्यांनी प्रिन्स चार्ल्स यांचा असाच शाही विवाह सोहळा यापूर्वी अनुभवला होता. त्यांनी बीबीसी मराठीशी शेअर केलेले त्या वेळच्या आठवणी...

मुंबईच्या डबेवाल्यांचं आणि लंडनच्या राजघराण्याचं आपुलकीचं नातं आहे. कारण 2005 मध्ये प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला यांचा विवाहसोहळा झाला होता. त्याचं शाही निमंत्रण डबेवाल्यांना होतं.

डबेवाल्यांच्या वतीने या लग्नाकरिता मुंबईहून दोन डबेवाल्यांना लंडनला पाठवण्यात आलं होतं. त्यापैकी एक होते - सोपान लक्ष्मण मरे.

पहिला विमानप्रवास

लंडनच्या त्या शाही लग्नाबद्दल विचारलं असता आजही सोपान मरे यांच्या मनात त्या आठवणी ताज्या असल्याचं ते सांगतात.

सोपान सांगतात, "ज्यावेळी प्रिन्स चार्ल्स यांच्या लग्नाचं निमंत्रण आलं तेव्हा आमच्याकडे पासपोर्टसुद्धा नव्हता. माझ्या पासपोर्टसाठी मी गावातल्या शाळेत जाऊन आधी माझा दाखला आणला आणि अवघ्या 2-3 दिवसात भारत सरकारने विशेष मदत केल्यानं आमची पासपोर्टची व्यवस्था झाली."

प्रतिमा मथळा प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला

"इथून आम्ही विमानाने लंडनला गेलो. तोपर्यंत आम्ही मित्रा-मित्रांमध्ये बोलत असतानासुद्धा मुंबईहून पुण्याला विमानाने जाऊ या, एवढंच बोलायचो. आम्हाला फक्त विमान कसं उडतं आणि कसं उतरतं हे पाहायचं होतं. मात्र हे शाही निमंत्रण मिळाल्यानंतर आमचं स्वप्न सत्यात उतरलं. सुरुवातीला भीती वाटली. मात्र नंतर हा प्रवास काही अवघड नाही असं वाटलं."

कडक सुरक्षा बंदोबस्तात आम्ही राहिलो

लंडनला गेल्यानंतर त्यांचं कशाप्रकारे स्वागत झालं, याबद्दल ते आवर्जून सांगतात. तिथल्या सुरक्षाव्यवस्थेबद्दलही सांगतात.

Image copyright BBC/RAHUL RANSUBHE
प्रतिमा मथळा सोपान मरे

"आम्ही जेव्हा लंडनला उतरलो, तेव्हा तिथे लंडनला बरीच थंडी होती. तेव्हा लगेच विमानतळावर आम्हाला घेण्यासाठी आलेल्या राजघराण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींनी कोट दिले. तिथून आम्ही थेट राणी एलिझाबेथ यांच्या राजवाड्यासमोर असलेल्या ताज ग्रूपच्या हॉटेलमध्ये गेलो. तिथेच आमची 8 दिवस राहण्याची सोय केली होती. आमच्यासाठी एवढी कडक सुरक्षा व्यवस्था होती की, आम्ही कुठेही जाताना सुरक्षारक्षक आमच्यासोबत असायचे."

"आम्ही राजाच्या कुटुंबाचे पाहुणे असल्यानं आम्हाला कुठेही काहीही कमी पडू नये, त्रास होऊ नये म्हणून आम्हाला कडक सुरक्षा देण्यात आली होती. त्यांनी आम्हाला दोन कॉर्डलेस फोन दिले होते. तरीपण आम्हाला इकडे तिकडे जायची कुठेच परवानगी नव्हती. कुठेही जाताना आम्ही कॉर्डलेसवरून सुरक्षा रक्षकांना फोन करायचो. ते ताबडतोब गेटवर यायचे आणि तिथून ते आम्हाला पाहिजे तिथे फिरायला घेऊन जायचे," मरे पुढे सांगतात.

जयपूरची राणी बनली ट्रान्सलेटर

मरे यांना इंग्रजी येत नसल्यानं त्यांना संवाद साधण्यासाठी भाषेची फार मोठी अडचण जावणत होती.

याबद्दल ते सांगतात, "आम्ही राजघराण्याचे पाहुणे असल्याने तिथे आम्हाला कसलीच कमतरता भासली नाही. पण प्रिन्स चार्ल्स आणि त्यांच्या मातोश्री राणी एलिझाबेथ यांच्याशी बातचीत करताना आम्हाला इंग्रजी येत नसल्यानं अडचण जाणवली. तेव्हा जयपूरची राणी पद्मिनीदेवी या आमच्यासाठी अनुवादक बनल्या. पद्मिनीदेवी देखील या लग्नाला आल्या होत्या. त्यांनी आमची अडचण समजून घेऊन आमचं म्हणणं राणी एलिझाबेथ यांना सांगायची जबाबदारी स्वीकारली. आम्ही हिंदीमध्ये बोलायचो आणि त्या आमचं बोलणं त्यांना इंग्रजीत सांगत. पुन्हा राणींचं बोलणं आम्हाला हिंदीमध्ये सांगत. त्यांची आम्हाला खूप मदत झाली."

सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यात लंडनदर्शन

एखाद्या मंत्र्याला जशी सुरक्षा असते अशा सुरक्षेत मरे यांनी लंडनदर्शन केलं. याबद्दल ते उत्साहाने सांगत होते. "आम्ही 3 दिवस लग्नाचा पूर्ण आनंद घेतला. मात्र त्यानंतरचे 4 दिवस आम्ही संपूर्ण लंडन फिरण्याचा आनंदही लुटला. सकाळी 7 वाजता आम्ही निघालो की रात्री 8 वाजेपर्यंत आम्हाला विविध पर्यटन स्थळं दाखवण्यात यायची."

"आम्हाला लंडन दाखवण्यासाठी सुरक्षारक्षकांच्या दोन गाड्या आणि आमची एक गाडी अशा तीन गाड्यांची सोय करण्यात आली होती. त्यांनी आम्हाला भुयारी रेल्वे दाखवली. त्या रेल्वेने आम्ही 40-50 किलोमिटरचा प्रवास केला. तसेच इतरही अनेक ठिकाणी आम्ही भरपूर फिरलो. तसंच लंडनमध्ये जिथे भारतीय लोकं राहातात त्याही भागात आम्ही फिरायला गेलो. त्या भागात अगदी भारतासारखं हवं ते भारतीय जेवण मिळतं हे पाहूनही आम्हाला खूप आनंद झाला."

आपल्या कुटुंबासारखं अनुभव

राजघराण्यातील लग्न असलं तरी या डबेवाल्यांना अगदी कुटुंबासारखी वागणूक मिळत होती, हे सांगायला मरे विरसले नाही. याबद्दल ते भावनिक होऊन सांगतात की, "आम्हाला या राजघराण्यात एकदम कुटुंबासारखी वागणूक मिळाली. इतर पर्यटकांना राणीचा महाल पाहायचा असेल तरी त्यांना प्रवेश नसतो. मात्र आम्हाला त्यांनी हात पकडून महालाचा प्रत्येक मजला दाखवला."

प्रतिमा मथळा प्रिन्स हॅरी आणि मेगन

"राणीच्या महालामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. आणि तो महालही एवढा मोठा की या गेटने त्या गेटला जायचं म्हटलं तरी दम लागेल. महालाच्या प्रत्येक मजल्यावर उंची वस्तू, हॉल पाहायला मिळायचे. आपण पौराणिक पुस्तकांत वाचतो तसं हे सर्व राजवैभव याची देही याची डोळा पाहायला मिळालं. यापेक्षा आमच्या आयुष्यात दुसरा कोणता भाग्याचा क्षण असेल!"

लग्नासाठी मराठमोळा आहेर

या लग्नासाठी पाठवण्यात आलेल्या आहेराबद्दल सांगताना ते म्हणाले की, "आम्हाला लग्नाचं निमंत्रण आल्याबरोबर आम्ही 15 ते 20 दिवस अगोदर त्यांच्यासाठी भेटवस्तू विकत घेतली. यामध्ये महाराष्ट्राची ओळख असलेल्या वस्तूंची निवड करण्यात आली होती. कोल्हापुरी चप्पल, पुणेरी फेटा आणि लग्नासाठी राणीला साडी आणि बांगड्या अशा प्रकारे मराठमोळा आहेर आम्ही त्यांना पाठवला होता. विशेष म्हणजे आम्ही लंडनला गेल्यानंतर आमच्या डोळ्यांनी तो आहेर आम्ही त्यांच्या शोकेसमध्ये ठेवलेला दिसला. त्या आहेराला त्यांनी जे महत्त्व दिलं होतं ते पाहून आम्ही भारावून गेलो होतो."

ते भारावून सांगतात, "हा सोहळा अनुभवणं म्हणजे इंद्राच्या दरबारातच उभे आहोत असं वाटलं. आम्ही अशिक्षित लोक, मात्र आमचा लंडनमध्ये राजाच्या लग्नात जो सन्मान झाला तो आम्ही मरेपर्यंत विसरणार नाही."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)